मिलिंद म्हाडगुत
तसे पाहता सध्या भाजपचे अनेक आमदार, मंत्री ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे प्रतीत होत आहे. याचा अर्थ पुढच्या वेळी भाजपला बहुमत मिळेलच याची खात्री देता येत नाही, असा होऊ शकतो. पण बहुमत मिळाले वा नाही मिळाले तरी भाजपच सत्तेवर येणार, असा मुख्यमंत्र्यांच्या या आत्मविश्वासाचा अर्थ होऊ शकतो. आणि यात काही गैरवाजवी आहे असेही नाही.
पुढील वर्षी मीच मुख्यमंत्री’ हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. यातून आत्मविश्वासाबरोबर मुख्यमंत्र्यांची आगामी रणनीतीही अधोरेखित होत आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांची खासियत म्हणजे त्यांची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती. तेव्हा ते आपल्या प्रोटोकॉलचा विचार करताना दिसत नाहीत. मागे रद्द झालेल्या फोंडा पोटनिवडणुकीत तर ते चक्क कोपरा बैठकांत भाषण करताना दिसत होते. यानिमित्ताने वाड्या-वाड्यांवर बैठका घेणारा मुख्यमंत्री प्रथमच पाहायला मिळाला. याबाबतीत त्यांना विचारल्यावर ‘मी आधी भाजपचा कार्यकर्ता आणि नंतर मुख्यमंत्री’ असे त्यांनी उत्तर दिले होते. यातून त्यांची मानसिकता स्पष्ट होते.
२०१९ साली झालेल्या पोटनिवडणुकीतही याचा प्रत्यय आला होता. ते त्यावेळी चारही मतदार संघात गल्लो-गल्ली फिरले होते. शिरोडा मतदारसंघ तर त्यांनी अक्षरशः पिंजून काढला होता. म्हणूनच तर त्यावेळी भाजपने चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात विजय प्राप्त केला होता. आताही त्यांची धडपड सुरू आहे. भाजपची स्थिती म्हणावी तेवढी समाधानकारक नाही, याची जाणीव त्यांना असावी, असे त्यांच्या सध्याच्या कार्यप्रणालीवरून दिसत आहे. अनेक योजना जाहीर केल्या जात आहेत. ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत जनतेची गाऱ्हाणी ऐकली जाताहेत. त्या अनुषंगाने कामचुकार सरकारी बाबूंना कान पिचक्याही दिल्या जाताहेत.
‘माझे घर’, ‘माझा फ्लॅट’ या योजनेतून गरजूंना एकत्रित केले जात आहे. तीन मोफत सिलिंडर्स देऊन गृहिणींना खुश केले जात आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या आत्मविश्वासाचा पहिला कोन म्हणजे भाजपची ‘सत्ता वापसी’. तसे पाहता सध्या भाजपचे अनेक आमदार, मंत्री ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे प्रतीत होत आहे. याचा अर्थ पुढच्या वेळी भाजपला बहुमत मिळेलच याची खात्री देता येत नाही, असा होऊ शकतो. पण बहुमत मिळाले वा नाही मिळाले तरी भाजपच सत्तेवर येणार, असा मुख्यमंत्र्यांच्या या आत्मविश्वासाचा अर्थ होऊ शकतो. आणि यात काही गैरवाजवी आहे असेही नाही. आतापर्यंत काँग्रेसने भाजपला जसे आमदार पुरवले तसे पुढेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसा तो आता पायंडाच पडत चालला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षही अजूनही विस्कळितच आहे.
आणि ‘मगो’ने कितीही वल्गना केल्या तरी निवडणुकीनंतर त्यांना भाजपच्या छायेतच यावे लागणार याचेही ज्ञान मुख्यमंत्र्यांना आहे. आणि म्हणूनच मुख्यमंत्री ‘बिनधास्त’ असल्यासारखे वाटत आहे. आता दुसरा प्रश्न आहे तो भाजप सत्तेवर आला तरी विद्यमान मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री होणार की नाही हा. त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी तयार ठेवले असावे, ठेवले असेलच असेच वाटते. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी तशी रणनीती तयारही केली असावी. उगाच नाही विद्यमान मुख्यमंत्री सलग साडेसात वर्षे मुख्यमंत्री पदावर आहेत. असा विक्रम आतापर्यंत गोव्याच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांला जमलेला नाही. जे भाऊसाहेब बांदोडकर व पर्रीकर यांसारख्या ‘ट्रेंड सेटर’ मुख्यमंत्र्यांना जमले नाही, ते डॉ.सावंत यांनी करून दाखवले आहे.
खास करून स्वतःचा साखळी मतदारसंघ त्यातली पालिका त्यांनी चांगलीच बांधल्यासारखी दिसत आहे. गेल्यावेळी त्यांचा साखळीत फक्त ६६६ मतांनी विजय झाला होता. त्यांना साखळी पालिका विभागात फार कमी मते प्राप्त झाली होती. पण त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पॅनलने मोठे यश मिळाल्यामुळे लक्षणीय विजय प्राप्त करू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. म्हणूनच त्यांचा आत्मविश्वास दुणावल्यासारखा वाटतो आहे.आता हा त्यांचा आत्मविश्वास येत्या निवडणुकीत किती फलदायी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.