Gomantak Tanishka Food Festival  Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Tanishka Food Festival: रानभाजी आणि आदिवासी खाद्य महोत्सव

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Tanishka Food Festival गोमन्तक तनिष्का व्यासपीठ’चे काम सुरू झाले आणि माझे वरचेवर खोतीगावला जाणे होऊ लागले. खोतीगावमधील साऱ्या महिलांनी ‘तनिष्का व्यासपीठ’ला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खोतीगावातील ३५० महिला ‘तनिष्का व्यासपीठ’च्या सभासद आहेत. सुरुवातीपासूनच इथल्या महिलांनी ‘तनिष्का व्यासपीठ’मध्ये आपला कृतिशील सहभाग नोंदवलाय.

‘तनिष्का व्यासपीठ’च्या माध्यमातून गोव्यातील महिलांसाठी ‘श्रावण उत्सव’ साजरा करायचा असे जेव्हा आम्ही ठरवले तेव्हा खोतीगावातील आदिवासींमध्ये ‘श्रावण’ अशी काही संकल्पना नाहीये असे इथल्या महिलांकडून समजले.

पण याच काळात रानावनात उगवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांच्या आहाराचा अविभाज्य भाग बनतात ही माहितीदेखील त्यांनी पुरवली. यावरून आम्ही खोतीगावातील तनिष्कांसाठी ‘रानभाजी आणि आदिवासी खाद्य महोत्सव’ आयोजित करायचे ठरवले.

canacona गेल्या आठवड्यात हा महोत्सव खोतीगावमध्ये पार पडला आणि गोव्यातील आदिवासी महिलांचे खाद्यजीवन कसे असते, हे या निमित्ताने आम्हांला अनुभवायला मिळाले.

काय होते या महोत्सवात?

श्रावणातले ऊन -पावसाचे दिवस हे रानभाज्यांचे दिवस असतात. पाऊस थोडीशी विश्रांती घेतो आणि ऊन पडायला लागते असा हा काळ असतो. याच दिवसात विविध रानभाज्या उगवतात. बाजारात आपल्याला अनेक रानभाज्या दिसत असतात पण त्या कशा बनवायच्या याची पद्धत माहिती नसल्यामुळे आपण ती रानभाजी घेत नाही.

अलीकडच्या काळात तर ही रानभाजी शहरातल्या बाजारात बघायलादेखील मिळत नाही. रानभाज्यांची माहिती जतन व्हावी, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी याच उद्देशाने ’रानभाजी आणि आदिवासी खाद्य महोत्सव’ आयोजित केला होता.

दर रविवारी माझी ‘खाद्यभ्रमंती’ तुम्हांला कोणत्यातरी नव्या रेस्टोरंटमध्ये घेऊन जाते, पण आज मात्र रेस्टोरंटऐवजी कायम उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेल्या गोव्यातील आदिवासी महिलांच्या खाद्यजीवनावर लिहायचे हे ठरवून टाकले होते.

काणकोण तालुक्यातील जंगलाने वेढलेल्या खोतीगावात राहणाऱ्या महिलांनी रानवनांत जाऊन बावीस प्रकारच्या रानभाज्या आणल्या होत्या. शिवाय आता घरी फारसे बनवले जात नाहीत, असे पदार्थ महिलांनी बनवले होते.

त्यांच्या कुळीथ, नाचणी, उकडे तांदूळ, चवळी या धान्यांपासून इथल्या घराघरांत बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ आणि त्यासोबत विविध प्रकारच्या रानभाज्या ‘तनिष्का गटा’तील महिलांनी बनवल्या होत्या. हेच या महोत्सवाचे मुख्य आकर्षण होते.

कधी ऐकल्या नाहीत, बघितल्या नाहीत अशा रानभाज्या या आदिवासी खाद्यमहोत्सवात महिलांनी असंख्य प्रकारच्या रानभाज्या बनवून आणल्या होत्या. ज्यांची नावे कधी ऐकली नव्हती की त्या रानभाज्या कधी बघितल्या नव्हत्या.

‘उरपुले’ भाजी, ‘तेनया’ भाजी, ‘मर तेनया’ भाजी, ‘कायरा’, ‘एक पाना’ भाजी, ‘कान्ना’ भाजी, ‘कातले’ भाजी, ‘मोरशेंडा’, ‘सासो’ भाजी, ‘वाळये’ भाजी, ‘चाया’ भाजी, ‘मसंगा’ भाजी या साऱ्या आगळ्यावेगळ्या रानभाज्या अनेकांनी पहिल्यांदाच बघितल्या आणि पहिल्यांदाच त्याची चवदेखील घेतली.

याशिवाय ‘पाती’ भाजी, ‘तायकिळो’, ‘कुडूके’ची भाजी, ‘तेरें’, ‘पाल्या’ भाजी, ‘किल्लं’, ‘फागलां’, ‘आळूं’, ‘सात शिराच्या भेण्या’ भाजी इ. भाज्यांचादेखील समावेश होता. यातल्या अनेक भाज्या बाजारात मिळत नाहीत. या भाज्या रानात जाऊन आणाव्या लागतात. मुळात त्या ओळखता येणे हेच मोठे कौशल्य आहे.

या सगळ्या महिला आपल्या आई - आजीसोबत कायम रानात जायच्या. त्यांचे सगळे आयुष्यच रानात गेले आहे. त्यामुळे त्यांना या भाज्या ओळखणे तसे अवघड नाही. त्यांना या भाज्यांबद्दल जशी माहिती आहे तशीच त्यांच्या औषधी गुणांबद्दलदेखील माहिती आहे.

औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या

सहभागी झालेल्या समस्त महिलांना रानभाज्यांचे औषधी गुणधर्मदेखील माहीत होते हे बघून स्पर्धेचे परीक्षक ज्ञानेश मोघे प्रभावित झाले. प्रत्येक रानभाजीचा औषधी गुणधर्म काय आहे, हे त्या सांगत होत्या. अंगदुखी, कंबरदुखी कोणती रानभाजी खाल्ल्याने कमी होते हे त्या अतिशय अनुभवाने सांगत होत्या.

पणजी, आजी, आई या पिढ्यांच्या हातातून तयार झालेल्या पाककृती घरातील पुढची पिढी जतन तर करत आहेच पण त्यासोबत या सगळ्या भाज्यांचा औषधी उपयोग काय हेदेखील जतन करतात हे बघून या साऱ्या आदिवासी महिलांचे कौतुक वाटले. या महिलांनी अनेक अतिशय वेगळ्या अशा पाककृती सांगितल्या पण यात खूपच वेगळी पाककृती वाटली ती ‘कायराचे फारें’.

कायराचे ‘फारें’

जसे आगळेवेगळे नाव तशीच त्याची अतिशय वेगळीच पाककृती. सूचना श्रीकांत गावकर (बाड्डे -खोतीगाव) आणि प्रज्ञा पांडुरंग गावकर (येडे, खोतीगाव) या दोघींनी बनवलेल्या रानभाज्यांमध्ये ’फारें’ नावाचा फारच वेगळा पदार्थ बनवला होता आणि त्यासोबत ज्यापासून हे ‘फारें’ बनवले जाते ते कायरादेखील ठेवले होते.

या कायरांनी आमचे लक्ष वेधून घेतले. साधारणपणे नदीच्या प्रवाहातील दगडाचे लहान -मोठे गुळगुळीत गोटे जसे असतात अगदी तसे दिसणारे कायरा त्यांनी आपल्या थाळीच्या शेजारी ठेवल्या होत्या. दुरुन ते दगडाचे गोटे वाटले.

थाळीच्या सजावटीचा एक भाग म्हणून ठेवले असतील असे सुरुवातीला वाटले परंतु जेव्हा या दोघींच्या थाळीतील पदार्थांची चव घ्यायला गेले आणि ते दगडाचे गोटे नाहीत तर ‘कायरा’ नावाची रानभाजी आहे हे समजले. कायराच्या दगडासारख्या बिया पहिल्यांदा चुलीत भाजून घ्याव्या लागतात. मग त्यावरील आवरण फोडून आतला वनस्पतीजन्य भाग बाजूला काढावा लागतो.

कायरामधून फोडून काढलेला भाग तीन वेळा उकडून घ्यायचा. तीन वेळा पाणी बदलून हा भाग पंधरा ते वीस मिनिटे उकडायचा. मग आपण जसा उभा कांदा चिरतो तसे त्याला चिरून घ्यायचे. कांदा आणि थोडा खोवलेला नारळ घालून ते शिजवायला ठेवायचे.

हे करत असताना दुसरीकडे एक मूठभर उकड्या तांदळाचे पीठ करून ते पीठ या शिजवत ठेवलेल्या फारेंमध्ये घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचे. हे फारें गोड आणि तिखट अशा दोनही पद्धतीने बनवतात. प्रत्यक्षात शिजवलेले फारें हे एखाद्या अळमीच्या प्रकारासारखे दिसतात. कायराचे फारें हे त्याच्या आगळ्यावेगळ्या पाककृतीमुळे लक्षात राहिले.

ताकद येण्यासाठी, सर्वप्रकारच्या हाडांच्या दुखण्यावर कायरा हे रामबाण उपाय आहे. ‘फक्त हे बनवत असताना तिथे कोणी गरोदर महिला नसावी आणि कायराचे फारेंदेखील गरोदर महिलेला खाण्यास मनाई आहे’, ही माहिती प्रज्ञा आणि सूचना यांनी दिली.

खोतीगावातील महिलांनी बनवलेले पदार्थ हे त्यांच्या समृद्ध आणि पौष्टिक खाद्य परंपरेचा वारसा जपणारे होते. खोतीगाव परिसरात महिलांसाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा खाद्यमहोत्सव आयोजित केला गेला. त्यामुळे मोठ्या उत्साहाने महिलांनी यात सहभाग घेतला होता.

बाजारात रानभाजी दिसली आणि ती विकत आणून घरी बनवली एवढ्यावरच चालत नाही, तर त्यामागील अशी काही वेगळी कारणे आहेत ती समजून घेतली पाहिजेत आणि त्यासाठी या आदिवासी महिलांकडून या साऱ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.

या समस्त महिलांनी आम्हांला केवळ चकितच केले नाही तर त्यांनी आमचे प्रबोधनदेखील केले. ‘गोमन्तक तनिष्का व्यासपीठ’चा हाच उद्देश होता जो रानभाजी आणि आदिवासी खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून सफल झाला!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT