'भरभरून पाठिंबा दिल्याबद्दल गोव्यातील 'बंधू-भगिनींचे मी आभार मानतो'! जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्या विजयानंतर PM मोदींची X पोस्ट Viral

PM Narendra Modi x post: भाजप–मगो युतीला ३२, काँग्रेस–फॉरवर्ड युतीला ११, आरजीपीला दोन, आपला एक जागा मिळाली. तर, अपक्षांनी चार जागा जिंकल्‍या.
PM Narendra Modi Speech
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जिल्‍हा पंचायत निवडणुकीत भाजप-मगो युतीने विरोधी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीसह आप, रिव्‍हॉल्युशनरी गोवन्‍स (आरजीपी) या पक्षांना नमवत दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर पुन्‍हा झेंडा फडकावला. भाजप–मगो युतीला ३२, काँग्रेस–फॉरवर्ड युतीला ११, आरजीपीला दोन, आपला एक जागा मिळाली. तर, अपक्षांनी चार जागा जिंकल्‍या.

मात्र, २०२० च्या तुलनेत भाजपच्या जागा घटल्या आहेत. त्यावेळी भाजपने ३३ जागा जिंकल्या होत्या. विरोधकांच्या बेकीचा भाजपला मिळालेला फायदा अनेक ठिकाणी दिसून आला.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल, आतिषी, काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर आदी नेत्‍यांनी जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्‍या प्रचारात उतरून ही निवडणूक प्रतिष्‍ठेची बनवली होती. राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २६६ उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात होते. निवडणुकीसाठी गेल्‍या शनिवारी विक्रमी ७०.८१ टक्‍के इतके मतदान झाले होते. सोमवारी राज्‍यातील १५ केंद्रांवर मतमोजणी करण्‍यात आली.

दरम्यान, राज्‍यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्‍या काँग्रेसने गत जिल्‍हा पंचायत निवडणुकीत केवळ चार जागा जिंकल्‍या होत्‍या.

परंतु, यावेळी त्‍यांच्‍या पदरात दक्षिण गोव्‍यातील आठ आणि उत्तर गोव्‍यातील दोन अशा मिळून दहा जागा पडल्‍याने काँग्रेसमध्‍ये काहीअंशी समाधानाचे वातावरण पसरले आहे. परंतु, उमेदवार दिलेल्‍या नऊपैकी पाच मतदारसंघांत विजयाचा विश्‍‍वास बाळगून असलेल्‍या गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाईंना केवळ एकच जागा जिंकता आली.

लक्षवेधी

मुख्‍यमंत्री, विश्‍‍वजीतचा करिश्‍‍मा

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी सुरुवातीपासूनच जिल्‍हा पंचायत निवडणूक गांभीर्याने आपापल्‍या विधानसभा मतदारसंघांत येणाऱ्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीतील भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार केला.

मंत्री शिरोडकरांच्‍या कन्‍या गौरी यांचा दिमाखदार विजय

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्‍या कन्‍या गौरी शिरोडकर यांना भाजपने शिरोडा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पक्षाचा निर्णय सार्थ ठरवत गौरी शिरोडकर यांनी शिरोड्यातून विजय मिळवला.

बेतकी–खांडोळ्यात गावडेंना धक्‍का

प्रियोळ भाजपकडे असल्‍यामुळे त्‍या मतदारसंघात बेतकी–खांडोळात भाजपने श्रमेश भोसले यांना उमेदवारी दिली होती. परंतु, तेथे अपक्ष उमेदवार सुनील जल्‍मी यांनी भोसले यांचा पराभव केल्‍याने भाजप आमदार गोविंद गावडे यांना मोठा धक्‍का बसला.

व्‍हेंझींची बाणावलीवरील पकड सैल

विधानसभेचा ‘बाणावली’ आपकडे असल्‍यामुळे तेथे जोसेफ गाब्रियल आंतोनियो फिडिलिस पिमेंटा यांना उमेदवारी दिली. पण, काँग्रेसच्‍या लुईझा आंतोनियो परेरा यांनी त्‍यांचा पराभव केल्‍याने व्‍हेंझींची मतदारसंघावरील पकड सैल झाली.

‘आरजीपी’ने उघडले खाते

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जि. पं. निवडणुकीत स्‍वबळावर उतरलेल्‍या ‘आरजीपी’ने सांताक्रुजची जागा जिंकत या निवडणुकीतील खाते उघडले. इस्‍पेरेंका ब्रागांझा यांनी काँग्रेसच्‍या शायनी डी ओलिव्‍हेरा यांचा पराभव केला. तर सेंट लॉरेन्समध्येही ‘आरजीपी’ने बाजी मारली.

१९ मतांनी विजयी

रिवणमधील भाजप उमेदवार राजश्री गावकर यांनी अवघ्‍या १९ मतांनी विजय संपादन केला. या मतदारसंघात गोवा फॉरवर्डने संहिद्या गावकर आणि आपने तेजस्‍वी गावकर यांना उमेदवारी दिली होती.

आंतोन वाझ यांच्‍या पत्‍नीचा अपक्ष राहूनही विजय

कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वाझ यांनी पत्‍नी मेरसिना वाझ यांना कुठ्ठाळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्‍हणून उभे केले होते. निवडणुकीत मेरसिना वाझ यांनी विजय मिळवला असून, त्‍या भाजपला पाठिंबा देणार आहेत.

‘आप’च्‍या कामगिरीने निराशा

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत सुरुवातीपासूनच स्‍वतंत्र चूल मांडलेल्‍या ‘आप’ने निवडणुकीत सर्वाधिक ४२ जागा लढवलेल्‍या होत्‍या. पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही गोव्‍यात येऊन उमेदवारांचा प्रचार केला होता. दिल्लीच्‍या माजी मुख्‍यमंत्री आतिषी यांनी तर अनेक महिन्‍यांपासून गोव्‍यात तळ ठोकला होता. तरीही त्यांना एकमेव कोलवा हा मतदारसंघ जिंकता आला. आमदार असलेल्‍या बाणावलीची जागाही ‘आप’ला जिंकता आली नाही. त्‍यामुळे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्‍ये कमालीची निराशा पसरली आहे.

PM Narendra Modi Speech
Goa ZP Election Result: जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! विरोधकांची युती न झाल्यानं फुललं कमळ; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

महिला शक्ती : २१ महिला विजयी

उत्तर व दक्षिण गोव्‍यात मिळून २१ महिला जिल्‍हा पंचायतीत निवडून आल्‍या आहेत. दक्षिण गोव्‍यात १० जागा महिलांसाठी आरक्षित होत्‍या, तेथे १२ जागा मिळाल्‍या, तर उत्तरेत नऊ जागांवर यश आले. पाच वर्षापूर्वीही २१ महिला निवडणून आल्‍या होत्‍या. महिला उत्‍थानासाठी ही बाब लक्षणीय आहे.

PM Narendra Modi Speech
Goa ZP Election Results: '2027'ची नांदी? उत्तर गोव्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांची धडपड

आचारसंहिता उठवली

उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोवा राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबरपासून लागू केलेली आचारसंहिता उठविली आहे. सोमवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून आचारसंहिता उठवली जाईल, असे आयोगाने जाहीर केले आहे.

गोवा सुशासनासोबतच प्रगतिशील राजकारणाच्या पाठीशी उभा आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप–एमजीपी (एनडीए) आघाडीला गोव्यातील जनतेने भरभरून पाठिंबा दिल्याबद्दल गोव्यातील माझ्या बंधू-भगिनींचे मी आभार मानतो. यामुळे गोव्याच्या विकासासाठीच्या आमच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल. या सुंदर राज्यातील लोकांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या मेहनती ‘एनडीए’ कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात कौतुकास्पद काम केले असून, त्याचाच परिपाक म्हणून हा निकाल लागला आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

या विजयामुळे कार्यकर्त्यांचा विश्‍‍वास वाढला आहे. त्‍याचा फायदा निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीतही होईल.

दामू नाईक, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

गोमंतकीय जनतेने जिल्‍हा पंचायत निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदान करुन भाजप सरकार, पंतप्रधान मोदींवरील विश्‍‍वास सार्थ ठरवला.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com