रूपेश पाटकर
जर परमेश्वर आनंदस्वरूप आहे, तर तो जगात दुःख निर्माणच का करतो? तो परमपिता आपल्या मुलांना संकटापासून वाचवत का नाही? पापी लोकांना पाप करण्यापासून थांबवत का नाही? त्याची ती लीला आहे म्हणून मला सांगू नका.
कारण मग आपल्या मुलांना दुःखात लोटून लीला करणाऱ्या तुमच्या देवात आणि रोमला आग लावून फिडेल वाजवत बसणाऱ्या सम्राट नीरोत काय फरक राहील?
तुमचा परमेश्वर परीक्षा घेतो म्हणाल तर दीडदोन वर्षाचे काहीही कळत नसलेले मूल उपासमारीने मरते तेव्हा तो त्याची कोणती परीक्षा घेत असतो? ज्याची परीक्षा घेतली जातेय, त्याला कळायला तर हवे ना.’ भगतसिंगांच्या या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकलो नाही.
भगतसिंगांच्या मृत्यूची तारीख निश्चित झाली होती. २४ मार्च १९३१ला त्यांना फाशी दिले जाणार होते. तथापि आदल्या दिवशी संध्याकाळीच त्यांना फाशी देण्याचा हुकूम जेलरला आला.
जेलर जेव्हा त्यांना फाशीच्या तक्ताकडे नेण्यासाठी त्यांच्या कोठडीत पोचला तेव्हा त्याला दिसले की भगतसिंग एक पुस्तक वाचत आहेत. ते रशियन क्रांतिकारक लेनिन यांचे ‘शासन संस्था आणि क्रांती’ हे पुस्तक वाचत होते. तुम्ही किंवा मी त्यांच्याजागी असतो तर फाशीच्या आदल्या दिवशी असे एखादे पुस्तक वाचू शकलो असतो काय? ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था गाठल्याशिवाय हे शक्यच नाही.
आज आम्ही त्यांचा उदोउदो करतो. पण त्यांच्या काळात किती लोकांपर्यंत त्यांचं बलिदान कळलं असेल? किती लोकांनी त्यांचं कौतुक केलं असेल? आणि मृत्यूची किंमत चुकवून कोण माणूस अशी प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करील?
त्यामुळे प्रतिष्ठेचं, नावलौकिकाचं प्रलोभन त्यांच्यापुढे नव्हतेच कधी हे साहजिक आहे. उलट ते म्हणतात, एवढ्या छोट्याशा आयुष्यात ‘इंकिलाब झिंदाबाद’ ही घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवली हीच या जीवनाला खूप मोठी किंमत मिळाली.
त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून लिहिले, ‘माझ्या गळ्याभोवती ज्या क्षणी फास आवळला जाईल, त्याचक्षणी मी या कटकटीतून सुटेन, पण तुम्हांला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमचा संघर्ष अधिक खडतर असणार आहे!’
ते आणखी एका ठिकाणी लिहितात, क्रांती म्हणजे बॉंब आणि बंदुकांचा संप्रदाय नव्हे. आम्ही ‘क्रांती’ या शब्दाला पवित्र मानतो. माणसाचे माणसाकडून होणारे शोषण थांबवणे म्हणजे क्रांती! त्यांच्या या वाक्याने मला आणखी एकदा हादरविले.
कारण त्याआधी माझी अशी धारणा होती की क्रांती म्हणजे सशस्त्र संघर्ष, क्रांती म्हणजे परकीय सत्ताधाऱ्यांना सशस्त्र उठाव करून घालवून देणे. आपल्या देशावर आपल्याच लोकांचे राज्य असावे यासाठी शस्त्र हाती धरणे.
पण भगतसिंग क्रांतीची पार वेगळी व्याख्या सांगत होते. ‘माणसाने माणसाचे चालवलेले शोषण थांबवणे म्हणजे क्रांती!’ ते रोकडा प्रश्न विचारत होते, लॉर्ड आयर्नविनच्या जागी तेज बहाद्दुर सप्रू जाऊन बसले म्हणून काय फरक पडणार?
त्यांच्या काळात कदाचित माझ्यासारख्या सामान्य जनतेला त्यांना काय म्हणायचे होते ते लक्षात आले नसेल. पण आज त्यांना काय म्हणायचे होते ते अनुभवाने आपल्या लक्षात येतेय. राज्यकर्त्या माणसांचा रंग, वंश, धर्म बदलून काहीही फरक पडत नाही.
त्यामुळेच ब्रिटिश वंशाच्या सॉन्डर्सवर पिस्तूल चालवणारे भगतसिंग अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर लिहितात. अस्पृश्याकडून जाहीरपणे हार घालून घेणारे नेते त्यानंतर स्वतःच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी नेसत्या वस्त्रानिशी स्नान करतात, यातील पाखंड ते मांडतात.
आपल्याच देशातील, आपल्याच धर्मातील घटकांना आपलेच लोक सामूहिक गुलामीत ठेवतात हे त्यांच्या क्रांतिकारक नजरेतून सुटत नाही. ते साहित्याच्या प्रश्नावर लिहितात, भाषेच्या प्रश्नावर लिहितात. जगातील वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांचा अभ्यास करून त्यावर लिहितात. आयर्लंडच्या मुक्तीलढ्यातील आयरीश क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राचा अनुवाद करतात.
’बहिऱ्यांना ऐकू जाण्यासाठी’ म्हणून त्यांनी सेंट्रल असेंब्लीत बॉंब फेकला. त्यांना राज्यकर्त्या बहिऱ्यांना काय ऐकवायचे होते?
सरकार पास करू इच्छित असलेल्या ‘ट्रेड डिस्प्युट बिल’ आणि ‘पब्लिक सेफ्टी बिल’ या बिलांना जनतेचा विरोध आहे, हेच ते सांगत होते. ट्रेड डिस्प्युट बिल कामगारांच्या हक्कांवर गदा आणत होते. कामगारांना वाटेल तसे पिळून घ्यायला भांडवलदारांना खुला परवाना देण्यासाठीच हे बिल होते.
शोषित अन्यायग्रस्त समाज प्रतिक्षिप्त क्रियेसारखा बंड करून उठत असतो. पण त्याच्या बाजूने युद्धात उतरणाऱ्याला मात्र जाणीवपूर्वक उतरावे लागते. गीता म्हणते,
’गुंतूनि करिती अज्ञ ज्ञात्याने मोकळेपणे।
करावे कर्म तैसे चि इच्छुनि लोकसंग्रह।
भगतसिंग कष्टकरी कामगार शेतकऱ्यांच्या बाजूने धर्म युद्धात उतरले होते.
भगतसिंगांना कामगारांचं, शेतकऱ्यांचं, अस्पृश्यांचं दुःख स्वतःचं वाटत होतं. हीच सर्वव्यापित्वाची अनुभूती होती.
खरं तर वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचं घराणं समृद्ध श्रीमंत होतं. त्यांना कशाचीच ददात नव्हती. पण त्यांनी घर सोडून फकिरी पत्करली. कधी एखाद्या पेपरच्या कचेरीत तर कधी एखाद्या झाडाखाली. कित्येक दिवस तर ते अर्धपोटी राहिले. हे संन्यासी जीवन होते!
असेंब्लीत बॉंबस्फोट केल्यानंतर त्यांनी स्वतःला अटक करवून घेतली आणि लगेचच त्यांच्या बहुतेक सहकाऱ्यांनादेखील अटक करण्यात आली. जे पकडले गेले नाहीत असे चंद्रशेखर आझाद अल्फ्रेड पार्कमधील चकमकीत हुतात्मे झाले तर दुसरे एक साथी भगवतीचरण हातात बॉंब फुटून शहीद झाले.
त्यांची सगळी संघटना संपल्यासारखी झाली. खरे तर ही निराशा आणणारी स्थिती होती, पण भगतसिंग निराश नव्हते. त्यांचे म्हणणे होते की जोपर्यंत समाजात शोषण आहे, वर्ग आहेत, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाहीत. कधीकधी हरायला होईल, सगळे थंडावले असे वाटेल. पण पुन्हा शोषित उसळी मारतील. जगाचा इतिहास हेच तर दाखवत आलाय.
मृत्यूला हा माणूस अक्षरशः हसत सामोरा गेला. थोडेसेच आयुष्य जगला, पण रसरसून जगला. रडगाणी, वैयक्तिक तक्रारी हे त्याच्या मनात औषधापुरतंदेखील नव्हते. गरीब कष्टकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठीच तो इंकिलाब आणत होता. सर्वांचे दुःख आपलं मानल्यामुळे त्याला स्वतःचं दुःख उरलं नाही.
ज्या ज्या वेळी माझं मन निराश होतं, परिस्थितीला शरण जाऊ पाहते, त्या त्या वेळी भगतसिंग माझा आधार बनतात. त्यांची आठवण मला माझ्या प्रत्येक विचलिततेनंतर धर्ममार्गावर यायला प्रवृत्त करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.