
रमाकांत खलप
‘स्वयमेव मृगेंद्रता’ लाभलेल्या व्यक्तीला राजा असण्याचे ढोल पिटावे लागत नाहीत. ‘हा सिंह आहे, राजा आहे’, हे इतर सर्वांना ते आपोआप उमजत जाते. तिथे कुणी त्याची पात्रता जोखीत बसत नाही, आवश्यकताही नसते. गोव्याला सिंहाइतकाच धाडसी, भव्य आणि राजेशाही माणूस लाभला होता. हो, नि:संशय मी भाऊ ऊर्फ भाऊसाहेब ऊर्फ दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांच्याविषयीच बोलत आहे!
रूढार्थाने ‘राजकारणी’ म्हणून यशस्वी होण्यासाठी लागणारे भाऊंपाशी तसे काय होते? अनपेक्षितपणे भारतीय संघराज्यातील एका उदयोन्मुख लोकशाही प्रदेशाच्या नेत्याच्या पदावर आणले, लोकांनीही पुन्हा त्यावर आपली मोहोर उठवली, त्यांच्यात असे काय होते?
याची उत्तरे कदाचित त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये डोकावल्यास मिळू शकतील. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नियतीने त्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावून घेतले.
त्यांचे वडील बाळकृष्ण यांनी कर्ज फेडू न शकल्याच्या निराशेत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर दयानंद यांना लहानपणीच स्वतःचे नशीब घडवावे लागले. त्यांनी लहानपणीच छोटे उद्योग चालवले, लाकूड व्यापारात गुंतले आणि मोठे झाल्यावर खाणकामाच्या भाडेपट्ट्यात भागीदारी केली. तो एक महत्त्वाचा टप्पा होता आणि लवकरच ते एका वाढत्या खाण उद्योगाचे मालक बनले. त्यामुळे या तरुण उद्योजकाला पैसा आणि ओळख मिळाली. त्याआधी युवकांचे नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे चालत आले.
क्रिकेटप्रमाणे शिकारीवरही खूप जीव होता. सत्तरी, सांगे, केपे आणि इतरत्र दाट जंगलात शिकार मोहिमांवर जाणे होत असे. साहजिकच धनगर, कुणबी आणि वेळीप यांसारख्या वनवासींशी त्याचे जवळचे संबंध निर्माण झाले.
गरीब, दुर्बल आणि दीन लोकांच्या हातात नकळत थोडे पैसे देणे नित्याचे होते. गरिबीमुळे आपल्याला शिकता आले नाही, याचे दु:ख करत बसण्याऐवजी त्यांनी गरजू हुशार विद्यार्थ्यांना मदत केली. त्यांच्या शिक्षणात आपण शिकल्याचे समाधान त्यांना गवसत असे. जाता जाता ते कोणत्याही शाळेत पाऊल ठेवत असत, शिक्षकांशी मैत्री करत आणि लहान मुलांसोबत वेळ घालवत.
१९५४-५५च्या दरम्यान अशाच एका घटनेचा मी साक्षीदार आहे. मी तेव्हा दुसरी किंवा तिसरी इयत्तेत शिकत होतो.
‘एका शिकारीने कावळ्यांना मारल्यानंतर झाडावर किती कावळे शिल्लक राहिले?’ आणि ‘एक टन लोखंड आणि एक टन कापसाने भरलेल्या मोठ्या पिशवीतील वजनातील फरक ओळखणे’ या दोन अवघड प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याबद्दल बक्षीस म्हणून त्यांच्या हस्ते मूठभर मिठाई, पुस्तके आणि पेन्सिल मिळाल्याचे मला स्पष्टपणे आठवते. अशाप्रकारे गोवा मुक्त होण्यापूर्वी, गोव्याच्या अनेक भागांत ‘भाऊसाहेब’ हे नाव घराघरांत लोकप्रिय होते.
स्वातंत्र्यसैनिकांसोबत लढणारे, सुधारणावादी, दुर्बल आणि दलितांच्या मुक्तीसाठी चळवळीचे नेतृत्व करणारे शेजारच्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या ते संपर्कात आले. सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी हे त्रिमूर्ती त्यांचे आदर्श बनले.
महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांच्या चरित्रांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. शेजारील राज्यांच्या ग्रामीण भागांत वाहणारे बदलाचे वारे, होणारे सत्तेच्चे विकेंद्रीकरण या गोष्टींचे होणारे सकारात्मक परिणाम त्यांना अनुभवास येऊ लागले होते. त्यांची सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय जडणघडण, त्यांच्याही नकळत होत गेली.
या सर्व गोष्टी व त्यांच्या जन्मजात शौर्य, परोपकार आणि सुधारणावादी दृष्टिकोनाच्या गुणांनी त्यांना एक नेता बनवले होते. गोवा मुक्त झाल्यानंतर एके दिवशी पणजीतील विठ्ठल बबलो नाईक यांच्या घरी जमलेल्या कार्यकर्त्यांचा एक गट त्यांच्याकडे एकमुखाने वळला आणि त्यांना ‘महाराष्ट्रवादी संघटने’चा नेता होण्याची विनंती केली.
यातले बहुतेक जण भाऊसाहेबांप्रमाणे काँग्रेसी होते. पुरुषोत्तम काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून हे लोक एकत्र आले होते. कोकणी भाषेसह मराठीला अधिकृत भाषा म्हणून स्वतंत्र दर्जा देण्याची त्यांची वेगळी विचारसरणी होती.
बहुसंख्य (आणि प्रामुख्याने हिंदू) लोकांचा असा दृष्टिकोन होता की गोवा हा शेजारच्या महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे, कारण भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधांव्यतिरिक्त दोन्ही राज्यांमध्ये मराठी ही त्यांची भाषा होती. भाऊसाहेबांनी नेतृत्वाचा स्वीकार प्रारंभी संकोचाने केला; पण लवकरच ते सक्रिय झाले.
पुढील एका दशकापेक्षा कमी काळात त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचे आणि दूरदृष्टीचे दर्शन अनेकांना घडले. राजमान्य झाले, लोकमान्य झाले. त्यांनी लोकांची मने आणि मते अशा प्रकारे जिंकली की स्थानिक काँग्रेसच्या उच्चभ्रू नेतृत्वाचाच पराभव झाला नाही तर जवाहरलाल नेहरूंसारख्यांना विस्मयचकित होऊन म्हणावे लागले, ‘कितने अजीब हैं गोवा के लोग!’
सत्तेत आल्यानंतर, बांदोडकर यांनी जमीन सुधारणा आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा जलद कार्यक्रम सुरू केला. त्यांनी जवळ जवळ सर्व क्षेत्रांत विकासाचा पाया घातला. उद्योग, पर्यटन, शेती, सिंचन, रस्ते, पूल आणि विकासाच्या इतर प्रत्येक क्षेत्राला त्यांच्या जादूई स्पर्शाचा लाभ झाला.
जमीन कसणाऱ्या मुंडकारांच्या हातांना त्यांनी स्थैर्य दिले. उपजीविकेच्या किंवा निवाऱ्याच्या संरक्षणाच्या कोणत्याही अधिकाराशिवाय जमीन मालकांच्या घरात राहणाऱ्यांना बेदखल होण्यापासून कायदेशीर संरक्षण मिळाले.
त्यांनी कला, नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या आश्रयाखाली साहित्यिक चळवळी भरभराटीला आल्या. लेखक, कवी, गायक, नर्तक, शिल्पकार आणि चित्रकार यांना राजाश्रय देणारा लोकनेता लाभला. घरी आलेल्याचे आदरातिथ्य करण्यासोबतच दुर्गम, ग्रामीण भागातील लोकांच्या घरी जाऊन मीठभाकर खाणारा त्यांचा आप्त, मोठा भाऊ गोव्याला लाभला होता.
स्वातंत्र्यानंतरची पहिली सार्वत्रिक निवडणूक त्यांनी लढवली नाही. पण, त्यांनी काँग्रेस पक्षाने उभ्या केलेल्या श्रीमंत, बलाढ्य जमीनदार आणि खाण मालकांविरुद्ध सामान्य कष्टकरी आणि शेतकरी यांना उभे केले.
त्यांनी मोरजी येथील काशीनाथ शेटगावकर या शेतकऱ्याला त्याच्या भातशेतातून उचलले आणि त्याला चक्क धेंपे उद्योगसमूहाचे मालक वसंतराव धेंपे यांच्याविरुद्ध आणि कोरगाव येथील चहाच्या दुकानाचे मालक विजय कामुलकर यांना पेडणे येथील बलाढ्य जमीनदार राऊ राजे देशप्रभू यांच्याविरुद्ध उभे केले. या दोन्ही नवख्या, दुबळ्या लोकांनी बहुश्रुत, शक्तिशाली परिचितांना धूळ चारली; हा भाऊसाहेबांचा परीसस्पर्श होता!
शिक्षण, घराणे, श्रीमंती यावरून व्यक्ती जोखणाऱ्या उच्चभ्रूंना भाऊसाहेबांचे महत्त्व थोडे उशिरा लक्षांत आले. पण, भाऊसाहेबांजवळ ही वैचारिक अस्पृश्यता नव्हती. त्यांनी पी. पी. शिरोडकर आणि गोपाळ आपा कामत यांसारखे स्वातंत्र्यसैनिक, कृष्णा बांदोडकर आणि दुलो कुट्टीकर यांसारखे आदिवासी, गावडा समाजाच्या लोकांना आपले उमेदवार म्हणून निवडले.
त्यांनी अच्युत उसगावकर आणि वसंत जोशींसारखे सारस्वत ब्राह्मण, शांताराम कांबळींसारखे अनुसूचित जातीचे, कृष्णनाथ बाबूराव नाईकांसारखे भंडारी, प्रतासिंग राणे आणि दत्ताराम देसाई यांसारखे मराठे आणि टोनी फर्नांडिस आणि अँथनी डिसोझांसारखे ख्रिश्चन यांना उमेदवारी दिली.
शिक्षित-अशिक्षित, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेद न पाहता त्यांनी केवळ त्यांच्यात गोव्याची, गोमंतकीयांंची कामे करण्याची तळमळ आहे की नाही एवढेच पाहिले. या सर्व धाग्यांनी त्यांचे अंगभूत कौशल्य, अनुभव, संस्कृती आणि नीतिमत्ता एकत्र ओवून गोव्याचे ऐक्य जपणारे, भरजरी वस्त्र विणले!
बांदोडकरांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्याची मागणी केली होती. त्यांच्यातील खऱ्या लोकशाहीवादी व्यक्तीने १९६७मध्ये केंद्र सरकारचा जनमत चाचणी घेण्याचा निर्णय स्वीकारला. मुक्त आणि निष्पक्ष जनमत चाचणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी बांदोडकर यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
निकाल त्यांच्या विरोधात लागला. त्यांनी तो पराभवही खिलाडूपणे स्वीकारला. त्यानंतरच्या निवडणुकीत ते विजयी होऊन आधीच्यापेक्षा जास्त बहुमताने विधानसभेत परतले. लोकांना भाऊंची भूमिका नको होती; पण, त्यांचे भाऊ त्यांना हवेच होते! भाषेच्या मुद्द्यावर त्यांची स्पष्ट भूमिका होती. ’मराठी ही माझी मातृभाषा आहे’ असे त्यांनी विधानसभेत जाहीर केले.
त्याच वेळी त्यांनी कोकणीचा द्वेष केला नाही. तिच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली. कदाचित कोकणी लोकांना खूश करण्यासाठी त्यांनी विधानसभेत प्रचंड बहुमत असूनही मराठीला अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यासाठी राजभाषा कायदा लागू केला नाही.
खरे तर, ९ जानेवारी १९६४ रोजी - गोव्याच्या पहिल्या विधानसभेच्या पहिल्या दिवशी - अधिकृत भाषा कायदा लागू करून भाषेचा प्रश्न सोडवण्याची मागणी स्वर्गीय डॉ. जॅक सिक्वेरा करत होते. त्याचबरोबर, मराठीप्रेमींना नाराज करणारे, स्व. दत्ताराम चोपडेकर यांनी मांडलेले, खाजगी सदस्य विधेयकही भाऊंनी बाजूला ठेवले.
भाऊंनी त्यांच्या कडवट, कट्टर टीकाकारांशीही मैत्रीचे, जवळचे संबंध ठेवले. यात डॉ. जॅक सिक्वेरा यांचाही समावेश होता. विधानसभेतील या दोन दिग्गजांमधील कटू संघर्ष आणि त्यानंतर त्यांनी एकत्र केलेल्या मासेमारीचा आपण साक्षीदार असल्याचे शरद पवार यांनी एका भाषणात सांगितले होते.
भाऊंनी त्यांच्या लाडया पणजी जिमखान्यात टेबल टेनिस खेळल्यानंतर अखेरचा श्वास घेतला. माझ्यासाठी ते धक्कादायक होते. माझा बालपणीचा मित्र पिंटो सायकलवरून माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘रामा, आता तू त्यांच्या जागी उमेदवार आहेस.’ मी अजून सावरलोच नव्हतो. डोळ्यांत अश्रूंसोबत भाऊंच्या अनेक आठवणी तरळत होत्या.
मला लहानपणी बक्षीस देणारे भाऊ, क्रिकेट खेळणारे भाऊ, धारगळ येथील शांतादुर्गेच्या मंदिर परिसरात ज्ञानेश्वरीचा उपदेश सांगणारे भाऊ, गोवा मुक्त झाल्यानंतर पोर्तुगीज तुरुंगातून सुटल्यानंतर तेलो मस्कारेनहास आणि मोहन रानडे यांच्या सन्मानार्थ आयोजित एका विशाल सभेला संबोधित करणारे भाऊ, मांद्रे येथे माझ्या काकांच्या कोबीच्या शेतांची पाहणी करणारे भाऊ. एकच व्यक्ती; किती रूपे, किती विचार!
काही महिन्यांनंतर एमजीपीच्या एका संतप्त नेतृत्वाला, ज्यांना ही पोकळी भरून काढण्यासाठी योग्य पर्याय सापडला नाही, त्यांनी अनपेक्षितपणे मला त्यांच्या मांद्रे मतदारसंघातून त्यांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि भाऊंचा वारसा पुढे नेण्यासाठी उभे केले! वास्तविक, मी या महान माणसाचा एक कमकुवत पर्याय. त्यांच्याच प्रकाशवाटांवर ही वाटचाल सुरू आहे. मगो पक्षाचे राजकीय चिन्ह सिंह; पण ते स्वत:च गोव्याचे खरे सिंह होते!
गोव्याच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्यांच्या पवित्र स्मृतीला माझी श्रद्धांजली!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.