Goa Politics Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Politics: सत्तेसाठी विरोधकांची मोट बांधणार कोण? काँग्रेसची यात्रा, 'आप'ची रणनीती अन् विजय सरदेसाईंची महत्त्वाकांक्षा

Goa opposition alliance 2027: एकेकाळी विरोधी पक्षनेता बनणे हे ध्येय असे, परंतु आता सर्वांनाच सरकारमध्ये यायचे आहे आणि मुख्यमंत्री बनायचे आहे, परंतु त्यासाठी कष्ट करायला नकोत, संघटना उभारायला नको, जनतेचे प्रश्‍न घेऊन सातत्याने लढणारा नेता बनणे तर दूरच! विरोधी पक्षांची स्थिती हीच आहे!

गोमंतक ऑनलाईन टीम

राजू नायक

एक काळ असा होता की, विरोधी पक्षांना विरोधात बसायला, सरकारला - महत्त्वाच्या नेत्यांना नामोहरम करायला आवडायचे. पहिल्या फळीतल्या अनेक नेत्यांत राम मनोहर लोहिया, फिरोज गांधी - अशी अनेक नावे घेता येतील. त्यात अटलबिहारी वाजपेयीही होते. लोहिया हे तर प्रसंगी नेहरूंवर तुटून पडत.

कारण त्या काळात विरोधी नेतेपदाला प्रतिष्ठा होती. नेत्यांना चारित्र्य होते. त्यांची उंची नेहरू, इंदिरा गांधी यांच्याएवढीच मोठी असे. राजकारणात प्रगल्भता होती व सुशिक्षित समाज विरोधी मते ध्यानपूर्वक ऐकून घेई.

लोकशाहीत विरोधी पक्षाने सरकारला उलथवून टाकून सत्ता काबीज करायला हवी हे तत्त्व मान्य करण्यात आलेले होतेच, परंतु काँग्रेस स्वातंत्र्यलढ्यातून आलेला पक्ष होता. गांधीजी त्यांच्यामागे उभे होते. काँग्रेसला वळण लावण्याची ताकद गांधीजींमध्ये होती. नेहरूसुद्धा त्या ताकदीचे होते, स्वातंत्र्यलढ्यात खस्ता खाल्लेले, शिवाय आंतरराष्ट्रीय प्रतिमा असलेले. नेहरू व त्याकाळातील सत्तेवरच्या पक्षात विचारवंत, बुद्धिवादी नेत्यांची वानवा नव्हती. विरोधकही त्यांच्या तुलनेत तेवढेच प्रगल्भ, मोठे असणे स्वाभाविक होते.

त्यानंतर काँग्रेस-बराच काळ सत्तेवर राहिल्यामुळे पक्षाची, नेतृत्वाची झळाळी कमी होऊ लागली, तरीही काँग्रेसला पराभूत करण्याची ताकद कोणत्याही पक्षात नव्हती. त्यामुळे विरोधात राहून कंटाळलेले, भ्रमनिरास झालेले नेते काँग्रेसला हरवण्यासाठी ‘युती’ - आघाडीची भाषा करू लागले. बराच काळ सत्तेवर राहिल्याने काँग्रेसची गुर्मी, बेफिकिरीही वाढली होती. लोकशाही तत्त्वे व काही प्रमाणात संविधानाकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले.

विरोधकांचा आवाज दडपणे सुरू झाले, आणिबाणी हा त्या मुजोरीचा कळस होता, परंतु तरीही विरोधक एकेकटे लढण्याची, काँग्रेसला हरवण्याची धमक दाखवू शकले नाहीत.भारतीय राजकारणात ‘युती’ची निकड अशी वाटू लागली, परंतु त्यामागे काही किमान तत्त्वे होती, लोकशाहीच्या बळकटीकरणाची आस्था होती.

त्या काळातील काँग्रेस पक्षाची जागा आता भाजपाने घेतली आहे, लोकशाही संस्थांच्या खच्चीकरणाचा प्रमुख मुद्दा बनला आहे, विरोधकांनाही एकत्र यावेसे वाटू लागले आहे, परंतु या युती व आघाड्यांमध्ये मोठा फरक आहे.

भाजपाबरोबर मगोपची युती आहे. परंतु केवळ सत्ता हा त्या पक्षाचा एकमुखी कार्यक्रम बनला आहे. आपल्या सोयीसाठी यापूर्वी त्यांनी काँग्रेसबरोबर घरोबा केला. २०२७ ची विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून विरोधी पक्षांच्या आघाड्यांची चर्चा सुरू झाली आहे, परंतु विरोधी पक्षांच्या ऐक्यापेक्षा त्यांच्या फुटींची, लाथाळ्या व नेत्यांमधील अहंकारांचीच चर्चा सुरू झाली आहे. कोणाचाही एकमेकांवर विश्‍वास नाही. एकत्र आले तरी ते भाजपविरोधात एकदिलाने, आक्रमकरीत्या झुंजतील अशी शक्यता नाही. आपल्याकडे फक्त ३५ टक्के मते आहेत.

त्यांच्यातील काही लढवय्ये पक्ष एकत्र आले तरी ते ४० टक्के मतदार हिस्सा प्राप्त करू शकतील का, हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे युती झाली तरी अधांतरी विधानसभा निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.

काँग्रेस पक्षाचे प्रमुख गिरीश चोडणकर व विरोधी नेते युरी आलेमाव भ्रमात आहेत, की भाजपची लोकप्रियता घटली आहे आणि लोक त्यांना धडा शिकवायला उत्सुक आहेत, परंतु भाजपची गोव्यातील लोकप्रियता खरोखरीच उतरणीला लागली आहे काय? भाजपाने आपले आमदार असणाऱ्या उत्तर गोव्यातील बहुसंख्य मतदारसंघात अलिकडेच सर्वेक्षण केले. तेथे त्यांना मतदारांमध्ये नाखुशी दिसली नाही. सासष्टीत काही ठिकाणी ही नाराजी जरूर आहे. पुढचा काळ भाजपविरोधात वातावरण तापवण्यास काँग्रेस यशस्वी ठरला तर राज्यातील वातावरण बदलू शकते.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींना २०२७ मध्ये गोवा सर करायचा आहे, यात शंका नाही. त्यात गोव्यासह उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आदी राज्यातील निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पंजाबसह गोव्यावर काँग्रेससह आम आदमी पक्षाचेही लक्ष आहे. ‘आप’चे नेते सातत्याने गोव्यात येऊ लागले आहेत, यावरून ‘आप’ला गोव्याचे महत्त्व अतोनात आहे, हे लक्षात येऊ शकते. ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी गोव्यातील मतदारांचा हिस्सा महत्त्वाचा आहे.

केजरीवाल आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी कदाचित आता मतदारसंघांचे दौरेही सुरू करतील. काँग्रेसने यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला आहे, परंतु काँग्रेसचा ‘चेहरा’ कोण? ते काय कार्यक्रम घेऊन जाणार आहेत? मुद्दे काय आहेत? पर्रीकरांनी दिगंबर कामत यांच्या सरकारविरोधात यात्रा सुरू करताना खाणींसह अनेक मुद्दे उपस्थित केले, आकर्षक लोककल्याणकारी योजना पुढे आणल्या व भरपूर कष्ट घेतले होते.

त्यांनी गोव्यातील जनतेचा ‘मूड’ही हेरला होता. यात्रा सुरू करताना जनतेचा कल व वेळ टिपावी लागते. चतुर्थीनंतर लगेच अशी यात्रा सुरू झाली तर लोकांचा किती सहभाग अपेक्षित असेल? महत्त्वाचे म्हणजे यात्रेबरोबर हजारभर लोक चालले पाहिजेत तेवढी संघटना आहे का? उत्तर गोव्यात लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तुमच्याकडे काय यंत्रणा आहे?

काँग्रेसच्या प्रचाराचा चेहरा कोण बरे असेल? विरोधी पक्षनेता म्हणून युरी आलेमाव स्वतःची मुख्यमंत्रिपदाची लालसा लपवू शकलेले नाहीत. विरोधी पक्षाच्या नेत्याने तशी भावना जोपासणे चुकीचे नाही. परंतु श्रम करण्याची तयारी नाही. काँग्रेस स्वबळावर सत्तेवर येणे शक्य नाही, या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पुढाकार घेऊन विरोधी ऐक्यासाठी किती प्रयत्न केले? त्यांचे विरोधी नेत्याचे कार्यालयही योग्यप्रकारे चालत नाही.

गिरीश चोडणकर यांनाही निवडणूक लढवायची आहे. त्या अनुषंगाने ते प्रदेशाध्यक्ष पदाला कितपत न्याय देऊ शकतील? मतदार काँग्रेस पक्षाच्या पारड्यात भरभरून मते टाकण्याच्या पवित्र्यात बसले आहेत आणि भाजपाच्या ‘सुभेदारांना’ पराभव दिसू लागला आहे, असे चोडणकर गृहित धरून आहेत. काँग्रेसला भूपरिस्थिती माहिती नाही, असाच त्याचा अर्थ आहे.

विजय सरदेसाई यांच्याकडे जरूर नेतृत्वगुण आहेत आणि आपला करिष्मा निर्माण करण्यासही ते यशस्वी ठरले आहेत, परंतु गेल्या निवडणुकीत ज्याप्रकारे रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने करामत केली, तसे संपूर्ण गोव्यात उमेदवार उभे करून सत्तेवर येण्याइतपत संख्याबळ निर्माण करणे त्यांना शक्य होईल काय?

काँग्रेस पक्षाच्या वेळकाढू प्रवृत्तीची सरदेसाईंना पुरती जाणीव आहे. सलग दोनवेळा त्यांना काँग्रेसने दगा दिला. यावेळीही चर्चेला उशिरा सुरवात करून गोवा फॉरवर्डला झुलवत ठेवण्याचा खेळ काँग्रेस खेळेल व शेवटी दोन किंवा तीन जागा त्यांना बहाल करून, फातोर्ड्यातही त्यांना अपशकून करण्याचा नेहमीचा डाव काँग्रेस चालवेल याचा अंदाज सरदेसाईंना आला आहे.

ही भीक घ्यायची, एक-दोन जागा जिंकून आणून काँग्रेस पक्ष देईल ते पद स्वीकारण्याची आता त्यांची तयारी नाही. काँग्रेस पक्षाने युतीतील चर्चेसाठी समिती स्थापन करण्याचा आणखी एक हास्यास्पद प्रकार केला आहे. चर्चेचे गुऱ्हाळ घालून शेवटी निर्णयासाठी पक्षश्रेष्ठींना अधिकार देण्याच्या काँग्रेसच्या कार्यपद्धतीत अद्याप बदल झालेला नाही.

‘आप’च्या आमदारांनाही काँग्रेसबरोबर जायचे आहे, त्याशिवाय आपल्याला जिंकता येणार नाही, हे त्या पक्षाच्या दोन्ही आमदारांना उमजले आहे. त्यातून पक्षश्रेष्ठींचा विचार काही असो, आम्ही युतीचा पुरस्कार करू, असे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी जाहीर केले होते. परंतु केजरीवाल सातत्याने गोव्यात येतात, आतिशी गोव्यात मुक्काम करून आहेत - ते काँग्रेसकडून तीन चार जागा पदरात पाडून घेण्यासाठी आहे काय? या पक्षाला किमान १५ जागांवर निवडणूक लढवायची आहे आणि काँग्रेस पक्षाकडून एवढे ‘औदार्य’ अपेक्षित नसल्याने ‘आप’ स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे - त्यासाठी पक्षश्रेष्ठी त्यांचे दोन आमदार सोडून गेले तरी बेहत्तर असा डाव खेळू शकतात.

खासदार कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस यांचाही ‘आप’बरोबर युती करण्यास विरोध आहे व बाणावली-वेळ्ळी येथे त्यांनी आपले उमेदवार हेरून ठेवले आहेत. दुसऱ्या बाजूला ‘आप’ने भाजपने बाजूला फेकलेल्या माजी आमदारांकडे यापूर्वीच संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. टीएमसी किंवा एनसीपीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी पाच टक्के मते हवी असत, ‘आप’चे तसे नाही, ते गोव्यात दीर्घपल्ल्याचे राजकारण करू पाहतात, परंतु ‘आप’कडे स्थानिक पातळीवर प्रबळ टीम नाही. राहुल म्हांबरे, अमित पालेकर, एल्वीस गोम्स आदी नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकला. त्यामुळे पक्षाची संघटना संपूर्ण जोमाने उभी राहू शकलेली नाही.

गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंचीही गत तशीच आहे. मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न आहे, परंतु संघटना कुठे आहे? भाजपाने बाजूला ठेवलेल्या अनेक नेत्यांची मोट बांधून ते जर निवडणुकीला सामोरे जाऊ पाहात असतील तर पुढे पस्तावण्याची पाळी येऊ शकते. काँग्रेसकडून एक गट फुटून जाण्याची शक्यता आहे. ‘गोवा काँग्रेस’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यास या प्रक्रियेला वेग येऊ शकतो.

काँग्रेसने वेगवान हालचाली न केल्यास आप, आरजी आदी पक्ष या गटात सामील होऊ शकतात. भाजपच्या आश्रयाला गेलेले अनेक ‘नवरे’ या नव्या आघाडीत येण्यास उत्सुक असतील. काँग्रेसला अपशकून करून नवीन आघाडी जन्माला येत असल्यास भाजपाचाही विरोध नसेल. गेल्या निवडणुकीत आरजीला अल्पावधीत मान्यता मिळून त्यांना चिन्ह म्हणून फुटबॉलही प्राप्त झाला, त्यामागे भाजपाच्या शुभेच्छा होत्या. त्याच अनुषंगाने काँग्रेस फुटिरांसाठी १०० कोटींचे घबाड प्राप्त होणार असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली होती.

या शक्यतेला काँग्रेस कसा शह देणार त्याची काहीच तयारी दिसत नाही. काँग्रेसने आधीच अनेक हौशा-गवशांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढवून ठेवल्या आहेत. प्रतिमा, वालंका,पालेकर अशा अनेकांना निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची आशा वाटते. भाजपातही सारखीच परिस्थिती आहे. आधीच सत्ताधारी पक्षात ‘सुभेदार’ बनलेल्या मंत्र्यांनी दोन दोन मतदारसंघ सांभाळले आहेत, आता तिसऱ्या मतदारसंघावर कब्जा करण्याइतपत त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. बाबूश सांताक्रुझमध्ये कार्यालय उघडून बसले आहेत. त्यांना पक्षश्रेष्ठी - विशेषतः अमित शहांनी दम भरलेला नाही.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांना गोव्यात सारे आलबेल असल्याची खात्री दिली आहे. दामू नाईक यांच्या भरवशावर बी.एल.संतोष निर्धास्त आहेत. विरोधकांमध्ये फूट असल्याने आपल्याला शह मिळणार नाही या समजुतीत भाजप निर्धास्त आहे. भाजपातील हे सुभेदार विरोधकांना जाऊन मिळण्याचीही शक्यता नाही. केंद्रात मोदी-शहा यांचे सरकार २०२९ पर्यंत स्थिर राहाणार असल्याने कोणीच असे धाडस करणार नाही. गेल्यावेळी मायकल लोबोंनी हे धाडस केले व नंतर त्यांना नाक घासत शहांची मनधरणी करावी लागली. आता एसटींनाही आरक्षण मिळालेय.

काँग्रेसची विश्‍वासार्हता अजूनही वाढलेली नाही. बाबू कवळेकर व मायकल लोबो विधिमंडळाचे नेते असताना आपला संपूर्ण गट घेऊन भाजपात शिरले. त्यावेळी घसरलेली पक्षाची पत अद्याप सावरलेली नाही. पक्षात बंडखोरांना प्रवेश नाही, असे चोडणकर म्हणत असले तरी जिंकून येण्यासाठी लागणारे संख्याबळ, व्यूहरचना याचा पत्ता नाही व उत्तर गोव्यात या पक्षाला कोणी विचारत नाही, हे सत्य आहे.

पणजीत सुरेंद्र फुर्तादो यांनी उमेदवारीवर दावा केला आहे, परंतु महानगरपालिकेतच त्यांचा दारुण पराभव झालाय. गेल्या निवडणुकीत ‘आप’ने पाठिंबा देऊनही चोडणकर या मतदारसंघात पराभूत झाले होते. त्यांनतर काय बदल झाले? महानगरपालिकेवर आपला निर्विवाद बावटा फडकावूनच बाबूश मोन्सेरात सांताक्रुझ सर करायला निघाले आहेत. काँग्रेसचा तोही खात्रीशीर मतदारसंघ धोक्यात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसची यात्रा पाहाण्यास राजकीय निरीक्षक उत्सुक आहेत. तेथे काँग्रेसचे अस्तित्व लोकांना दिसेल. लाज उघडी पडली नाही म्हणजे झाले! मात्र, गिरीश चोडणकर यांनी कंबर कसून काम केले. यात्रा यशस्वी झाली तर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव आपोआप सर्वतोमुखी होईल.

एकूण काँग्रेसचा कस लागेल. गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वालाही हे आव्हान आहे. त्यांना ही तशी शेवटची संधी आहे. ते एकटे जाणार, साऱ्यांना सोबत घेऊन जाणार, पक्षाचे मुद्दे, गोव्याचे अस्तित्व, विरोधकांचे अस्तित्व या सर्वांचीच ही कसोटी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या हत्या! हल्लेखोर बाईकवरून आले, गोळ्या झाडल्या अन्... पोलिसांच्या चकमकीनंतर मुख्य शूटर जेरबंद, दोघे फरार

Ganesh Idol: चिकणमातीच्या गणेशमूर्ती घ्या, 'पीओपी' नकोच! CM प्रमोद सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन

पोक्सो न्यायालयातील 93 टक्के खटले निकाली; साडेतीन वर्षांत 163 खटले दाखल, 152 प्रकरणांचा निपटारा; लोकसभेत माहिती

Goa Drug Trafficking: राज्यात ड्रग्स तस्करीवर जोरदार 'प्रहार', विविध ठिकाणी कारवाई; 12 अटकेत, 10 गुन्हे दाखल, मोठा साठाही जप्त

FDA Raid: 'एफडीए'ची धडक कारवाई; 9 युनिट बंद, गोमेकॉबाहेर 70 किलोंचा मुदतबाह्य मावा जप्त करून नष्ट

SCROLL FOR NEXT