Konkani Drama Competition Goa, The Insidious Dainik Gomantak
मनरिजवण

Konkani Drama Competition: द इन्सिडियस, विभाजित व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे उलगडणारी कथा; नाट्यसमीक्षा

The Insidious Play Review: सध्या कोकणी रंगभूमीवर ‘न्यू वेव्ह’चा प्रकार सुरू झाल्यासारखे वाटू लागले आहे. ‘न्यू वेव्ह’ म्हणजे काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न.

Sameer Panditrao

मिलिंद म्हाडगुत

सध्या कोकणी रंगभूमीवर ‘न्यू वेव्ह’चा प्रकार सुरू झाल्यासारखे वाटू लागले आहे. ‘न्यू वेव्ह’ म्हणजे काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न. असाच प्रयत्न कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेत सत्यम शिवम सुंदरम नाट्यसंपदा भोम संस्थेच्या ‘द इन्सिडियस’ नाटकात दिसून आला.

लेखक वैभव कवळेकर आणि दिग्दर्शिका शेफाली नाईक यांची ही कलाकृती. गेल्या वर्षीच्या कोकणी नाट्य स्पर्धेत याच दोघांची ‘रंगखेव’ ही कलाकृती बरीच गाजली होती. त्यातूनच ऊर्जा घेऊन ‘द इन्सिडियस’ ही नवी कलाकृती जन्माला आली असावी.

पण नवीन देताना काही तारतम्यही पाळावे लागते. नाही तर दूध जास्त गरम झाले, की ऊतू जाते. प्रस्तुत नाटकात असाच प्रकार थोड्याफार प्रमाणात बघायला मिळाला. कवळेकर यांची ही संहिता विभाजित व्यक्तिमत्त्वाभोवती फिरते. पण हे व्यक्तिमत्त्व अधोरेखित करण्याच्या प्रयत्नात त्यांची ‘फातरपेच्यान गोंय लागी’ अशी स्थिती झाल्यासारखी वाटली.

एक मानसोपचारतज्ज्ञ एक खुनी अनिकेत, जो मानसिक रुग्ण असतो, त्याच्याकडून खरे काय ते जाणून घ्यायला येते आणि त्यातून त्याचे विभाजित व्यक्तिमत्त्व उलगडते. अनिकेतवर त्याच्या आईच्या खुनाचा आरोप असतो. आईच्या डोक्यावर कुकर मारून हत्या केल्याचा आरोप जवळपास सिद्धही झालेला असतो. सगळे पुरावे त्याच्या विरोधात असतात; पण तरीही सत्य काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ती मानसोपचार तज्ज्ञ करते. त्यातूनच दोघांचे भावविश्व उघडत जाते. त्यात परत दोघेही मानव व मुग्धा बनून एकमेकांवर प्रेमही करतात.

अनिकेत वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वात शिरत असतो. आईचे अनैतिक संबंध असल्यामुळे तिचा खून केला, असेही तो बोलून जातो. नंतर एका लेखकाच्या व्यक्तिमत्त्वात शिरल्यानंतर नाटकाचा शेवट होतो.

आता ही कथा तशी अगदी सरधोपट वळणाची, सामान्य प्रेक्षकांच्या पचनी न पडू शकणारी. म्हणूनच हा आभाळाला हात लावण्याचा प्रयत्न वाटतो. त्यामुळे नाटकाची कथा प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाते, असेच नाटक बघताना वाटते. नवीन म्हणजे क्लिष्ट नव्हे, हे लेखकाने ध्यानात ठेवायला हवे होते.

मात्र, ही अगम्य अशी संहिता सुसह्य केली ती शेफाली नाईक यांच्या दिग्दर्शनाने. केवळ दोन पात्रे असूनसुद्धा त्यांनी संपूर्ण रंगमंचाचा योग्य वापर केला. त्यात परत फिरते टेबल, वाजणारी घंटा याचाही योग्य ठिकाणी उपयोग करून नाटक गतिमान ठेवले. कहाणी सांगताना दोन बाहुल्या पुढे ठेवून त्यांनी योग्य परिणाम साधला.

दोन्हीही पात्रांनी योग्य मूव्हमेंटस घेतल्यामुळे नाटक रंजक बनले. आता हे मूव्हमेंट्स ते का घेत आहेत हे न कळूनसुद्धा ते लोकांना आवडून गेले, हे विशेष. मानव व मुग्धाच्या प्रणयातसुद्धा दिग्दर्शनाची किनार प्रतीत होत होती. शेफालींच्या या प्रभावी दिग्दर्शनामुळे संहितेतल्या त्रुटी बऱ्याच अंशी झाकून गेल्या. त्यातच लेखक वैभव कवळेकर आणि दिग्दर्शिका शेफाली नाईक हेच कलाकार असल्यामुळे त्यांना अभिनयाच्या विविध छटा प्रस्तुत करायला चांगलाच वाव मिळाला.

नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे छोटे छोटे व आशयघन संवाद. भीती असते; पण ती दिसत नाही, जी गोष्ट ऑफिशियल असते, ती बहुतेकवेळा लादलेली असते, अशा संवादांमुळे नाटक प्रवाही ठरले. काही ठिकाणचे संवाद मात्र कमी दर्जाचे वाटत होते.

शेफाली नाईक व वैभव कवळेकर या दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री योग्यरीत्या जुळल्यामुळे नाटक बऱ्यापैकी जमले. दोन्हीही कलाकारांचा अभिनय उत्स्फूर्त होता. दोघांचे उत्कट मुद्राभिनय, एकमेकांना पूरक अशी संवादफेक यांमुळे प्रयोग संहिता अतर्क्य असूनसुद्धा थोड्याफार प्रमाणात रंगू शकला.

राजन नाईक यांचे नेपथ्य सूचक आणि प्रयोगाला साजेसे होते. दिलीप वझे यांचे पार्श्वसंगीत प्रभावी वाटले. खासकरून घंटा वाजविण्याच्या प्रसंगात दिलेले एक वेगळ्या प्रकारचे संगीत प्रसंगाचा परिणाम वाढवून गेले. तेजस खेडेकर यांची प्रकाश योजनाही प्रयोगाला पूरक अशीच होती. पात्रे दोनच असल्यामुळे काही जागांवर बॅक आऊट करून दुसरीकडे प्रकाशमय करणे, असे प्रकार त्यांनी यशस्वीरित्या राबवून प्रयोगाला वेगळा आयाम प्राप्त करून दिला.

एकंदरित या नाटकाची संहिता म्हणजे हिमालयाला गवसणी घालण्याचा प्रकार असूनसुद्धा दिग्दर्शन व अभिनय यांचा सुरेल संगम झाल्यामुळे एक सजग प्रयोग बघायला मिळाला. मात्र, कालच्या ‘डॅडी’ने निर्माण केलेला उत्साहाचा माहोल मात्र आज कोठेही दिसला नाही. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असल्यामुळे स्पर्धेच्या दर्जाबाबत अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT