

काणकोण: यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने एकीकडे राज्य सरकार पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत असताना, दुसरीकडे नद्यांवरील पाटबंधारे अडवण्याबाबत सरकारची अजून कोणतीच हालचाल दिसत नसल्याने यंदा तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चापोली धरणाचा जलाशयही यंदा पूर्ण क्षमतेने भरला नाही. त्यामुळे हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. सरासरी ३१ टक्के पाऊस यंदा कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. काणकोणमधील प्रमुख नदी-नाल्यांची पात्रे आताच कोरडी पडू लागली आहेत. मात्र, जलस्रोत खात्याने अद्याप पाणी अडविण्यासाठी बंधारे अडवलेले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
काणकोणात एकूण सतरा बंधारे आहेत. मात्र, तळपण, गालजीबाग, मुडकूड, साळेरी व अन्य ओहळांवरील बंधारे अजून खुले आहेत. त्यामुळे नद्यांची पात्रे झपाट्याने आटत चालली आहेत. तळपण नदीवर खोतीगावातील कुस्के ते अर्धफोंडपर्यंत सात बंधारे आहेत. त्याशिवाय तळपण नदीला मिळणाऱ्या गावडोंगरी व अन्य ओहळांवर बंधारे बांधून पाणी अडवण्यात येते.
या बंधाऱ्यांमुळे भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होते. तसेच परिसरातील बागायती व शेतीसाठी हे पाणी पूरक ठरते. या पाण्यावर तालुक्यात उन्हाळ्यात भाजीपालाही मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. मात्र, अजून बंधारे अडवण्यात आलेले नसल्याने यंदा पेयजलाबरोबरच कृषी उत्पादनावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बंधारे बांधण्याची प्रक्रिया लवकरच
येत्या काही दिवसांत सोपस्कार करून बंधारे बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता धनंजय लोटलीकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.