Devotion Dainik Gomantak
ब्लॉग

Devotion: समर्पण आणि कृतज्ञता

सकाम भक्तीकडून निष्काम भक्तीकडे प्रगती झाली पाहिजे. त्यासाठी निरंतर अभ्यास व स्वत:मध्ये सुधारणा, बदल घडवत राहिले पाहिजे.

दैनिक गोमन्तक

अभिमान सोडलेले कर्म आणि कर्मफलाची सोडलेली आसक्ती म्हणजेच भक्ती. मग, देवळात जाणे, उपासना करणे, नामसाधना करणे, टिळा लावणे, तुळशीची माळ घालणे, आराधना करणे, पूजा करणे ही भक्ती नव्हे का? हीसुद्धा भक्तीच आहे. पण, भक्तीची ही प्रारंभीची अवस्था आहे. तिथून आपली प्रगती पुढे झाली पाहिजे. सकाम भक्तीकडून निष्काम भक्तीकडे प्रगती झाली पाहिजे. त्यासाठी निरंतर अभ्यास व स्वत:मध्ये सुधारणा, बदल घडवत राहिले पाहिजे.

ज्ञानी माणूस भक्ताला नावे ठेवतो आणि भक्त, ज्ञानी माणसाची उणीदुणी काढतो, ही आपल्याकडची एक मोठी समस्या आहे. त्याही पुढे जाऊन विज्ञाननिष्ठ असलेल्या माणसाने सश्रद्ध, भक्त असणे चुकीचे ठरवले जाते. मग तो ‘खरा विज्ञाननिष्ठ’ वगैरे उरत नाही. शास्त्रज्ञांनी देवपूजा करणे पाप वाटू लागते. याला महत्त्वाचे कारण म्हणजे आपण दोन्ही गोष्टींना एकमेकांच्या विरुद्ध उभे केले आहे.

विज्ञान विरुद्ध देव, विज्ञान विरुद्ध अध्यात्म अशी वर्गवारी करून वर्गसंघर्ष उभा केला आहे. वास्तविक दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. ज्या साधन चतुष्टयाचा आपण विचार करत आहोत, त्यातील ज्ञान, कर्म, भक्ती आणि वैराग्य ही मूल्ये लाकडाची मोळी बांधावी तशी एकत्र बांधलेली नाहीत. ती परस्पर विरोधी नाहीत. साधन चतुष्टय हा मूल्यांचा समुच्चय नाही, तो मूल्यांचा समन्वय आहे.

या मूल्यांचा समन्वय साधूनच आपल्याला ब्रह्मज्ञान, मोक्ष प्राप्त होणार आहे. केवळ ज्ञान, केवळ कर्म, केवळ भक्ती किंवा केवळ वैराग्य स्वीकारल्याने ब्रह्मज्ञान होणार नाही. प्रत्येक संताच्या ठिकाणी आपल्याला या मूल्यांमध्ये असलेला समन्वय आढळतो. तुकाराम महाराज कुठल्याही विद्यापीठात न जाता;

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा ।

येरांनी वाहावा भार माथा ॥

असे म्हणतात. त्यांच्या कार्याचा, विचारांचा अभ्यास करून अनेक विचारवंत विद्यापीठातून पीएचडी करतात. हे ज्ञान व हा अधिकार तुकाराम महाराजांनी भक्तीच्या मार्गातून मिळवला.

आपल्याला जे मिळत आहे, ते देणारी एखादी शक्ती आहे असे मानण्यात काहीच गैर नाही. कार्य आहे तर कर्ता आणि कारणही असतेच. ही सृष्टी आपोआप घडलेली नाही, ती घडवणारी एखादी शक्ती आहे. त्या शक्तीला आपण काय म्हणून ओळखतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, ती शक्तीच अमान्य करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे ती शक्तीच सर्व काही करते, असे म्हणणेही चुकीचे आहे.

एका विचाराने नास्तिक घडतो आणि दुसऱ्या विचाराने आस्तिक घडतो. दोघेही भांडत राहतात. म्हणून दोघेही भक्त होत नाहीत. भक्तीसाठी किंवा भक्त होण्यासाठी ज्या गोष्टी आपल्या आतच असाव्या लागतात, त्यांपैकी समर्पण, कृतज्ञता या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ शक्ती आहे, असे मान्य केल्याशिवाय समर्पण आणि कृतज्ञता शक्यच नाही.

समर्पण हे केवळ भक्तीतच असते, असे नव्हे. आपण नोकरी करतो तेव्हा आपण जेवढे नोकरीतल्या विहित कामाशी समर्पित असू तेवढी आपली प्रगती होत जाते. ‘कितीही करा पगार काही वाढणार नाही. मग काम करून काय उपयोग?’ हा विचार आपल्याला कामापाशी समर्पित होण्यापासून रोखतो. त्याहीपुढे जाऊन पगार वाढवण्यासाठी काम सोडून बॉसची खुशमस्करी करणे, इतरांची उणीदुणी काढणे, वरिष्ठांकडे तक्रारी करणे, असले अन्य मार्ग अवलंबण्यास भाग पाडतो.

या उलट आपण कामाशी समर्पित असू तर त्या कामात आपले प्रावीण्य वाढत जाते, नवनवीन गोष्टी आपण शिकत जातो. जिथे काम करतो तिथे जरी नोंद घेतली जात नसली तरी त्याची कुठे ना कुठे नोंद घेतली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपली प्रगती होत जाते. नाते, मैत्री, व्यवहार, ज्ञान, भक्ती यातही समर्पण लागतेच. त्यातून काय मिळते, याचे हिशेब घालण्यात काहीच अर्थ नसतो. सुनयना काचरू ‘तुम कहते हो कविता लिख दो’ या कवितेत म्हणते त्याप्रमाणे;

सारे तेवर गिरवी रख कर

उस को छुड़वाना पड़ता है

सब चतुराई बिक जाती है

जब शून्य कमाना पड़ता है

आपले सगळे अ‍ॅटिट्यूड गहाण ठेवून आपल्या आतल्या प्रतिभेला पैसे कमावण्याच्या नादाने कर्जबाजारी होण्यापासून सोडवावे लागते आणि हे करताना शून्य कमावण्यासाठी सगळी हुशारी सोडून द्यावी लागते. हे समर्पण आहे.

आपल्याला जे मिळत आहे ते आपण निर्माण केले नाही, ज्या शक्तीने ते केले त्याच्याविषयी कृतज्ञ असणे गरजेचे आहे. आपण धान्य विकत घेतले म्हणजे आपण त्याचे मालक होत नाही. आपण ते तयारही करत नाही. आपण त्यासाठी फक्त पैसे मोजतो.

आपण देवपूजा करतो म्हणजे तरी नेमके काय करतो? देवाचेच देवाला देतो. आपल्याकडे देवाला देण्यासारखे ‘माझे’ म्हणता येईल असे फक्त कर्मच असते. म्हणूनच जेवण करण्यापूर्वी हे अन्न कुठून आले, याचा विचार करावा. जेवण्यापूर्वी त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यासाठी आपल्याकडे भोजनविधी आहे त्याचा जरूर अभ्यास करावा.

ख्रिश्चनपंथीयसुद्धा जेवणाआधी प्रार्थना करतात. तेही कृतज्ञता व्यक्त करणेच आहे. केवळ आस्तिकानेच नव्हे तर नास्तिकानेही कृतज्ञ असावे. आपल्यात असलेले समर्पण, आपण कृतज्ञ असणे हीच भक्ती. मग ती सकाम आहे की, निष्काम आहे, हा मुद्दा गौण ठरतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

Cash For Job Scam: सरकारी नोकऱ्यांची विक्री म्हणजे गोव्याला झालेले 'गँगरीन'; आता 'बड्या' माशांचे काय? संपादकीय

Cash For Job Scam: सागर नाईकविरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद; 10 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT