पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल येत आहेत. मात्र, पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने यापूर्वी दावा केला होता की, त्यांचा पक्ष 154 जागांवर आघाडीवर आहे आणि पंतप्रधानपदाचे सर्वात मोठे दावेदार नवाझ शरीफ हे मनसेहरा आणि लाहोर या दोन्ही जागांवरुन निवडणुकीत पराभूत होत आहेत. पण अचानक बाजी पलटली आणि त्यांनी लाहोर नॅशनल असेंब्लीची जागा मोठ्या फरकाने जिंकली.
मात्र, मानसेहरामध्ये त्यांना पीटीआय समर्थक उमेदवाराकडून पराभवाला सामोरे जावे लागले. यातच, सोशल मीडियावर शेकडो व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये मतदान केंद्रांमध्ये हेराफेरीचा दावा केला जात आहे. पाकिस्तानमध्ये निवडणूक निकाल जाहीर होण्यास उशीर होत असताना मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान रझा बेपत्ता असल्याची बातमी येत आहे.
गुरुवारी, 8 फेब्रुवारी रोजी झालेले मतदान त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता संपले, परंतु पहिल्या नॅशनल असेंब्लीच्या जागेसाठी अधिकृत निकाल जाहीर होण्यास दहा तासांहून अधिक काळ लोटला आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) निवडणूक आयोगाने निकालाच्या विलंबासाठी इंटरनेट बंदीला जबाबदार धरले आहे.
पाकिस्तानच्या आघाडीच्या वृत्तपत्र डॉनने लिहिले की, मतमोजणीच्या सुरुवातीच्या निकालांनी लोकांना धक्का बसला. नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) निकालामुळे निराश दिसत होता आणि त्यांचे नेते कुठेही दिसत नव्हते.
सुरुवातीच्या मतमोजणीत टीव्ही चॅनेल्सवर पीटीआयच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बाजी मारताना दिसले. पहिल्या तीन नॅशनल असेंब्लीच्या जागांवर, पीटीआय समर्थित उमेदवारांना जवळपास विजयी घोषित करण्यात आले. मात्र त्यानंतर लगेचच टीव्ही चॅनेल्सवर मतदान केंद्रांवरील निकालांचे वृत्तांकन थांबले. पीटीआयला आघाडी मिळाल्याने काही टीव्ही चॅनल्सनी आपले आकडेही बदलण्यास सुरुवात केली.
दुसरीकडे, निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेत्यांना त्रास देण्यास सुरुवात झाली होती. पीटीआयच्या उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले, त्यांचे अपहरण करण्यात आले, पोलिसांनी (Police) त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना प्रचाराची परवानगी न दिल्याची तक्रार केली. पण पाकिस्तानच्या मतदारांचा अजूनही पीटीआयवर विश्वास असल्याचे सुरुवातीच्या निकालावरुन दिसून आले आहे.
खैबर-पख्तूनख्वामध्ये पीटीआयचे उमेदवार विजयी होताना दिसत होते आणि पंजाबमधील अनेक जागांवर ते पुढे होते. मात्र, चौथ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याची शक्यता असलेले नवाझ शरीफ गुरुवारी सुरुवातीच्या ट्रेंडमुळे निराश दिसले. गुरुवारी त्यांच्या निवडणूक कक्षात उपस्थित पत्रकारांना दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी निघून जाण्यास सांगण्यात आले. पण अचानक झालेल्या नाट्यमय बदलात, नवाझ शरीफ यांनी लाहोरच्या नॅशनल असेंब्ली सीट 130, त्यांचा भाऊ शाहबाज शरीफ यांनी लाहोरच्या PP-158 जागेवरून आणि त्यांची बहीण मरियम नवाझ शरीफ यांनी PP-159 जागेवरुन निवडणूक जिंकली आहे.
पीटीआयने पाठिंबा दिलेल्या अनेक उमेदवारांचे म्हणणे आहे की, रिटर्निंग अधिकाऱ्यांनी कोणतेही योग्य कारण न देता आणि कोणताही निकाल न देता त्यांना जबरदस्तीने त्यांच्या निवडणूक कक्षातून बाहेर पाठवले.
दुसरीकडे, नॅशनल असेंब्ली सीट-128 साठी पीटीआय-समर्थित अपक्ष उमेदवार, सलमान अक्रम राजा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, ''रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यालयात संशयास्पद हालचाली केल्या गेल्या. त्यानंतर मला बेकायदेशीरपणे हाकलून देण्यात आले. माझ्या अनुपस्थितीत निवडणूक निकालाची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही. मला परत कार्यालयात येण्याची परवानगी दिली पाहिजे.''
पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर असे शेकडो व्हिडिओ शेअर केले जात आहेत, ज्यामध्ये पीटीआय समर्थित उमेदवारांना विजयी होण्यापासून रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जात आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या मागील आघाडी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले बिलावल भुट्टो यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ने देखील मतदान केंद्र-105 मधून मतपत्रिका हिसकावून घेतल्याचे सांगितले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मास्क घातलेले काही लोक कराचीमधील मतदान केंद्रात प्रवेश करताना दिसत आहेत. मात्र, सध्या अशा व्हिडिओंची पुष्टी करता येत नाही.
पाकिस्तानी पत्रकार नेमत खान यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये दिसत आहे की कादिर आत जातो आणि पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बॅलेट पेपरने भरलेल्या मतपेट्या जमिनीवर फेकतो.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये 336 जागा आहेत, त्यापैकी 266 उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाद्वारे निवडले जातात. उर्वरित 70 जागा राखीव आहेत. त्यापैकी 60 जागा महिलांसाठी आणि 10 जागा मुस्लिमेतर उमेदवारांसाठी आहेत. राष्ट्रीय असेम्ब्लीत बहुमतासाठी 133 जागांची आवश्यकता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.