सर्वेश बोरकर
छत्रपती शिवरायांनंतर दरबारातील अनेकांनी संभाजी महाराजांना गादीवर बसण्यास आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. यात अष्टप्रधान मंडळातील अनेकजण होते. मात्र शंभूराजांची रयतेमधील अफाट लोकप्रियता व स्वराज्याचे हित ओळखून सरसेनापती हंबीरराव मोहितेंनीदेखील त्यांनाच पाठिंबा दिला. संभाजी महाराज छत्रपती बनले व राज्यकारभाराची घडी बसवली. मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या अष्टप्रधान मंडळाने अनेक कटकारस्थाने केली.
१६८५च्या सुरुवातीला शंभूराजांनी मुघल प्रदेशावर एक भयंकर हल्ला केला आणि औरंगाबाद ते बुऱ्हाणपूरपर्यंतच्या मुघल प्रदेशाला उद्ध्वस्त केले. प्रचंड संपत्ती लुटली गेली जी नंतर खुल्या बाजारात विकली गेली. मुघल बादशहा औरंगजेब विजापूर आणि गोवळकोंडा काबीज करण्याच्या प्रयत्नात व्यग्र असताना संभाजी राजांनी सतरा समृद्ध शहरांवरती छापे टाकले ..
अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व कमी झाल्यामुळे कवी कलशावर अण्णाजी दत्तोसारख्या अष्टप्रधानांचा जळफळाट होऊ लागला. त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यास सुरुवात याच काळात झाली. कवी कलश हा संभाजी महाराजांना गूढ विद्या शिकवतो, त्यांना मदिरेची सवय लावतो असे घाणेरडे आरोप सुरू करण्यात आले.
याला वैतागून कवी कलशांनी महाराष्ट्र सोडून उत्तरेत परत जाण्याची तयारी केली. परंतु संभाजी राजांनी तुमच्या एवढा भरवसा आम्ही दुसऱ्या कोणावर ठेवू शकत नाही असे ठणकावून सांगत आग्रह केला व यामुळेच कवी कलश थांबले. याच कलशावर राजांनी कुडाळ व गोव्यातील डिचोलीचे बारुदखाने चालवण्याची जबाबदारी दिली होती. गणोजीच्या फितुरीनंतर पन्हाळा मुघलांच्या घशात घालण्याचा डाव केला होता तो कवी कलशांनी हाणून पाडला होता.
बादशहा औरंगजेबाचा पुत्र मुहंमद अकबर संभाजी राजांना सोडून गेल्याची बातमी मिळताच, औरंगजेबाने संभाजी राजांना वेढण्यासाठी पंढरपूरजवळील भीमा नदीकाठी अकलूज येथे तळ ठोकला. सेनापती हंबीरराव, हंसाजी मोहिते यांची १६८७च्या अखेरीस वाईजवळ मुघलांशी एक मोठी लढाई झाली ज्यामध्ये सेनापती हंबीरराव हंसाजी मोहिते लढताना मरण पावले.
मुघल सैन्याने सर्व कठीण खिंडी आणि महत्त्वाचे रस्ते लवकरच ताब्यात घेतले ज्यामुळे पन्हाळा आणि रायगडमधील दळणवळण जवळजवळ अशक्य झाले. कोल्हापूर आणि सातारा दरम्यान सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश गणोजीच्या ताब्यात होता आणि त्यांनी संभाजी राजांना स्वाधीन करण्यासाठी औरंगजेबाशी गुप्त करार केला होता. त्यांनी त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आणि त्या बातम्या मुघलांना कळवल्या. हा खेळ एक वर्ष चालला. नोव्हेंबर १६८८मध्ये कवी कलशाचा गणोजीशी तीव्र संघर्ष झाला आणि त्याचा पाठलाग करण्यात आला.
कवी कलश विशालगडावर आश्रय घेऊन आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला. जेव्हा संभाजी राजे यांना रायगडावर ही बातमी मिळाली तेव्हा त्यांनी संगमेश्वरजवळील गणोजीवर हल्ला केला आणि त्यांचा निर्णायक पराभव केला. त्यानंतर त्यांनी विशालगडावर कवी कलशाची भेट घेतली. परंतु त्यांच्या बाजूने फार कमी लोक असल्याने त्यांची स्थिती अधिकाधिक अस्थिर होत गेली.
गणोजी त्यांच्या पराभवामुळे सावध झाले होते आणि संभाजी राजांच्या हालचालींबद्दल नियमित अहवाल पाठवत राहिले. गोलकोंड्याचा माजी सेनापती शेख निजाम मुकर्रबखान याला कोल्हापूर येथे बादशहा औरंगजेबाकडून सूचना देऊन नियुक्त करण्यात आले होते की संभाजी राजांना पकडण्याची कोणतीही संधी साधून त्यावर हल्ला करावा. जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशहा औरंगजेब स्वतः दक्षिणेत कोकणात उतरणार तेव्हा त्याचा सामना कसा करायचा याची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे संभाजी महाराज निवडक लोकांची बैठक घेणार होते.
त्यात कविराज कलशही हजर होते. जानेवारी १६८९मध्ये, संभाजी राजे आणि कवी कलश त्यांच्या माणसांसह विशालगडावरून अंबा घाटमार्गे रायगडकडे निघाले. शेख निजाम मुकर्रबखानाला माहिती मिळाली की ते संगमेश्वर येथे थांबणार आहेत आणि १ फेब्रुवारी १६८९ रोजी त्यांच्यावर हल्ला केला गेला. त्यानंतर झालेल्या चकमकीत अनेक मराठ्यांनी आपले प्राण गमावले तर काही मूठभर रायगडावर जाण्यात यशस्वी झाले.
मालोजी घोरपडे यांनी आपल्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करताना आपले प्राण दिले. घात झाला. संगमेश्वरी स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले. कवी कलश तेव्हादेखील संभाजी राजांसोबतच होते. तेदेखील लढता लढता महाराजांसोबत कैद झाले. शेख निजाम मुकर्रबखान यांनी राजेंना स्वतःच्या हत्तीवर आणि इतर कैद्यांना घोडे आणि उंटांवर बसवले. त्यांना अंबा घाटाने औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले.
मुकर्रब खानाने त्यांना बहादूरगडावरील औरंगजेबाच्या छावणीकडे नेले. औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ केला. संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारून आपला मांडलिक व्हावे यासाठी राजी करण्यास या कवीचा उपयोग होईल असे बादशहाला वाटत होते. त्याने कलशाला वेगवेगळी आमिषे दिली. पण कविराज बधले नाहीत. संभाजी महाराजांसोबत त्यांंचेही अतोनात हाल करण्यात आले. असे म्हणतात की या प्रसंगी कवी कलशाने संभाजी महाराजांवर एक काव्य रचले होते आणि साखळदंडांनी बंदिस्त अशा अवस्थेत औरंगेजेबासमोर ते म्हणूनही दाखवले होते.
रागाने लाल झालेल्या औरंगजेबाने त्याची जीभ हासडण्याची आज्ञा दिली. संभाजी महाराज व कवी कलश या दोघांचेही डोळे फोडण्यात आले. त्यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड काढली गेली. पण त्यांनी हे अत्याचार सहन केले. इतके झाल्यावरही शेवटचा प्रयत्न म्हणून औरंगजेबाने कवी कलशाकडे एक पत्र दिले व त्यावर सही करायची मागणी केली. ते पत्र महाराणी येसूबाईंना रायगड खाली करून स्वराज्य मुघलांच्या हवाली करण्याबद्दल होते.
पण शिवरायांच्या स्वराज्याच्या मिठाशी, शंभूराजांच्या मैत्रीशी कवी कलशाने बेईमानी करणे शक्यच नव्हते. स्वराज्य धर्माचे रक्षण करणारे संभाजी महाराज व त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा तुळापूर येते शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. पण त्यांचे हौतात्म्य वाया गेले नाही. त्यांच्याच रक्ताची शपथ घेऊन अनेक मावळे पेटून उठले व शिवरायांच्या स्वराज्याची कीर्ती हिंदुस्थानभर पोहोचवली. आजही तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी शेजारी कविराज कलश यांचीदेखील समाधी दिमाखात उभी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.