Goa BJP: प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिल्लीत सादर केला अहवाल; भाजपचे निवडणूक धोरण रविवारी

BJP Goa Election Strategy: विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याविषयीचे धोरण रविवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकांत भाजप निश्चित करणार आहे.
BJP Goa Election Strategy
Goa BJPDainik Gomamtak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याविषयीचे धोरण रविवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकांत भाजप निश्चित करणार आहे. प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी आज भाजप मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) यांना लिखित अहवाल दिल्यानंतर या बैठका होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचे रणशिंग अद्याप अधिकृतपणे फुंकले नसले तरी राज्यातील सत्ताधारी भाजपने निवडणुकीची तयारी निर्णायक टप्प्यात नेली आहे. प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सादर केलेल्या अहवालातील राजकीय गणित, संभाव्य आघाड्या आणि विरोधकांच्या हालचालींचा विचार करता वरिष्ठ नेत्यांनी नाईक यांना गोव्यात परत न जाता दिल्लीतच थांबण्याची सूचना केली आहे.

BJP Goa Election Strategy
Gyanesh Kumar Goa Visit: मुख्य निवडणूक आयुक्त गोवा दौऱ्यावर येणार! 2 आणि 3 सप्टेंबरला दोन दिवसांचा दौरा

दामू नाईक यांची उद्या (रविवारी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि संघटन राष्ट्रीय सरचिटणीस यांच्यासोबत पुन्हा सविस्तर चर्चा होणार आहे. या चर्चेत राज्यातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक बांधणी, मतदारसंघनिहाय तयारी आणि विरोधकांच्या संभाव्य रणनीतीचा ऊहापोह होऊन निवडणुकीची व्यापक दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.

राज्यात चौथ्यांदा भाजपचे सरकार सत्तेवर आणण्याचे लक्ष्य ठेवून संघटनात्मक फेरबदल आधीच करण्यात आले आहेत. गाभा समितीच्या बैठकीतही निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन झाले. त्यामुळे मंत्र्यांची कामगिरी विरोधकांच्या हाती निवडणुकीतील प्रभावी शस्त्र बनू नये, यासाठी पक्षाने आतापासूनच सावध पावले उचलल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत.

BJP Goa Election Strategy
Goa Tourist Murder Case: हत्येप्रकरणी जप्त 'थार' 8 लाखांच्या हमीवर सुपूर्द, अतिरिक्त सत्र न्यायालयाचे आदेश; मारहाणीत पर्यटकाचा झाला होता मृत्यू

मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याबरोबरच एकापेक्षा अधिक मंत्र्यांच्या बदलाची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे नाईक यांनी स्पष्ट केले. निवडणूक कधीही झाली तरी भाजपला चौथ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी संघटना, सरकार आणि निवडणूक यंत्रणा यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतील उद्याची बैठक ही केवळ आढावा बैठक न राहता गोव्याच्या पुढील राजकीय डावपेचांची दिशा ठरवणारी ठरण्याची शक्यता आहे.

अहवालात काय?

१ भाजपविरोधात विरोधक एकत्र आले तर आणि विरोधकांची मते विविध पक्षांत विभागली गेली तर निवडणुकीचे संभाव्य चित्र काय असेल याचा अंदाज अहवालात मांडण्यात आला आहे.

२ कोणते पक्ष परस्परांशी आघाडी करू शकतात, विरोधकांकडून कोणते नवे चेहरे मैदानात उतरू शकतात याविषयीही भाजपचे आकलन अहवालात आहे.

३ त्याशिवाय निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या नेत्यांकडून पक्षांतर होण्याची शक्यता आहे, याचा राजकीय अंदाज अहवालात मांडला आहे.

४ त्यामुळे हा केवळ संघटनात्मक आढावा नसून आगामी सत्तासंघर्षाचा संभाव्य नकाशाच दिल्लीतील वरिष्ठांसमोर ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमित शहा यांच्या दौऱ्याबाबतही खल : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ६ आणि ७ सप्टेंबर रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. भाजप भवन उदघाटनाच्या निमित्ताने ६ रोजी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याने या दौऱ्यालाही निवडणूकपूर्व राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. शहा यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कोणता संदेश द्यायचा, संघटनेला कोणत्या दिशेने सक्रिय करायचे आणि निवडणूक प्रचाराचा सूर कसा ठेवायचा, याचे नियोजन उद्याच्या बैठकीत होणार आहे.

BJP Goa Election Strategy
Goa Sexual Assault Case: सोहम नाईक कोलवाळ तुरुंगातून पडला बाहेर; पाचपैकी चार प्रकरणांत जामीन

एकापेक्षा अधिक मंत्र्यांच्या बदलाची शक्यता पुन्हा चर्चेत

विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. कोणत्या मुद्द्यांवर निवडणुकीला सामोरे जायचे, कसे जायचे, यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. लिखित अहवाल सादर केल्यानंतर वरिष्ठांनी दिल्लीतच थांबण्याची सूचना केली. रविवारी होणाऱ्या बैठकीनंतर निवडणूक तयारीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. सरकारमधील बदलांबाबत मुख्यमंत्रीच सांगतील. तो त्यांचा अधिकार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com