

पणजी: पर्वरी येथील नवीन उन्नत मार्ग शुक्रवारी वाहतुकीसाठी खुुला केल्यानंतर शनिवारी म्हणजेच काही तासांतच झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह एका महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली असून, उन्नत मार्गाच्या तांत्रिक आणि सुरक्षेच्या त्रुटींवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या मार्गावरील हे पहिले बळी ठरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार सर्वेश वेंगुर्लेकर (४१, मूळ रा. सातार्डा, सिंधुदुर्ग; सध्या रा. सांताक्रुझ-तिसवाडी) आणि कारमधील प्रवासी अमिता साळगावकर (शिवोली) यांचा जागीच मृत्यू झाला. सर्वेश हे खासगी कंपनीत ‘सेल्समन’ म्हणून काम करत होते. चारचाकी चालक रौनक चारी (२२, मयडे) गंभीर जखमी झाला असून, शिवोली येथील नऊ वर्षांची मुलगी संगीता सूरज हिचीही प्रकृती गंभीर आहे.
धोकादायक जंक्शन?
म्हापसा ते पणजी प्रवास करताना अटल सेतूच्या जंक्शनकडे जाण्यापूर्वी दुचाकीस्वारांनी डाव्या बाजूच्या लेनमध्ये राहणे अत्यंत आवश्यक आहे. अटल सेतूवर दुचाकींना बंदी आहे. त्यामुळे बांबोळी किंवा अटल सेतूच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे हे जंक्शन दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. जंक्शनजवळ ऐनवेळी लेन बदलावी लागत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची लेन निश्चित करणे आणि सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
भीती ठरली खरी
उन्नत मार्गाच्या उद्घाटनानंतर स्थानिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने व्यक्त केलेली भीती आणि त्यासंदर्भात समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्ट चर्चेचा विषय ठरल्या होत्या. ‘व्हॉट्सॲप स्टेटस’ २४ तासांत आपोआप गायब होते. मात्र, हे २४ तास पूर्ण होण्याआधीच स्थानिकांनी व्यक्त केलेली भीती प्रत्यक्ष रस्त्यावर भीषण अपघाताच्या रूपाने समोर आली.
अपघात कसा घडला?
१. शनिवारी सायंकाळी गिरी येथून पणजीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचालकाचे ‘निओ मॅजेस्टिक’ हॉटेलसमोर अचानक नियंत्रण सुटले.कार रस्त्यावरून किंचित उडाली आणि समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरात धडकली.
२. धडकेनंतर दुचाकीस्वार समोरील ट्रकवर जाऊन आदळला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार सर्वेश वेंगुर्लेकर यांचा जागीच तर अमिता साळगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.