

Operation Sindoor Indian Air Force Strike Sargodha Airbase: भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चा धसका आणि त्यामुळे झालेले नुकसान पाकिस्तान अजूनही भरुन काढू शकलेला नाही. या ऐतिहासिक लष्करी कारवाईला 16 महिने उलटून गेल्यानंतरही पाकिस्तानचे महत्त्वाचे हवाई तळ अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेले नाहीत. एनडीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक रिपोर्टनुसार, हाय रिझोल्यूशन सॅटेलाइट फोटोंवरुन हे स्पष्ट झाले की, सरगोधा येथील पाकिस्तान एअर फोर्सच्या 'मुशफ' एअरबेसवरील धावपट्टी आणि टॅक्सी-ट्रॅकच्या जंक्शनवर आजही दुरुस्तीचे काम सुरुच आहे.
भारताने (India) क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट केलेला हा भाग पाकिस्तानला अजूनही पूर्ववत करता आलेला नाही. सरगोधा येथील हा हवाई तळ लाहोरपासून सुमारे 172 किलोमीटर आणि भारताच्या अमृतसर सीमेपासून अवघ्या 200 किलोमीटर अंतरावर आहे.
12 सप्टेंबर रोजीच्या अद्ययावत सॅटेलाइट फोटोंमध्ये सरगोधा एअरबेसच्या धावपट्टीवर एक मोठा आणि खोल खड्डा स्पष्टपणे दिसून येत आहे. या खड्ड्याची रचना आणि रंग आजूबाजूच्या डांबरी रस्त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसत असून, तिथे नव्याने बांधकाम सुरु असल्याचे निष्पन्न होते. धावपट्टीचा एक भाग सपाट आणि गडद रंगाचा दिसत असला, तरी दुसरा अर्धा भाग अजूनही पूर्णपणे तयार झालेला नाही.
भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यामुळे धावपट्टीच्या सबग्रेड लेव्हलला मोठी हानी पोहोचली होती. पाकिस्तानने सुरुवातीला या खड्ड्यावर वरवरची मलमपट्टी केली होती, परंतु अंतर्गत रचना कमकुवत झाल्यामुळे आणि रस्ता खचल्यामुळे त्यांना तो भाग पुन्हा खोदून खोलवर डागडुजी करावी लागत आहे.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाचे एअर ऑपरेशन्स डायरेक्टर जनरल राहिलेले एअर मार्शल (निवृत्त) ए. के. भारती यांनी या सॅटेलाइट फोटोंवर प्रतिक्रिया देताना भारतीय सैन्याच्या अचूकतेचे कौतुक केले. भारताने 300 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरुन अत्यंत अचूकतेने थेट रनवेच्या मध्यभागावर निशाणा साधला होता. 16 महिने उलटूनही शत्रूच्या जखमा भरलेल्या नाहीत आणि सरगोधा रनवेवर अजूनही 'सर्जरी' सुरुच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेवरुन भारतीय वायुसेनेची क्षमता आणि पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचे झालेले अतोनात नुकसान पुन्हा एकदा जगासमोर आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.