Goa Assembly 2022 Khari Kujbuj

 
Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'काँग्रेसची भाकरी का करपली' खरी कुजबूज..!

काँग्रेसच्या निर्णय लकवा धोरणाने शेवटी काँग्रेसची भाकरी करपलीच...

दैनिक गोमन्तक

Goa Assembly 2022: निगळ्ये यांनाच मिळू शकते उमेदवारी

प्रियोळ मतदारसंघात आमदार गोविंद गावडे यांचे राजकीय भवितव्य त्यांना अद्याप ठरवता आलेले नाही. दुसऱ्या बाजूला संदीप निगळ्ये यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. परवा ज्या पद्धतीने त्यांनी श्री म्हाळसेला नारळ ठेवला तेथे जमलेली गर्दी पाहता अनेकांना भाऊसाहेब बांदोडकर यांची आठवण झाली. संदीप निगळ्ये यांच्याबरोबर सध्या भाजपाची संपूर्ण कार्यकर्ते मंडळी उभी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘सुकाणू’ समितीत निगळ्ये यांचे वजन वाढले आहे. पक्षसंघटनेवर निगळ्ये यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी सतत दबाव येत असून बहुसंख्य सदस्य त्याबाजूचे बनले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्त्यांनी साथ सोडल्यामुळे गोविंद गावडे यांना आपले राजकीय भवितव्य दिसू लागले असून, ते स्वतःच अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहू शकतात. त्यामुळेच 19 डिसेंबरच्या मोदी यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात त्यांनी व्यासपीठावर बसायचे टाळले. ते केवळ नागरी पुरवठा खात्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आले. ∙∙∙

केवळ प्रमोद सावंत (Pramod sawant)

गोवा (Goa) मुक्तिदिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर भाजपामधील जर कोणी सर्वांत खूश असेल तर ते आहेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावंत यांना निव्वळ शाबासकीच दिली नाही, तर पुढच्या कारकिर्दीसाठी त्यांना आशीर्वादही दिला आहे. याचा अर्थ असा की, सरकार सत्तेवर आले, तर विनासायास नेतृत्व सावंत यांच्याकडेच येईल आणि अतिमहत्त्वाकांक्षी एखाद्या नेत्याने दिल्लीला येऊन पाय धरले, तरी त्याची डाळ शिजणार नाही. सध्या विश्वजित राणे हेसुद्धा सुतासारखे सरळ आले आहेत आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या राज्यातील दौऱ्यानंतर आपल्या सौभाग्यवतींना खात्रीपूर्वक तिकीट मिळणार आहे, यातच ते खुश आहेत. ∙∙∙

विटामिन ‘एम’ कुठे आहे?

लुईझिन फालेरो, चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड यांनी तृणमूलची तर रवी नाईक यांनी भाजपची वाट धरल्याने सासष्टीतील कॉंग्रेस (Congress) पक्षाची स्थिती अत्यंत दोलायमान बनली आहे. 28 टक्के मते घेणारा हा पक्ष निवडणुकीपूर्वीच असा ढेपाळेल याची कुणी कल्पनाही केली नसेल. बुडणाऱ्या जहाजातून ज्या पद्धतीने उंदीर सर्वजागी पळू लागतात तसे सध्या कॉंग्रेसला भगदाड पडले आहे. कॉंग्रेसला सर्वात आधी तडाखा दिला तो मगोपच्या ढवळीकरांनी. कॉंग्रेसकडे निधीची कमतरता असल्याचे सर्वात आधी त्यांनीच ताडले असावे. निवडणुका तर निधीशिवाय लढल्या जाऊ शकत नाहीत. कॉंग्रेसमध्ये श्रीमंत नेते जरूर आहेत परंतु ते खिशात हात घालण्यासाठी नावाजलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला तृणमूलने पैशांचा धूप केला आहे. त्यांनी फलक आणि पोस्टरबाजीवरच करोडो रुपये खर्च केल्याने ते पैशांची आतषबाजीच करतात, असा समज नेत्यांमध्ये पसरला तर नवल नाही. परंतु पैसे मिळतात का? हे जाणून घ्यायचे असल्यास यापूर्वीच पक्षात आलेल्यांना विचारून पहा. सुरेंद्र फुर्तादो त्यामुळेच मागे हटले. आता रेजिनाल्ड काय कथा सांगतात, याची लोकांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची मात्र पाण्याबाहेर काढलेल्या मासळीसारखी झालेली आहे. त्यांच्याकडे 17 पैकी केवळ दोन सदस्यच शिल्लक राहिले आहेत. ∙∙∙

उमेदवारी दिली, निधी कुठे?

लुईझिन फालेरो आणि रवी नाईक पक्ष सोडून गेले. यामुळे झाली नाही, एवढी कॉंग्रेसची अप्रतिष्ठा आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या पलायनामुळे झाली आहे. रेजिनाल्ड अक्षरशः निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसची उमेदवारी घेऊन पळून गेले आहेत. याबद्दल राजकीय निरीक्षकांना कोणताही संशय नाही. कॉंग्रेस नेते त्यांना आता विश्वासघातकी, बेईमान वगैरे विशेषणे लावत असतील. परंतु रेजिनाल्ड पक्षाला अक्षरशः चुना लावून निघून गेले आहेत. ते केवळ आपल्याला भावी मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेसने प्रोजेक्ट केले नाही, याच कारणास्तव निघून गेले असतील, हे खरे वाटत नाही. कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली. परंतु निधी कुठे आहे? असा सवाल पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते करीत आहेत. स्वतः म्हापशात सुधीर कांदोळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु ते स्वतःही निधी कुठे आहे? असा प्रश्न विचारू लागले आहेत. त्यांनी गुंडूराव यांची भेट घेऊन निधी कधी देणार? असा सवाल केला. त्यावर दोन दिवसांनी पाहू, असे उत्तर त्यांना ऐकायला मिळाले. म्हापशाच्या पोटनिवडणुकीत त्यांना कर्ज घेऊन निवडणूक लढवावी लागली. ते म्हणतात, मला एक दहा लाख रुपये पक्षाने त्यावेळी उसने दिले असते तरी मी जिंकून आलो असतो. रेजिनाल्ड यांची तीच अवस्था झाली नसेल कशावरून? ∙∙∙

भाजपातील परिवर्तन!

नरेंद्र मोदी यांच्या श्यामाप्रसाद मुखर्जी संकुलातील कार्यक्रमाला भाजपचे अनेक नेते अनुपस्थित राहिले. कार्लुस आल्मेदा, मिलिंद नाईक, एलिना साल्ढाणा, प्रवीण झांट्ये यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली. या सर्वांनी आपले भवितव्य ताडले असल्याने कशाला उगाच भाजपच्या सभेला जाऊन स्वतःची शोभा कमी करून घ्या, असा विचार त्यांनी केला असेल (मात्र इजिदोर फर्नांडिस का आले नाहीत, हे आश्चर्य आहे.) परंतु जे सदस्य कालपर्यंत भाजप सोडून वेगळी चूल मांडण्याची तयारी करीत होते. ते मात्र सध्या भाजपाबरोबरच पक्का घरोबा करून आहेत. विश्वजित राणे हे त्यातले एक. ते सर्वांना सांगत आहेत पक्ष सोडण्याचा विचार करू नका, सरकार आमचेच येणार आहे. मोदींचा कार्यक्रम संपल्यावर मायकल लोबो हे विश्वजित राणे यांच्या घरी जाऊन बसले होते. त्यावेळी सरकार सोडण्याचा विचारदेखील मनात आणू नका असा सल्ला विश्वजित राणे यांनी दिला आणि त्यांनी तो मानून घेतल्याचे वृत्त आहे. सोमवारी एका वृत्तवाहिनीला त्यांनी भाजप सोडण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रोहन खंवटे यांचेही हात धरून त्यांना भाजपात आणण्यात विश्वजित यांचा हात असल्याचे सांगण्यात येते. केवढे परिवर्तन हे ∙∙∙

तृणमूलबरोबरची (TMC) सोयरीक

तृणमूलशी सोयरीक केल्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा फायदा झाला की तोटा हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कुणी काही म्हणो, मगो हा उजवीकडे झुकलेला पक्ष. तर ‘जय श्री राम’ याबद्दल तिरस्कार बाळगण्यासाठी तृणमूलची ख्याती आहे. त्याचा परिणाम म्हणून मगोचे अनेक उमेदवार - ज्यांची ढवळीकरबंधूंनी बेळगाव वारी घडवून आणली होती - तेही सध्या अस्वस्थ बनल्याचे चित्र आहे. प्रेमेंद्र शेट यांनी भाजपकडे संघ करण्याचे ते एक कारण सांगितले जाते. प्रवीण आर्लेकर हेसुद्धा सध्या दरदिवशी भाजपच्या पणजी कार्यालयाकडे संपर्क साधत असतात. हळदोणे येथे महेश साटेलकर यांना उमेदवारी दिली जाणार होती. त्यांनी राजीनामा दिला आहे. कारण तेथे तृणमूलचे किरण कांदोळकर अगोदरच जागा अडवून उभे आहेत. दाबोळी येथील मगोचा उमेदवार ‘आप’मध्ये शिरला आहे. शिरोडा येथे संकेत मुळे यांना उमेदवारी दिली जाणार होती. परंतु तेथे आता ढवळीकर आपले नशीब अजमावू पाहत असल्याची चर्चा आहे. शिरोडा आणि फोंडा हे मतदारसंघातही काही वेगळी चाहूल लागते आहे... ∙∙∙

...आणि लोक म्हणतात हा प्रामाणिक

हल्लीच लोकशाही संवर्धानासाठी वावरणाऱ्या बंगलूरस्थित ‘एडीआर’ या संस्थेने गोव्यातील एका आमदाराचा कर्तव्यदक्ष म्हणून सन्मान केला होता. प्रामाणिकपणाच्या कसोटीवर तर हा आमदार पहिल्या क्रमांकावर होता. परंतु हल्लीच जे काही कारनामे केले त्यामुळे साऱ्या लोकशाहीवाल्यांच्या माना खाली झुकल्या. सांगण्यात येते त्यानुसार, या आमदाराने आम आदमी पक्षात जाण्यासाठी त्यांच्याकडून काही कोटी रुपये घेतले. पुढे जेव्हा या आमदाराने विचार बदलला तेव्हा जुनी येणी देण्यासाठी त्याने कॉंग्रेसकडून काही कोटी घेतले. आता दुसऱ्या पक्षात जाताना मात्र त्याने कॉंग्रेसचे उसने घेतलेले पैसे परत देण्याची तसदी घेतलेली नाही. वरून आपण ज्या नव्या पक्षात जाणार आहोत, त्यांच्याकडून त्याने प्रचंड रक्कम प्राप्त केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा प्रकार अत्यंत निलाजरेप्रमाणे घडला आणि त्याच्या गावात तर प्रामाणिकपणाची त्याची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. परंतु तरीही लोकांमध्ये तो लोकप्रिय असल्याची वदंता आहे. ∙∙∙

नेत्यांची पक्षांतरे सुरूच!

यंदाची विधानसभा निवडणूक (Goa Assembly) सोम्यागोम्याची बनली आहे. निवडणुकीत अर्थ शिल्लक नसल्याची प्रतिक्रिया मतदारांची आहे. येथील आमदारांची पक्षांतरे व राजीनामा सत्राची गिनीज बुकात नोंद करावी लागले. निवडणूक घोषित होण्यापूर्वी चार आमदारानी राजीनामे देऊन, लोकसेवेच्या नावाखाली ''स्वार्थ'' दाखवून दिला आहे. अशा लोकप्रतिनिधींना पुन्हा निवडणुकीस उभे राहिल्यास घरी पाठविणे योग्य आहे. मांद्रे मतदारसंघात काँग्रेस पक्षात अंदाधुंद कारभार होता, परंतु भाजपात तरी वेगळे कुठे आहे? सोपटे-पार्सेकर स्वतः भाजपचा प्रचार करीत आहेत, मात्र उमेदवारी कोणाला हा प्रश्न आहे? मतदार, अजूनही चिंतेत आहेत. कोणाला तोंड दाखवायचं? भाजपने उमेदवारी जाहीर करण्यास एवढा उशीर का केला? याबाबतची चर्चा मतदारसंघात रंगत आहे. ∙∙∙

‘कदंब’ची सेवा वाढ!

सरकारमध्ये सहभागी मंत्री आमदाराला जे करायचे असते, ते हे लोक बिनधास्त करतात. त्यासाठी कायदे कानून आणि नीतिनियम हे लोक बासनात गुंडाळून ठेवतात. आता हेच बघा. मागच्या काळात निवृत्त होणाऱ्या बऱ्याच लोकांनी सेवावाढीसाठी अर्ज केले. पण या अर्जांना केराची टोपली दाखवण्यात आली. मात्र नुकसानीत चाललेल्या कदंब महामंडळात सरकारची मर्जी असलेल्या एका कर्मचाऱ्याला सरकार सेवा वाढ देत आहे. निवृत्त होऊनही या कर्मचाऱ्याला सेवावाढ दिली जात असल्याने मागच्या लोकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे चिडलेल्या कर्मचाऱ्यांनी आता उघड बंडाचा पवित्र स्वीकारला आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कानावरही घातले आहे. त्यामुळे ही सेवावाढ कुठपर्यंत पोचते, हे पहावे लागेल. ∙∙∙

अफवांचे पीक आणि गोंधळलेली प्रजा!

आज राज्यात जो राजकीय शिगमा चालू आहे, ते पाहून आम जनता गोंधळात पडली नाही, तर नवल. आयाराम गयाराम संस्कृतीने जो उच्छाद मांडला आहे, तो पाहता सामान्य मतदारांचा आपल्या नेत्यावरचा विश्वासच उडाला आहे. कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार व भाजपाचे उमेदवार क्लाफास डायस भाजपा सोडतो, अशी अफवा कालपर्यत ऐकायला येत होती, आता त्यात भर म्हणून काँग्रेसची उमेदवारी मिळालेले युरी आलेमाव रेजिनाल्डचे अनुकरण करणार आशा अफवा पसरविल्या जात आहेत. बिचारे क्लाफास व युरी ‘आप’ आपल्या पक्षासोबत असताना या अफवामुळे त्यांना नव्या डोकेदुखीला समोर जावे लागत आहे. जनतेची पण चूक नाही, म्हणा कारण पक्ष बदलूंचे लोण कोरोना वायरससारखे गोव्यात सर्वत्र पसरले आहे. ∙∙∙

खरी लढत काँग्रेस की भाजपात

राज्यात भाजप व कॉंग्रेस पक्षाला स्वकीयांकडूनच जास्त धोका निर्माण झाला आहे. ‘जोडीक घेतिल्लो मारू जिवार उडटा’ अशी एक म्हण आहे, तसाच कांहीसा प्रकार दोन्ही पक्षांच्या बाबतीत सध्या चालू झाला आहे. काणकोणात महादेव देसाई, जनार्दन भंडारी हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. त्यातही चेतन देसाई यांचे नावही पुढे आहे. स्वकीयांशी ते मन जुळवणी करणार की बंडखोरी करणार! भाजपमध्येही उपसभापती इजिदोर फर्नांडिस व माजी मंत्री रमेश तवडकर यांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वांनीच मराठ्यांच्या पानीपतच्या इतिहासाची उजळणी करावी, असे सर्वांनाच वाटते. ∙∙∙

नगरसेवकांसमोर आमदार फिके!

म्हापसा पालिकेच्या वतीने आयोजित मुक्तिदिन सोहळ्यात बहुतांश वीसपैकी एकोणीस नगरसेवकांनी अतिशय उत्साहाने भारतीय पेहरावातील वैशिष्ट्यपूर्ण लक्षवेधक पोषाख परिधान केला होता. त्यामुळे उपस्थितांच्या नजराही त्यांच्यावरच खिळून राहिल्या. त्या एकंदर माहोलात प्रमुख अतिथी असलेले आमदार ज्योशुआ डिसोझा फिके पडत असल्याचे वाटत होते. उत्साहाच्या भारात त्या नगरसेवकांनी बराच वेळ लांबलेले फोटो सेशनही घेतले. आनंद भाईडकर या एकमेव नगरसेवकाने तो पोषाख परिधान केलेला नव्हता. सैलसर कपडे मिळाल्याने त्यांनी तो निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु, फोटो सेशनला ते होतेच! परंतु, तो पोषाख पाहून ‘हे काय समूहगान पथक आहे का’, अशी विचारणा कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित मंडळी एकमेकांशी करीत होती. एका नगरसेवकाने तो पोषाख प्रायोजित केला होता. ∙∙∙

काँग्रेसची भाकरी का करपली!

काँग्रेसची सध्याची दयनीय स्थिती पाहिल्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना कुणीतरी हे प्रश्न विचारावेत. सहा महिन्यांपूर्वी गोव्यात सत्ताधारी भाजपच्या विरोधात जबरदस्त वातावरण होते. अशा परिस्थितीत तेव्हाच गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी पक्षाशी काँग्रेसने युती करून निवडणूक लढविण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला असता तर भाजपातील असंतुष्टही काँग्रेस बरोबर आले असते. अशा परिस्थितीत या युतीच्या 26 ते 27 जागा कुठेच गेल्या नसत्या. मात्र भाकरी आणि घोडा वेळीच परतावायचा असतो, याची जाणीव काँग्रेसने ठेवली नाही. काँग्रेसच्या निर्णय लकवा धोरणाने शेवटी काँग्रेसची भाकरी करपलीच. ∙∙∙

तृणमूल कुंकळ्ळीत मूळ धरतोय?

श्रम केले तर यश जरूर मिळते, जीवनात अशक्य काहीच नसते, हा मंत्र घेऊन तृणमूल काँग्रेस पक्ष सध्या कुंकळ्ळी मतदारसंघात पाय पसरायला यशस्वी ठरला आहे, असे म्हटल्यास चूक होणार नाही. डॉ जोर्सन फर्नांडिस व त्याच्या कार्यकर्त्यानी हवेची दिशा आपल्या बाजूने वळविण्यास सध्या तरी यश प्राप्त केल्याचे दिसते. कालपर्यत कुंकळ्ळीत अलीकडेच आलेला तृणमूल पक्ष आता घराघरांत पोहचला असून डॉ. जोर्सन यांना मतदार पर्याय म्हणून पहायला लागले आहेत, हा अंदाज जर खरा ठरला तर कुंकळ्ळीत नवी सकाळ उगवण्याची जादू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ∙∙∙

डील कितीची?

आलेक्स रेजिनाल्ड यांच्या काँग्रेस राजीनाम्या मागे बरेच मोठे अर्थकारण असावे अशी शक्यता दिनेश गुंडू राव यांनी व्यक्त केली आहे. ही डील नेमकी नेमकी काय असावी यावर सध्या तर्क वितर्क चालू आहेत. कुणी म्हणतात 15 दिले, कुणी म्हणतात 18 देण्याचे आश्वासन दिले आहे. रेजिनाल्ड बद्दल यापूर्वीही अशा वावड्या उठल्या होत्या. त्यामुळे आताची जो चर्चा वार्ता की वदंता हे कळायला मार्ग नाही. पण म्हणतात ना, खाली आग असली तरच धूर वर येतो! ∙∙∙

अशाही मैत्रीपूर्ण लढती

निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच होऊ लागलेल्या मोठ्या प्रमाणातील पक्षबदलामुळे अनेक मतदारसंघात एकेकाळचे जिवलग मित्र एकमेकांविरुद्ध रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. मडगावात दिगंबर कामत व डाँ.देश प्रभुदेसाई, कुंकळ्ळीत प्रशांत नाईक व युरी आलेमाव, काणकोणात प्रशांत नाईक व इजिदोर फर्नांडिस, नावेलीत आवेर्तान फुर्तादो व उल्हास तुयेकर अशा या लढती झाल्या तर त्यांच्या मित्रमंडळींची मात्र पंचाईत होणार नाही का? ∙∙∙

मोरेनला घाई नडली

कुडतरीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो म्हणे सध्या कपाळावर हात मारून घेत आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीचा बराच काळ प्रतीक्षा करून त्यांनी भाजपत प्रवेश केला, पण आता रेजिनाल्ड यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा व तृणमूलची धरलेली वाट. यामुळे आपण कमळ हाती घेण्यात घाई केली, असे मोरेनबाब बोलू लागले आहेत. कुडतरीत आता हाताची माळ कुणाच्या गळ्यात ती चर्चा रंगू लागली आहे. कदाचित मोरेनबाब लवकरच घर वापसी तर करणार नाहीत ना? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT