Greater Noida Bus Fire Video: दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडा येथील यमुना एक्सप्रेसवेवर रात्री उशिरा एक भीषण आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या एका स्लिपर बसला अचानक भीषण आग लागल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 प्रवाशांचा जागीच मुत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. बिहार पासिंग असलेली ही डबल डेकर स्लिपर बस ग्रेटर नोएडावरुन आग्राच्या दिशेने जात असताना दयानतपुर गावाजवळ अचानक तिच्यातून धूर निघू लागला. पाहता पाहता या धुराचे रुपांतर मोठ्या आगीच्या लोटात झाले आणि काही क्षणांतच संपूर्ण बसला आगीने वेढले.
मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला उभी केली, परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. बसला आग लागल्याचे प्रवाशांना कळताच एकच हाहाकार उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, या स्लिपर बसमधील बहुतांश प्रवासी हे पर्यटक होते आणि ते मथुरेकडून वृंदावनच्या दिशेने चालले होते. जेवरजवळ हा अपघात (Accident) घडल्यानंतर घटनास्थळी पळापळ सुरु झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
सुमारे एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले, परंतु आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृद्ध महिला, लहान मुले आणि काही दिव्यांग बालकांचाही समावेश होता. बसने अचानक पेट घेतल्यामुळे हे सर्वजण आतच अडकले. बस डबल डेकर असल्याने वरच्या मजल्यावर बसलेले प्रवासी आगीच्या भक्ष्यस्थानी आले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसला आग लागल्यानंतर बसमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले, ज्याचा आवाज फटाके फुटल्यासारखा होता. त्यामुळे बसमध्ये काही फटाके किंवा प्रज्वलनशील पदार्थ असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. आग इतकी भयानक होती की रस्त्यावरुन जाणारे इतर वाहनातील लोकही घाबरुन गेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यमुना एक्सप्रेसवेच्या खाजगी सुरक्षेने सर्वात आधी धाव घेतली, तर सुरक्षेच्या दृष्टीने जेवर टोल आणि फळैदा कटवर वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक दरवाजा ठोठावला गेला आणि जाग आल्यावर चौफेर आगीचे लोट दिसत होते. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाने मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु धुरामुळे श्वास गुदमरल्याने अनेकांना बाहेर पडणे कठीण झाले. जखमींना तातडीने जवळील कैलास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.