Pooja Naik: ‘तो’ मंत्री अजूनही मंत्रिमंडळात! पूजा नाईकच्या दाव्याने खळबळ; प्रकरणाचे गांभीर्य वाढले

Pooja Naik Minister Allegations: ज्‍या मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याने आपण दिलेले १७ कोटी चोवीस तासांत परत न केल्‍यास त्‍यांची नावे उघड करण्‍याचा इशारा पूजा नाईकने शनिवारी दिला होता.
Pooja Naik Cash For Job
Pooja Naik CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारी नोकऱ्या मिळवून देण्‍यासाठी आपण मंत्री, आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या (पीडब्‍ल्‍यूडी) अभियंत्‍याला १७ कोटी रुपये दिल्‍याचा दावा केल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी पूजा नाईकने ‘तो’ मंत्री विद्यमान मंत्रिमंडळातच असल्याचा गाैप्यस्फोट केला. सोमवारी तिने एका वृत्तवाहीनीशी बोलताना ही माहिती दिली. त्‍यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

‘‘२०१२–१३ मध्‍ये संबंधित मंत्र्याने माझी दोघांशी ओळख करून दिली. सर्वच सरकारी खात्‍यांमध्‍ये नोकऱ्या मिळवून देण्‍याची हमी त्‍या दोघांनी दिल्‍यानंतर मी त्‍यांच्‍याकडे एकूण ६१३ अर्ज आणि १७.६८ कोटी रुपये दिले होते. परंतु, नंतरच्‍या काळात मी ज्‍यांचे अर्ज दिलेले होते, त्‍यांना नोकऱ्या मिळाल्‍या नाहीत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून माझ्‍याकडे वारंवार पैशांची मागणी होऊ लागली.

त्‍याचा त्रास आपल्‍या कुटुंबावर होऊ लागला. त्‍यानंतर मी संबंधित दोघांशी संपर्क साधून त्‍यांना पैसे परत देण्‍यास सांगितले. पण, त्‍यांच्‍याकडून मला केवळ तारखाच मिळू लागल्‍या. त्‍यांनी पैसे परत केलेच नाहीत’’, असे पूजा नाईकने स्‍पष्‍ट केले.

‘‘या प्रकरणात मला पहिल्‍यांदा अटक झाली, त्‍याचवेळी आपण मंत्री सोडून इतर दोघांची नावे क्राईम ब्रॅंचसमोर उघड केलेली होती. त्‍यानुसार क्राईम ब्रांचने कारवाई का केली नाही, हे मला माहीत नाही’’ असे तिने सांगितले. या प्रकरणातील मंत्र्याचे नाव घेऊ शकतेस का? किंवा तो मंत्री मंत्रिमंडळात आहे का? या प्रश्‍‍नांवर ‘‘संबंधित मंत्र्याचे नाव मी आता घेणार नाही. पण, विद्यमान मंत्रिमंडळात तो आहे’’ असेही तिने नमूद केले.

दरम्‍यान, ज्‍या मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याने आपण दिलेले १७ कोटी चोवीस तासांत परत न केल्‍यास त्‍यांची नावे उघड करण्‍याचा इशारा पूजा नाईकने शनिवारी दिला होता.

त्‍यामुळे सोमवारी ती कुणाची नावे घेणार, याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागून होते. पण, त्‍याआधीच रविवारी क्राईम ब्रांचने पुन्‍हा तिची पाच तास चौकशी केली. त्‍यानंतर सोमवारी डिचोली पोलिसांनीही तिला बोलावून घेत, तिचा पुन्‍हा एकदा जबाब नोंदवून घेतला. त्‍यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्‍या मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याचे नाव सोमवारीही गुलदस्‍त्‍यातच राहिले.

कॅश फॉर जॉब प्रकरणी डिचोलीत १ तास चौकशी

रविवारी क्राईम ब्रँचकडून पूजा नाईक हिची चौकशी केल्यानंतर आज (सोमवारी) डिचोली पोलिसांकडून तीची तासभर चौकशी करण्यात आली. डिचोली पोलिस स्थानकाचा हंगामी ताबा असलेले कोलवाळचे पोलिस निरीक्षक संजित कांदोळकर यांच्या उपस्थितीत बंद दरवाजाआड तीची चौकशी करण्यात आली. जबानी नोंद केल्यानंतर पूजा नाईक हिला परस्पर मागील दारातून बाहेर काढून पणजीत नेण्यात आले. तीला परस्पर मागील दाराने बाहेर काढण्याचे प्रयोजन काय, ते मात्र समजू शकले नाही.

पूजाकडून जप्‍त केलेल्‍या एमजी हेक्टर, अमेझ पोलिसांच्‍याच ताब्‍यात

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेक युवक–युवतींना कोट्यवधी रुपयांना लुटलेल्‍या पूजा नाईक हिच्‍याकडून गतवर्षी जप्‍त केलेल्‍या पाचपैकी एमजी हेक्टर आणि होंडा अमेज या दोन अलिशान गाड्या अजूनही म्‍हार्दोळ पोलिसांच्‍याच ताब्‍यात आहेत. तर, बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर आणि वेर्णा या तीन गाड्या मात्र त्‍या ज्‍यांच्‍या नावावर होत्‍या, त्‍यांनी परत मिळवलेल्‍या आहेत, अशी माहिती म्‍हार्दोळचे पोलिस निरीक्षक योगेश सावंत यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

पूजा नाईकने सरकारी नोकऱ्या देण्‍याच्‍या बदल्‍यात आपल्‍याकडून लाखो रुपये उकळल्‍याच्‍या अनेक तक्रारी गतवर्षी म्‍हार्दोळ पोलिसांकडे दाखल झाल्‍या. त्‍याची दखल घेत पोलिसांनी २३ ऑक्‍टोबर २०२४ रोजी तिच्‍या घरावर छापा टाकला. त्‍यात तिच्‍याकडून बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर, एमजी हेक्टर, वेर्णा आणि होंडा अमेज अशा पाच आलिशान गाड्याही जप्त केल्या होत्या. यातील एमजी हेक्‍टर आणि होंडा अमेज या दोन गाड्या तिच्‍याच नावावर असल्‍यामुळे त्‍या अजूनही पोलिसांकडेच आहेत.

Pooja Naik Cash For Job
Pooja Naik: 'ती स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेतेय'; पूजा नाईक प्रकरणात मंत्री ढवळीकर यांचं मोठं विधान

वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्‍हणतात...

1 ‘कॅश फॉर जॉब ’ प्रकरणातील आरोपी पूजा नाईकची सध्‍या क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू आहे. पूजा ज्‍या तिघांनी पैसे घेतल्‍याचा दावा करीत आहे, त्‍यात तथ्‍य असल्‍यास संबंधित मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याने जनतेशी खेळ केला, असाच त्‍याचा अर्थ होईल.

2 पण, दुसऱ्या बाजूला या प्रकरणातून बाहेर पडण्‍यासाठी पूजा कुणाला तरी ‘लक्ष्‍य’ करण्‍याचा प्रयत्‍न करीत असेल, असेही असू शकते. त्‍यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.

3 मुलांना दर्जेदार शिक्षण देताना त्‍यांच्‍या आई–वडिलांना किती त्रास होतो, हे आपल्‍याला माहीत आहे. त्‍यामुळे पूजाने केलेले दावे खरे असल्‍यास या प्रकरणात सहभागी असलेल्‍यांवर ‍कठोर कारवाई होणेच गरजेचे आहे आणि मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत याप्रकरणी योग्‍य न्‍याय देतील, याचा आपल्‍याला विश्‍‍वास आहे.

Pooja Naik Cash For Job
Pooja Naik: 'पूजा'कडून पैसे घेणारे मंत्री, IAS अधिकारी, अभियंता कोण? ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण पेटणार; मुख्‍यमंत्र्यांनी दिली तपासाची हमी

विजय सरदेसाईंची पुन्‍हा टीका

पूजा नाईकने या प्रकरणात सहभागी असलेल्‍यांची नावे वर्षभरापूर्वी क्राईम ब्रॅंचला दिलेली होती. पण, ती आरोपपत्रातून गायब झाली. यातून सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. आता एक मंत्रीच अशाप्रकारच्‍या प्रकरणात फोंडा पोलिसांनी केलेल्‍या तपासावर प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित करीत आहे. या सर्व घटनांमधून भाजप सरकार सरकारी नोकऱ्या विकून गोमंतकीय युवक–युवतींचे भविष्‍य उद्धवस्‍त करीत असल्‍याचेच दिसून येते, अशी टीका आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com