

मडगाव: सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला आणि या तालुक्यात मडगाव व फातोर्डा हे दोन मतदारसंघ सोडल्यास इतर सहा मतदारसंघ भाजपविरोधी असले, तरी काँग्रेसला या तालुक्यात यश मिळणारच, याची खात्री कोणी देऊ शकत नाही. या तालुक्यातील किमान सहा मतदारसंघांत काँग्रेसला बंडखोरांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे युती न करता काँग्रेसने ‘एकला चलो’ ही चाल खेळल्यास त्याचा पक्षाला जबर फटका बसू शकतो.
आतापर्यंतच्या विविध निवडणुकांचे निकाल पाहिल्यास वेळ्ळी, बाणावली, नुवे, नावेली, कुडतरी आणि कुंकळ्ळी या सहा मतदारसंघांत भाजपचे अस्तित्व फारसे नाही. हे सहाही मतदारसंघ काँग्रेसधार्जिणे मानले जात होते. २०२२ च्या निवडणुकीत यांपैकी फक्त नुवे आणि कुंकळ्ळी या दोन मतदारसंघांतच काँग्रेसला (Congress) विजय मिळवता आला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर झालेली बंडखोरी काँग्रेसच्या विरोधात गेली होती. २०२७ च्या निवडणुकीतही तेच आव्हान आहे.
बाणावलीतून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी आमदार कायतू सिल्वा यांनी केली आहे. माजी आमदार मिकी पाशेको यांनीही बाणावलीतून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले होते. या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असला, तरी काँग्रेसचे उमेदवार म्हणून जिल्हा पंचायत सदस्य लुईझा रॉड्रीगीस यांच्यासह वॉरन आलेमाव यांनीही दावा केला आहे. २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिल्याने व मतविभागणी झाल्याने आपचे उमेदवार वेंझी व्हिएगस विजयी झाले होते.
मागील निवडणुकीत नावेलीत भाजपने पहिल्यांदाच विजय मिळवला होता. उल्हास तुयेकर अवघ्या ५०० मतांच्या आघाडीने या मतदारसंघातून विजयी झाले. काँग्रेस, तृणमूल, आप आणि राष्ट्रवादी या चार पक्षांच्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतविभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. यावेळी वालंका आलेमाव यांच्यासह प्रतिमा कुतिन्हो आणि सिप्रू कार्दोज यांनी उमेदवारीवर दावा केला असल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकीत नुवेतून काँग्रेसचे आलेक्स सिक्वेरा विजयी झाले होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व नाहीसे झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघात दणदणीत यश मिळाले. यावेळी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी लिंडन मोंतेरो, पाऊसिलीप दोरादो आणि जिल्हा पंचायत सदस्य सॅडली फर्नांडिस हे तिघेही इच्छुक आहेत. त्यामुळे येथेही काँग्रेसला बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय माजी आमदार बाबाशान डिसा हेही पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
वेळ्ळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सावियो डिसिल्वा यांच्या विरोधात बेंजामीन डिसिल्वा उभे राहिल्याने मतविभागणी झाल्याने आपचे क्रूझ सिल्वा विजयी झाले. यावेळीही या मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे
कुंकळ्ळी मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेसचे युरी आलेमाव विजयी झाल्यानंतर त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. मात्र, यावेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसचेच एल्विस गोम्स यांनी आव्हान उभे केले आहे. कुडतरी मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेसने कमकुवत उमेदवार दिल्याने अपक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स पुन्हा निवडून आले होते. यावेळी कुडतरी मतदारसंघातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांना उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. मात्र, तेथेही मॉरेन रिबेलो यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मडगाव मतदारसंघात भाजपचे मंत्री दिगंबर कामत यांच्याविरोधात काँग्रेसने चिराग नायक यांना पुढे केले असले, तरी सावियो कुतिन्हो यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. फातोर्डा मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्वच नाही. त्यामुळे कितीही प्रयत्न केले, तरी हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात येणे अशक्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.