पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. तीन प्रकरणांमध्ये शिक्षा झाल्यामुळे त्यांना निवडणूकही लढवता आली नाही. त्यांच्या पक्षाचे चिन्हही जप्त करण्यात आले, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. मात्र, निवडणुकीतील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास इम्रान खान यांची कामगिरी सर्वोत्तम असल्याचे बोलले जात आहे.
नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांच्यावर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप होत आहे. याशिवाय नवाझ शरीफ यांच्यावर पाकिस्तानी आर्मीचा वरदहस्त असल्याचे मानले जाते. सध्या तरी निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर झालेले नाहीत. मात्र, पीएमएल-एन आणि पीटीआय हे दोन्ही पक्ष विजयाचा दावा करत आहेत. इम्रान खान यांनी विजयी भाषणही केले आहे.
दरम्यान, रिपोर्ट्सवर नजर टाकली तर इम्रान खानल यांना तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणारे तरुण मोठ्या संख्येने इम्रान खान यांच्याशी जोडले गेले आहेत. लॉ च्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत निकाल पाहत होतो. मात्र, आपल्या गटनेत्यांची नावे आणि त्यांची चिन्हे लक्षात ठेवणे फार अवघड काम आहे. प्रत्येकाला वेगवेगळे मार्क मिळाले आहेत.
दुसरीकडे, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही शुक्रवारीच विजयाची घोषणा केली आहे. त्यांचा दावा आहे की, त्यांचा पक्ष 95 जागांसह आघाडीवर आहे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. बिलावल भुट्टो यांच्या पीपीपीबद्दल बोलायचे झाल्यास, ते किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. मात्र, पीपीपी नवाझ शरीफ यांच्या नावाला पाठिंबा देणार नाही. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, पीएमएल-एनने सरकार स्थापन केले तरी शाहबाज शरीफ पुन्हा पंतप्रधान होतील का?
दरम्यान, शुक्रवारी दुपारी 4 वाजेपर्यंत इम्रान यांच्या गटाला सर्वाधिक 92 जागा मिळाल्या होत्या. इम्रान खान यांचे सरकार 2022 मध्येच पडले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अपक्ष खासदार असल्याने सरकारमध्ये स्थैर्य आणणे कठीण जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. त्याचा परिणामही दिसून आला. इम्रान यांचे समर्थक सोशल मीडियावर लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगत होते. मात्र, निवडणुकीच्या दिवशी इंटरनेट सेवा बंद राहिल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
दुसरीकडे, इम्रान खान (Imran Khan) यांना पाठिंबा मिळण्यामागचे कारण म्हणजे लष्कराने राजकारणात हस्तक्षेप करु नये असे जनतेला वाटते. अशा परिस्थितीत लोकांनी नवाझ शरीफ यांच्या विरोधात मतदान केले आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दीर्घकाळ आर्थिक संकटामुळे कंटाळलेल्या लोकांनी सुधारणेच्या आशेने इम्रान खान यांना पाठिंबा दिला. इम्रान खान यांना तुरुंगात टाकल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. सेलिब्रेटी म्हणूनही इम्रान खान तरुणांच्या पसंतीस उतरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.