Iran-Israel Tensions: सीरियामध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर आणि इराणी लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर आणखी एक युद्ध होण्याची शक्यता दिसत आहे. इराणकडून हल्ला होण्याची भीती लक्षात घेऊन इस्रायलने जीपीएस सिस्टिम बंद केली आहे. इराण 5 एप्रिलनंतर कधीही हल्ला करु शकतो, असे इस्रायलला वाटते. इराण 5 एप्रिल हा दिवस 'जेरुसलेम दिन' म्हणून साजरा करतो. काही दिवसांपूर्वी, सीरियाच्या राजधानीत इराणच्या राजनैतिक संकुलावर झालेल्या हल्ल्यात इराणी लष्कराचे कमांडर जनरल मोहम्मद रजा जाहेदी यांचा मृत्यू झाला. 2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले मेजर जनरल कासिम सुलेमानी यांच्यानंतर ही पहिलीच वेळ आहे की, सर्वोच्च लष्करी कमांडरची अशा प्रकारे हत्या करण्यात आली आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत गाझामध्ये हमाससोबत सुरु असलेल्या युद्धात इराण अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या विरोधात उभा राहिला आहे. मात्र, या हल्ल्यानंतर दोन्ही देश आमनेसामने येऊ शकतात. अशा स्थितीत मध्य आशियात अशांतता वाढू शकते. इराणकडून हल्ल्याच्या भीतीने इस्रायलनेही तयारी सुरु केली आहे. अशा स्थितीत इराणनेही आता प्रत्युत्तर दिल्यास दुसरे युद्ध सुरु होईल, असे दिसते.
दरम्यान, इस्रायलने आपले जीपीएस आणि नेव्हिगेशन बंद करण्यास सुरुवात केली आहे. इराण गाइडेड मिसाइल किंवा ड्रोनने हल्ला करु शकतो, अशी भीती त्याला वाटते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, तेल अवीव आणि जेरुसलेमच्या लोकांनी लोकेशन बेस्ड ॲप वापरता येत नसल्याची तक्रार केली आहे. याशिवाय, इस्रायलने लष्कराने सैन्याच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. इस्रायलच्या सीमेवर सैनिक आणि शस्त्रास्त्रांची तैनाती वाढवण्यात आली आहे.
दुसरीकडे, इस्रायलच्या तयारीमुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दूतावासांनाही सतर्क करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. मात्र दुसरीकडे, घाबरण्याची गरज नसल्याचे इस्रायली प्रशासनाने जनतेला सांगितले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी विनाकारण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करु नये. इस्त्रायलने या हल्ल्याची अधिकृतपणे जबाबदारी घेतलेली नाही. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद रायसी यांनी या हल्ल्याला नक्कीच उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. इराणी लोक 5 एप्रिल हा 'कुद्स डे' म्हणून साजरा करतात. या दिवशी पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ रॅलीही काढली जाते. दरम्यान, इस्रायलमध्ये लोकेशन सिस्टम व्यवस्थित काम करत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.