Bhagat Singh: भगतसिंग यांचे 'तरुण' आणि 'राजकारण' याबाबत काय विचार होते?

Bhagat Singh History: भगतसिंगांनी तरुणांबद्दल बरेच लेख लिहिले आहेत. या लेखांमध्ये त्यांनी तरुण, त्यांची बदलासाठी असणारी गरज आणि राजकारण याबद्दल भाष्य केले आहे.
Bhagat Singh Quotes,  Bhagat Singh Letters
Bhagat Singh Political ThoughtsDainik Gomantak
Published on
Updated on

Bhagat Singhs View on Youth And Politics

हम तो घर से निकले ही थे बाँधकर सर पे कफ़न,

जान हथेली पर लिये लो बढ चले हैं ये कदम

जिन्दगी तो अपनी मेहमान मौत की महफ़िल में है,

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

23 मार्च 1931 रोजी भारताच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू ही तीन महान क्रांतिकारक हसत हसत फाशी गेले. या क्रांतिकारकांनी त्यांच्या कार्यातून आणि बलिदानातून देशासमोर समर्पणाचा आदर्श ठेवला आणि प्रेरणा दिली .

या तीनही क्रांतिकारकांनी लहान वयात देशासाठी निधड्या छातीने मृत्यूला कवटाळले . सरदार भगतसिंगाचे वय अवघे 23 वर्षे होते. इतक्या कमी वयातही त्यांचे विचार, त्यांचे देशातल्या स्थितीचे आकलन, त्यांचे लिखाण प्रेरणादायी होते.

त्यांच्या या आकलनाबद्दल भगतसिंग अनेक वृत्तपत्रातून लिहीत असत. गुलामगिरीत अडकलेल्या देशाची स्थिती, तरुण, राजकीय व्यवहार याविषयी त्यांनी लिहिलेले लेख ही आजच्या काळातही तंतोतंत लागू आहेत. भगतसिंगांनी तरुणांबद्दल बरेच लेख लिहिले आहेत. या लेखांमध्ये त्यांनी तरुण, त्यांची बदलासाठी असणारी गरज आणि राजकारण याबद्दल भाष्य केले आहे.

तरुणांच्या मानसिकतेबद्दल बोलताना त्यांनी मतवाला (कलकत्ता)मध्ये लिहिले आहे की ,

'युवावस्था मानवी जीवनाचा वसंत काळ आहे. ही अवस्था गाठताच माणूस 'धुंद' होऊन जातो. हजारो मद्यचषकांची नशा त्याला चढते. विधात्याने दिलेल्या सगळ्या शक्ती सहस्रधारांनी उसळून येतात. युवावस्था ही मदांध हत्तीप्रमाणे निरंकुश, वर्षाऋतूमधील रोंरावत्या नदीप्रवाहाप्रमाणे अनावर, प्रलय-कालीन सर्वग्रासी झंझावाताप्रमाणे झपाटलेली, नवेल्या वसंताच्या पहिल्या फुलराणीच्या कलिकेसमान कोमल, ज्वालामुखीप्रमाणे उद्रेकी आणि भैरवी संगीताप्रमाणे मधुर अवस्था आहे.'

भगतसिंगांनी तरुणांची ताकत ओळखली होती आणि या ताकदीचा योग्य ठिकाणी वापर व्हावा असे त्यांचे म्हणणे होते. यात पुढे ते म्हणतात की ,

'युवावस्थेमध्ये माणसासाठी केवळ दोनच मार्ग आहेत तो चढू शकतो उन्नतीच्या सर्वोच्च शिखरावर किंवा तो पडू शकतो अधःपाताच्या खोल अंधाऱ्या खाईमध्ये. वाटले तर त्यागी होऊ शकतो युवक, वाटले तर तो विलास होऊ शकतो. तो देव बनू शकतो आणि पिशाचही बनू शकतो. तो जगाला त्रस्त करु शकतो, तोच जगाला अभयदानही देऊ शकतो.'

युवक जगाचा इतिहास बदलू शकतात असे भगतसिंगांचे मत होते. या लेखात ते नमूद करतात की तुम्हाला विशाल हृदय बघायचे असेल तर तुम्ही तरुणांच्या हृदयाकडे बघा. मोठमोठी साम्राज्ये उलथून टाकण्याची आणि देशाचा चेहरामोहरा बदलण्याची अद्भुत ताकत युवकांना लाभली आहे याचा भगतसिंगांनी पुनरुच्चार केला आहे.

पारतंत्र्यात जखडेलेल्या तरुणाईला स्वातंत्र्ययुद्धासाठी हाक मारताना ते या लेखात म्हणतात की, 'हे भारतीय तरुणा! तू का गोंधळाच्या झोपेत निश्चिंत घोरत पडला आहेस? ऊठ. डोळे उघड. बघ, पूर्व दिशेला ललाट रक्तरंजित झाले आहे. आता आणखी झोपू नकोस. झोपायचे असेल तर अनंत निद्रेच्या कुशीमध्ये जाऊन झोपी जा. भ्याडपणाच्या बाहुपाशात का झोपतो आहेस? माया-मोह-ममतेचा त्याग करून गर्जना करत उठ.'

तरुणांनी राजकारणात सक्रिय राहावे , त्यांना भवतालाचे ज्ञान असावे याबाबत भगतसिंग आग्रही होते. क्रांतीपर्वात तरुणांचा सहभाग असावा याबाबत भगतसिंगांनी अनेकदा लिहिले आहे . 1928 साली किरतीमध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी विद्यार्थी आणि राजकारण याबद्दल आपली स्पष्ट मते मांडली आहेत. त्याकाळी विद्यार्थी तरुणांनी राजकारणात सहभागी होऊ नये असा प्रचार केला जात होता. या प्रचाराला उत्तर देणारा हा लेख फार महत्वपूर्ण आहे.

'जे नवयुवक देशाची धुरा सांभाळणार आहेत, त्यांची बुद्धी आजच पंगू बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात याचे काय परिणाम होतील हे आपणच समजून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे मुख्य काम शिक्षण घेणे हे आहे, हे आम्हाला मान्य आहे आणि त्यांनी आपले पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करावे; पण देशाच्या सद्यःस्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्याचे उपाय यांचा विचार करण्याची क्षमता विकसित करणे याचा शिक्षणात समावेश असू नये? आणि जर असे नसेल, तर जे शिक्षण फक्त कारकून बनण्यासाठी घेतले जाते, त्या शिक्षणालाही आम्ही निरुपयोगी मानतो. अशा शिक्षणाची मग गरजच काय? '

Bhagat Singh Quotes,  Bhagat Singh Letters
Freedom Fighter: गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग कुंकळ्ळीकरांचे वृद्धापकाळाने निधन

शिक्षणसह, व्यवहारज्ञान, समाजभान असणाऱ्या देशसेवकांची राष्ट्राला गरज आहे असे त्यांनी या लेखात नमूद केले आहे. पुढे ते म्हणतात की देहभान हरपून देशासाठी आयुष्य समर्पित करतील यासाठी कोणत्याही जंजाळात न अडकलेले तरुणच उपयोगी येतील. राजकारणातील सहभागबद्दल ते पुढे म्हणतात की

'हिन्दुस्थानमधील युवक वेगळे राहून आपले आणि आपल्या देशाचे अस्तित्व टिकवून ठेवू शकतील काय? १९१९ मध्ये विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय युवक विसरू शकत नाहीत. त्यांना हेही समजते, की त्यांना एका मूलगामी क्रांतीची आवश्यकता आहे. त्यांनी शिकावे; पण त्याचबरोबर राजकारणाचेही ज्ञान प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे, आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे. यासाठीच आपल्या प्राणांचे बलिदान करावे. आपल्याला वाचवू शकेल असा दुसरा कोणताच मार्ग समोर दिसत नाही.'

Bhagat Singh Quotes,  Bhagat Singh Letters
Indian Freedom Struggle : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गोव्याचे योगदान अभूतपूर्व

भगतसिंगांचे विचार राष्ट्रवाद आणि समाजवादाची सांगड घालणारे आहेत. जुलमी राजवट उलथून स्वातंत्र्याबद्दल विचार करण्यासोबत ते मानवी मूल्यांचे जतन करणारे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळावेच पण त्यानंतरच कारभार व्यवस्थित चालावा यासाठी सजग तरुण राजकारणात, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावेत ही त्यांची प्रामाणिक इच्छा दिसून येते. इतक्या कमी वयात त्यांना झालेले ही आकलन आणि त्यांचे निरीक्षण कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.

(वरील माहितीसाठी शहीद भगतसिंग समग्र वाङ्मय, संपादक दत्ता देसाई या पुस्तकातील संदर्भ घेण्यात आले आहेत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com