राजू नायक
बर्च बाय रोमियो क्लबमध्ये आगीचा भडका उडून २५ जण मृत्युमुखी पडले, तरी अजून आपल्याला समज येत नाही, आपली न्यायालये सजग नाहीत, पोलिसांना जाग आलेली नाही आणि सरकारलाही सोयरसुतक नाही. अंजुणे ते मोरजी किनाऱ्यावर अजून २०० क्लब चालू आहेत, ते सर्व बेकायदेशीर आहेत आणि स्थानिक नेते मंडळी त्यात हात धुऊन घेत आहेत.
उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने लुथ्रा बंधूंचा जामीन रद्द करताना जो धारदार निकाल दिला आहे तो सरकार, कनिष्ठ न्यायालये व पोलिस या सर्वांच्या डोळ्यात अंजन टाकणारा आहे. वास्तविक या निकालाचे निष्कर्ष किनारपट्टीवर नाईट लाईफच्या नावाखाली जो सावळागोंधळ चालू आहे, त्या प्रत्येक आस्थापनात फ्रेम करून लावणे भाग पाडले पाहिजे.
उत्तर गोव्यातील बागा-हडफडे येथे एका खाजन जमिनीत बर्च बाय रोमियो लेन नावाचा हा नाईट क्लब लुथ्रा बंधू बेकायदेशीररीत्या चालवत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तेथे भीषण आग लागून २५ जणांचा होरपळून मृत्यू घडला. वास्तविक जलद न्यायालयाकडे हे प्रकरण सोपवून या क्लबच्या संचालकांना त्वरित फाशीची शिक्षा ठोठावली असती तर मृतांच्या नातेवाईकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता, परंतु हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात सुरू झाले आणि निष्णात कायदेपंडित आणून लुथ्रा बंधूंनी स्वतःला जामीन मिळविला.
लुथ्रा बंधू-गौरव व सौरभ तसेच अजय गुप्ता यांना जामीन देताना सत्र न्यायाधीशांनी उलट काय म्हणावे? ‘‘ही घटना काही दरोडा किंवा खुनासारखी अत्यंत दुष्ट, भयंकर, तिरस्कृत नाही!’’ गोवा खंडपीठाने जामीन रद्द करताना आता सत्र न्यायालयाला जबरदस्त कानपिचक्या दिल्या. त्यांनी म्हटले आहे, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा नाही म्हणणे अन्यायकारक आहे.
वास्तविक सत्र न्यायालयाने या तिघांना जामीन देणे अयोग्य तर होतेच, शिवाय गुन्हा गंभीर नाही अशी मल्लिनाथी करणे, त्याहून बेजबाबदारपणाचे होते, असंवेदनशील होते, शिवाय मृतांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा तो प्रकार होता. उच्च न्यायालयाच्या निकालातील उतारे येथे उद्धृत करण्यासारखे आहेत. ‘‘या गुन्ह्याचे गांभीर्य दुर्लक्ष करण्यासारखे नाही.’’ दुर्दैव म्हणजे ‘‘सत्र न्यायालयाच्या निकालात गुन्ह्याची तीव्रता, अघोरीपणा याबद्दल एक अवाक्षर नाही!’’
आरोपींनी प्रथमदर्शनी हे रेस्टॉरंट चालवताना सर्व सुरक्षा नियम धाब्यावर बसविले, शिवाय तेथे ‘कोल्ड पायरो आतषबाजी’ करू देणे बेजबाबदारपणाचे होते. रेस्टॉरंटच्या छताला पट्कन आग पकडू शकते याची जाणीव असतानाही व्यवस्थापनाने संपूर्ण दुर्लक्ष केले. न्या. नीता गोखले यांनी आपल्या निकालपत्रात ज्या पद्धतीने हा क्लब तेथे स्थापन झाला, त्याला परवाने मिळविणे व बिनदिक्कत चालविण्यात आला त्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत.
आग लागून अनेकजण मृत्युमुखी पडल्यानंतर माध्यमांनी त्यातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला होता. परंतु नंतर दिवस जातात, तसे लोकांच्या स्मरणातून ही प्रकरणे मागे पडतात. कायद्याचा कीस काढून आरोपी सुटतात. दिवस जातात तसे लोकही विसरतात व गुन्हेगार पुन्हा मोकाट सुटून असे गुन्हे करण्यास पुनः पुनः धजावतात. गोव्यात तशाच प्रकारचे अनेक क्लब अजूनही राजरोस चालू असणे हा दैवदुर्विलास नाही तर काय आहे?
‘‘व्यापार परवाना मिळविण्यासाठी घर क्रमांकामध्ये फेरफार करण्यात आला, त्याद्वारे आरोग्यविषयक ‘ना हरकत दाखला’ बनावट पद्धतीने तयार केला व हे सर्व केले अबकारी दाखला पदरात पाडून घेण्यासाठी. हे कारस्थान रचण्यात रेस्टॉरंटचे संचालक सामील आणि जबाबदार आहेत. आता हे भागीदार स्वतःची जबाबदारी टाळत एकमेकांना दूषणे देण्यात गुंतले आहेत.’’
आरोपींचा युक्तिवाद दुसऱ्यांकडे जबाबदारी सोपविल्याच्या बहाण्यावर आधारलेला आहे. त्यांनी रेस्टॉरंट चालविण्यासाठी माणसे नेमली होती आणि त्यांचा दावा आहे की, देशामध्ये ते अशी २० रेस्टॉरंट चालवतात, त्यामुळे बर्चसारख्या रेस्टॉरंटवर प्रत्यक्ष निगराणी ठेवणे शक्य होत नाही.‘‘घटना घडल्यावर लुथ्रा बंधू चट्कन पहाटेचे विमान पकडून थायलंडला पळाले होते. त्याचाही उल्लेख न्यायमूर्तींनी केला आहे. एवढी गंभीर घटना घडून त्यात २५ जणांचा दुर्दैवी भीषण मृत्यू होतो, त्यावेळी स्वतःची जबाबदारी दाखवण्याऐवजी आरोपी पळ काढतात. सत्र न्यायालयही या घटनेकडे ‘ते काही तेवढे गंभीर नाही’ म्हणते, ते दुर्दैवाचे आहे.’’
सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना आरोपींच्या युक्तिवादावर कटाक्ष ठेवला. आगीचे प्रत्यक्ष कारण अजून बाहेर आलेले नाही, हा त्यांचा दावा! परंतु तसे करण्यापूर्वी सत्र न्यायालयाने अग्निशमन दलाचा अहवाल व प्रत्यक्षात उपलब्ध असलेला व्हिडीओ याकडे दुर्लक्ष केले. क्लबमध्ये वापरण्यात आलेल्या कोल्ड पायरो आतषबाजीमुळे ज्वाळा भडकून त्या छतापर्यंत पेट घेत गेल्या. त्यासंदर्भात अजून अंतिम अहवाल जाहीर झालेला नसला तरी प्राथमिक तपासणीतील निष्कर्षातील गांभीर्य कमी होत नाही.
‘धक्कादायक बाब म्हणजे सत्र न्यायालयाने आरोपींना पोलिसांपुढे नियमित जाबजबानीसाठी उपस्थित राहण्याचे किंवा देशांतर्गत प्रवासासाठी न्यायालयाची मान्यता घेण्याचेही बंधन घातले नाही.’’या सर्व प्रकारांमुळे क्लबमध्ये आगीची ठिणगी उडून आग भडकली, त्यात २५ जण मृत्युमुखी पडले, तेथे अग्निशमन यंत्रणेचा अभाव होता हे आता ‘स्पष्ट’ होते.
न्यायालयाने अनेक निष्कर्ष काढले आहेत, जे क्रमाने येथे देतो:
१. रेस्टॉरंट परवान्याशिवाय चालत असे.
२. ते परवाने मिळवू शकले नाहीत, कारण बांधकामच बेकायदेशीर होते.
३. परवाने मिळविले असते तर सुरक्षा उपायांची कास धरणे संचालकांना भाग पडले असते व नियमन करावे लागले असते.
४. हे सर्व प्रकार हलगर्जीतून-जाणीवपूर्वक घडले.
५. संचालकांना कसलीही संवेदनशीलता, सोयरसुतक नाही.
उच्च न्यायालयाच्या निकालातून सत्र न्यायालयाचे कान पिळले गेले आहेत. आपली कनिष्ठ न्यायालये कशी काम करतात, त्यावर त्यातून झगझगीत उजेड पडतो. कनिष्ठ न्यायालयातील न्यायमूर्तींना योग्य मार्गदर्शन नसते. या प्रकरणात मृतांचे नातेवाईक सजग नसते तर कदाचित प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेलेच नसते.
या प्रकरणातून सामाजिक संस्था, एनजीओंचे महत्त्व लक्षात येते. स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक पंच, सरपंच व अबकारी अधिकारी या सर्वांची पोलखोल झाली आहे. दुर्दैव म्हणजे स्थानिक समाजाला अजून जबाबदारीचे भान नाही. कारण स्थानिक सरपंच ज्याने या क्लबला आश्रय दिला, त्याची पाठराखण केली, त्याला राजीनामा द्यावा लागला, परंतु त्याची पत्नी त्याच प्रभागातून जिंकून आली. २५ जणांच्या चितेची राख विझण्याआधी हे घडले.
म्हणजे त्या सरपंचाने गेल्या काही वर्षांत जे काय चालविले आहे, किनारपट्टीवर ज्या पद्धतीचे स्थानिक लोकनेते आम्ही निर्माण केले आणि त्यांच्या आश्रयाखाली किनारी भागात जे नाईट लाईफ बिनबोभाट सुरू आहे, त्यावरही न्यायालयाच्या निकालाची सावली पडली आहे. अंमली पदार्थांमुळे गोव्याचे नाव बदनाम आहे. आमचे नेते शिक्षण संस्थांमध्ये जाऊन भाषणे देतात, परंतु किनारपट्टीवर हे जे प्रकार चालले आहेत, त्यातून निर्माण होणारा हिस्सा वरपर्यंत जात नसेल का?
या विषयाचा एक जाणकार मला सांगत होता, अंजुणेला जाऊन ये. तेथे तुम्हाला आता ‘गे’ लोकांची नागडी उघडी चित्रे लावलेली दिसतील. सध्या ‘गे’ लोकांचा अड्डा गोव्यात निर्माण होतोय. त्यांना नाचताना, बागडताना पाहायला लोक येतात. कशा प्रकारचे पर्यटन आपण गोव्यात निर्माण करतोय पहा. त्याची रिळे सध्या समाजमाध्यमांवर गाजताहेत.
अंजुणे ते मोरजी या संपूर्ण किनारीपट्ट्यात हा असा धुडगूस चालू आहे, आणि गोव्याचे नाईट लाईफ म्हणजे ते हेच बीभत्स चित्र बनते आहे. हा संपूर्ण मामला, क्लब, रेस्टॉरंट, हॉटेले, इतर सर्व बार अड्डे बेकायदेशीर आहेत. माझा हा मित्र म्हणाला १०० टक्के बेकायदा अड्डे!
गोवेकरांनी चालविलेले तीन क्लब सोडले, टिटो, एलपीके व सिंक -ते सोडले तर इतर सर्व बिगर गोमंतकीयांचे आहेत व त्यांच्याकडे परवाने आहेत की नाहीत, क्लब बेकायदा उभारले आहेत, याचे सोयरसुतक नाही. कारण खोटे घर क्रमांक, बनावट परवाने, आरोग्य मान्यता व अग्निशमन यंत्रणा, कसे बनावटरीत्या तयार करायचे याचे ज्ञान त्यांना आहे.
स्थानिक नेते, सरपंच ते कसे तयार करायचे याचे दाखले देतात. असे किमान २०० क्लब या किनारपट्टीवर आहेत, ते स्थानिक पोलिस, सरकारला माहीत नाहीत, असे आम्हाला म्हणता येईल काय? माझा तो मित्र मला म्हणाला, येथे एकूणच नंगानाच चालतो. पैसा फेको तमाशा देखो!
पोलिस भ्रष्ट आहेत, सरकार बेफिकीर आहे, असे मानले तरी न्यायालयानेही असंवेदनशीलता बाळगावी? ‘‘क्लबला आग लागून २५ जण होरपळून मरणे हा प्रकार काही दरोडेखोरी, खुनाएवढा क्रूर, महाभयंकर नाही!!!’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.