
फोंडा: बांदोडा येथील काशी मठाच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानाला आता नवा साज चढविला आहे. मुख्य वॉकिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे कामही पूर्ण झाले असून रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा ट्रॅक लोकांकरता खुला केला जाणार आहे. सध्या हे मैदान म्हणजे फोंडा तालुक्याचे आकर्षण ठरले आहे.
शहर परिसरात क्रीडा खात्याचे मैदान असूनही लोक वॉकिंग करता बांदोडकर मैदानाला प्राधान्य देताना दिसत आहेत. हे मैदान निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे अनेक लोकांची पावले या मैदानाकडे वळत आहेत. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ हे मैदान गर्दीने फुलून गेलेले दिसते.
मैदानावर वॉकिंग करता दोन ट्रॅक असून एकावर टर्फ घालण्यात आला आहे दुसरा सुबक दगड घालून सजविला आहे. त्यामुळे पहिल्या ट्रॅकवर उघड्या पायांनी चालता येते तर दुसऱ्या ट्रॅकवर चप्पल वा बूट वापरता येतात.
त्याशिवाय सभोवताली विविध प्रकारची झाडे लावल्यामुळे या मैदानाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरता खास व्यवस्था करण्यात आली असून चालताना थकल्यास या जागी विश्रांती घेता येते.
त्याशिवाय योगा, प्राणायाम करण्याकरता सुद्धा या मैदानात खास सोय केलेली आहे. खेळाडूंना खेळण्या करताही या मैदानात ''खास'' जागा ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय वॉकिंग ट्रेकला जोडून असलेल्या इमारतीत सभागृह असून तिथे अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मैदान गेल्या दहा वर्षात प्रसंगानुरूप बदलत गेले आणि त्यामुळे या मैदानातला ताजेपणा कायम राहिला. सकाळच्या प्रहरी या मैदानावर वॉक करणे म्हणजे एक आल्हाददायक अनुभव असल्याचे या मैदानावर वॉकिंग करता नियमितपणे येणारे अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात.
गेला महिना दीड महिना नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मुख्य ट्रॅक वॉकिंग करता बंद होता. आता तो परत सुरु होणार असल्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भाऊसाहेब बांदोडकर मैदानाचे शिल्पकार वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांचे नाव घेतले जाते. या मैदानाला सुरवातीला अनेक थरातून विरोध होत होता. पण या विरोधाला तोंड देत ढवळीकर यांनी हे मैदान अस्तित्वात आणलेच आणि त्याचा फायदा आज नागरिकांना होत आहे. त्यावेळी ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. त्यामुळे बांदोडकर मैदान आजही सांबाखाकडे आहे. सुदिन या मैदानाच्या व्यवस्थापनात जातीने लक्ष घालताना दिसतात. त्याशिवाय वेळोवेळी ते इथे येणाऱ्या नागरिकांकडून ‘फीडबॅक’ ही घेताना दिसतात. त्यामुळेच हे मैदान काळानुसार कात टाकताना दिसत आहे.
भाऊसाहेब बांदोडकर मैदानामुळे ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान निश्चितच वाढले आहे. इथे सकाळी वॉकिंग केल्यानंतर एक नवा हुरूप पैदा होतो आणि दिवस उल्हासात जातो. त्यामुळे हे मैदान म्हणजे ज्येष्ठांना एक वरदान ठरत आहे एवढे निश्चित.
अजित गावणेकर, ज्येष्ठ नागरिक, पाटणथळी-बांदोडा
बांदोडकर मैदानावर वॉकिंग केल्यानंतर मन अगदी ताजेतवाने होऊन जाते. काम करायला जोष निर्माण होतो. असे परिपूर्ण मैदान देऊन आम्हा फोंड्यातील नागरिकांची सोय केल्याबद्दल स्थानिक आमदार तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांचे विशेष आभार.
सुदाम गावकर, ढवळी - फोंडा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.