केलेले घोटाळे आवरण्याच्या पलीकडे गेले, की ते सावरावे लागतात. ‘कॅश फॉर जॉब’ या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याऐवजी सर्व स्तरावर लपवाछपवी करणे सुरू आहे. त्याचेच द्योतक म्हणून पूजा नाईकला पोलिसस्थानकच्या मुख्य दरवाजातून, सर्वांसमोरून न नेता, मागील दाराने परस्पर हलवण्यात आले. पत्रकार प्रश्न विचारतील म्हणून इतके का घाबरायचे?
ती चुकून काही बोलली तर त्याची भीती नेमकी कुणाला वाटते आहे? बरे तिच्या सुरक्षेचा विचार या मागे आहे म्हणावे तर मारणारा मागील दारीही मारू शकतो! हे भय तिच्या मरणाचे नसून तिच्या जिवंत राहण्याचे व बोलण्याचे आहे.
ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न चालला आहे, त्यांच्यापेक्षाही ज्यांची घोर फसवणूक झाली आहे त्यांच्याप्रति प्रामाणिक राहणे जास्त महत्त्वाचे आहे. हे प्रकरण उघडकीस आले तेव्हाही तक्रारदारांच्याच सतावणुकीचे प्रकार समोर आले होते.
तक्रार करणाऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहन खुद्द मुख्यमंत्र्यांना करावे लागले होते. याचाच अर्थ तेव्हाही भीती होती व आजही ती आहेच. ज्यांनी पैसे दिले ते घाबरत आहेत, जिने घेतले ती पूजा नाईक घाबरते आहे आणि ज्यांच्याकडे पोहोचले तेही घाबरत आहेत.
पण, प्रश्न इथे कोण घाबरतोय याचा अजिबात नाही. पैसे घेऊन नोकरी लावण्याच्या प्रकाराला आळा बसण्यासाठी यातील सर्वांना कठोर शिक्षा होणे व झालेली जनतेला दिसणे अत्यावश्यक आहे. नेमके तेच होत नाही. या प्रक्रियेत पारदर्शकता नाही, म्हणूनच ती लपवण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू आहे.
सरकार, प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी यांना वाचवण्याने काहीच साध्य होणार नाही. नोकरी मिळण्याच्या खोट्या आशेने ज्यांचे आयुष्य बरबाद झाले त्यांचा विचार कोणी करायचा? त्यांचा मार्ग चुकला यात दुमत नाही. पण, त्या मार्गावर त्यांना जाण्यास भाग पाडणारी व्यवस्था त्यामुळे दोषमुक्त होत नाही.
त्या व्यवस्थेतून हे पैसे खाणारे झारीतले शुक्राचार्य बाहेर फेकले जात नाहीत तोवर असे नोकरीची आस असलेले गोमंतकीय फसतच राहतील. हे दुष्टचक्र आहे. पूजा नाईक हा त्याचा दृश्य भाग आहे. आत, आत - किती वलये आत - सुखेनैव बसलेली विषवल्ली उखडून काढली जात नाही तोवर नोकऱ्यांचा बाजार भरतच राहील.
२३ व्यक्तींमागे एक सरकारी कर्मचारी हे येथील प्रमाण अन्य राज्यांपेक्षा अधिक आहे. तिथेही कुठल्या खात्यात किती व कुठल्या प्रकारचे कर्मचारी लागतात, यापेक्षाही ‘ओळख’, ‘मंत्र्याच्या मतदारसंघातले’ हे निकष अधिक महत्त्वाचे ठरतात.
सरकारी नोकरी लग्न, संसार यासाठी इतकी महत्त्वाची झाली आहे, की लोक कर्ज काढून पैसे चारतात. पूजा नाईक हा या प्रकरणाला फक्त एक सडलेला पैलू आहे. ती नोकरी देऊ शकली नाही व पैसेही परत करू शकली नाही, म्हणून या प्रकरणाला वाचा फुटली.
ज्यांनी तिला पैसे दिले त्यांना नोकरी मिळाली असती तर, हे प्रकरण कधी उजेडात आलेच नसते. कोविडची इष्टापत्ती अशी वेगळ्या अर्थाने लाभदायक ठरली! त्यानंतर झालेला सगळा घटनाक्रम पाहिला तर आजतागायत याचा सोक्षमोक्ष लागावा, असे कुणासही वाटत नाही.
पूजा खरेच बोलते असे म्हणणे जेवढे चुकीचे ठरेल, तेवढेच तिचे म्हणणे सर्वस्वी खोटे आहे, असे म्हणणेही सत्यापलाप ठरेल. या सर्व प्रकराणाची मुळे किती खोलवर गेली आहेत, याचा प्रत्यय तेव्हाच आला होता. आता फक्त नावे बाहेर येणे आणि दोषारोप सिद्ध होऊन शिक्षा होणे, एवढेच बाकी आहे, असे जरी वाटत असले तरी ते इतके सोपे नाही.
पूजा नाईकच्या म्हणण्यानुसार तिने प्रत्येक पोलिसस्थानकात ही नावे आधीच सांगितली आहेत. पण, कुठेही ती नावे कागदावर उमटलेली दिसत नाहीत. तिने नावे सांगावीत असे म्हणणे वेगळे आणि सांगितलेल्या नावांची शाई उमटण्याआधीच त्यांचे विरून जाणे वेगळे.
अशा प्रकरणांचा इतिहास पाहता, चार पाच फांद्या व पाने छाटण्यापलीकडे भ्रष्टाचाराच्या वृक्षास हातही लावला जात नाही. अनेकांना सावली देणारा हा वृक्ष मुळापासून उपटणे राजकीय व प्रशासकीय पर्यावरणास हानिकारक ठरते. रोजगाराचे उभे केलेले भ्रमजाल नाहीसे होण्याची भीती असते. म्हणूनच सगळे काही मागल्या दाराने केले जाते!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.