Bhausaheb Bandodkar Birth Anniversary: गोव्यात दरवर्षी १२ मार्च हा दिवस भाऊसाहेब बांदोडकर यांचा जयंती दिन म्हणून साजरा केला जातो. गोव्याचे ते पहिले मुख्यमंत्री. वास्तविक ९ डिसेंबर १९६३ रोजी जेव्हा गोव्याची पहिली निवडणूक झाली तेव्हा भाऊसाहेब रिंगणात नव्हते. मुक्त गोव्यात नवीनच स्थापन झालेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचे ते सदस्यही नव्हते. पण पहिली निवडणूक झाल्यानंतर मगोच्या काही नेत्यांना एका धनाढ्य असामीची गरज भासू लागली. आणि त्यांनी उद्योगपती भाऊसाहेब बांदोडकर यांना पक्षात आणले आणि मुख्यमंत्री केले.
मडकई मतदारसंघाचे तत्कालीन आमदार वसंत वेलिंगकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाऊ सहा महिन्याच्या आत तिथून निवडूनही आले. तेव्हापासून भाऊंची जनतेशी जी नाळ जुळली ती त्यांच्या मृत्यूपर्यंत अबाधित राहिली. उद्योगपती असूनसुद्धा ते सामान्याचे कैवारी बनले. गोव्याच्या गोरगरिबात त्यांनी आपले असे स्थान निर्माण केले. एवढेच नव्हे तर त्यांनी मगोला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दिले.
त्यावेळी मगो व युगोची म्हणजे युनायटेड गोवन्सची ‘कश्मकश’ चालायची. ३० आमदारांत १६ मगो १२ युगो व २ अपक्ष असे सर्वसाधारण समीकरण असायचे. पण जॅक सिक्वेरा, अनंत ऊर्फ बाबू नायक यांसारखे ‘धुरंधर’ नेते युगोकडे असूनसुद्धा भाऊंनी युगोला कधीच ओव्हरटेक करू दिले नाही. भाऊंचे त्या काळात वलयच तसे होते. म्हणूनच तर युगो पक्ष शेवटपर्यंत विरोधातच राहिला. १९६३,१९६७ व १९७२ अशा तीन सलग निवडणुका भाऊंनी मगोला जिंकून दिल्या. भाऊंनाही बंडाळीशी सामना करावा लागला होता. पण भाऊ या बंडाळीला पुरून उरले.
गोव्यात मराठी शाळा सुरू करण्यात भाऊंचा सिंहाचा वाटा होता. भाऊंनी आपल्या कारकिर्दीत अनेक नेते घडविले. वि. सु. करमली, रोहिदास नाईक, जयकृष्ण शिरोडकर, गोपाळ आपा कामत यांसारखे अनेक नेते भाऊंच्या कारकिर्दीत उदयाला आले. ते अगदी पारखून निवड करत असत. माजी आमदार रोहिदास नाईक यांची निवड तर त्यांनी त्यांचे शाळेतले शिकवणे पाहून केली होती. म्हणूनच तर ते निष्ठावंत आमदार घडवू शकले. मात्र गोवा महाराष्ट्रात (Maharashtra) विलीन करण्याचा त्यांचा प्रयत्न चुकीचा होता यात शंकाच नाही.
१९६७साली झालेल्या जनमत कौलात गोव्यातील जनतेने विलीनीकरणविरोधी कौल दिला नसता तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा बनून राहिला असता यातही दुमत असण्याचे कारण नाही. ‘त्यावेळी गरज भासत होती म्हणून आम्ही तसा प्रयत्न केला होता’, असे भाऊंच्या काळातले माजी आमदार रोहिदास नाईक सांगतात. ‘गोवा (Goa) हा छोटा प्रदेश असल्यामुळे तो स्वतंत्र राहू शकणार नाही असे वाटल्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या जवळ असलेल्या महाराष्ट्रात त्याचे विलीनीकरण व्हावे असे आम्हांला त्यावेळी वाटले म्हणून आम्ही तसा प्रयत्न केला’, असे रोहिदास नाईक म्हणतात. पण काही का असेना, मगोचा तो प्रयत्न चुकीचा होता हे काळानेच दाखवून दिले आहे. लोकांना विलीनीकरण नको होते, पण भाऊ हवे होते!
विलीनीकरणाचा प्रयत्न जरी अंगलट आला असला तरी भाऊंच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडला नाही. जनमत कौलानंतर लगेच झालेल्या निवडणुकीत भाऊंचा मगो परत एकदा बहुमताने निवडून येऊन भाऊ मुख्यमंत्री बनले. याचा अर्थ जनता विलीनीकरणाच्या विरोधात होती, भाऊंच्या विरोधात नव्हती असाच होतो. भाऊंनी शेवटपर्यंत जनताभिमुख राज्य केले.
म्हणूनच तर आजसुद्धा भाऊंची उणीव भासत आहे. ‘बहुजन समाजाचा नेता’ म्हणून बिरुद लावणारे भाऊ हे पहिले नेते. आणि रवि नाईकांचा थोडाफार अपवाद वगळता असा नेता नंतर गोव्याला मिळाला नाही हेही तेवढेच खरे! १२ ऑगस्ट १९७३ रोजी भाऊंचे आकस्मिकपणे निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने जी राज्याच्या राजकारणात पोकळी झाली ती अजूनही कायम आहे. मुख्य म्हणजे तोपर्यंत ‘टॉप’वर असलेला मगो पक्ष त्यांच्या निधनानंतर उतरणीला लागला. त्यांची मुलगी शशिकलाताई काकोडकर यांनी नंतर सात वर्षे राज्य केले असले तरी विझण्यापूर्वी दिवा जसा मोठा होतो तशातला तो प्रकार होता. म्हणूनच तर १९८०सालानंतर मगो पक्ष कधीच सत्तेवर येऊ शकला नाही. आता तर मगो पक्ष नावापुरताच शिल्लक राहिला आहे. आणि यामुळेच भाऊंचे महत्त्व आजही अधोरेखित होत आहे.
लक्षात घ्या भाऊ जेव्हा सत्तेवर आले तेव्हा गोवा अगदी प्राथमिक स्वरूपात होता. अनेक त्रुटी होत्या, साधनसुविधांचीही वानवा होती. पण अशा परिस्थितीतही भाऊंनी आदर्श राज्य केले. त्यामुळेच त्यांना ‘गोव्याचा भाग्यविधाता’ म्हणून संबोधले जाते. मुख्यमंत्री असूनसुद्धा सामान्यात मिसळणारा, त्यांच्या सुखदुःखांचा साथीदार होणारा असा नेता अशी त्यांची ओळख बनली होती आणि त्यांना जाऊन ५३ वर्षे झाली असली तरी त्यांची ती ओळख कायम आहे. मडकई मतदारसंघात मगोने दगड ठेवला तरी तो निवडून येईल असे ते त्या काळात छातीठोकपणे सांगायचे. आणि त्यांचा तो विश्वास त्या मतदारसंघातले मतदार आजही सार्थ ठरविताना दिसत आहेत. याच करता त्यांचा पर्याय आजही सापडलेला दिसत नाही. म्हणूनच भाऊंच्या जयंतीदिनी त्यांच्या स्मृतींना वंदन करत असताना भविष्यात गोवा राज्याला भाऊसारखा एखादा निष्काम कर्मयोगी नेता मिळो हीच प्रार्थना!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.