भंडारी मिलिशिया

भंडारी लोकांबद्दल एडवर्डस लिहितात की, ‘हे ते लोक होते ज्यांचे पूर्वज सुरुवातीच्या काळात मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे आत्ताचे वंशज उत्तर कोकणात पूर्वीच्या लष्करी शक्तीच्या परंपरा जपतात’
Bhandari
Bhandari Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई बेट १६६७ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिल्यानंतर लवकरच, सुरतचे अध्यक्ष जेराल्ड आँगियर यांना राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. बेटाचे रक्षण करणे आणि किल्ल्याच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे किती कठीण काम आहे, हे आँगियर यांच्या लक्षात आले.

डच, पोर्तुगीज, मोगल, सिंधी आणि मराठा एकत्रितपणे किंवा एकेकटे कंपनीच्या व्यापार आणि मालमत्तेसाठी धोकादायक होते. भरीस भर म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीबाहेर संपूर्ण अराजकता पसरली होती. चोरी, दरोडे आणि खून नित्याचेच झाले होते.

अशा परिस्थितीत आँगियर यांना एक अतिरिक्त शिबंदी व नियमित चौकी बसवणे आवश्यक वाटले. (संदर्भ : एडवर्डस, १९२३ : द बॉम्बे सिटी पोलीस अ हिस्टोरिकल स्केच, १). एडवर्डसच्या म्हणण्यानुसार, अनेक हिंदू लोकांना लष्करी प्रशिक्षण मिळाले होते, पण ते नोकरी किंवा पेशाने सैनिक नव्हते.

या हिंदू लोकांत अनेकजण भंडारी समाजाचे होते आणि शेवटी फक्त तेच त्यात उरले. १७७१मध्ये या गटाला अधिकृतपणे ‘भंडारी मिलिशिया’ असे नाव देण्यात आले. (संदर्भ : एडवर्डस, १९२३ : द बॉम्बे सिटी पोलीस अ हिस्टोरिकल स्केच, ७)

भंडारी मिलिशियात असलेल्या लोकांबद्दल एडवर्डस लिहितात की, ‘हे ते लोक होते ज्यांचे पूर्वज सुरुवातीच्या काळात मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे आत्ताचे वंशज अजूनही उत्तर कोकणात त्यांच्या जातीच्या पूर्वीच्या लष्करी आणि राजकीय शक्तीच्या परंपरा जपतात’.

(संदर्भ : एडवर्डस, १९२३ : द बॉम्बे सिटी पोलीस अ हिस्टोरिकल स्केच, २) एडवर्डस यांनी असेही नमूद केले आहे की ते सर्व मुंबईचे जमीनदार होते. या विधानांवरून हे स्पष्ट होते की, भंडारी उत्तर कोकणातून अगदी सुरुवातीच्या काळात मुंबईत स्थलांतरित झाले आणि तेथे त्यांनी जमिनी घेतल्या.

कदाचित ते शहरात पहिल्यांदा स्थायिक झालेल्यांपैकी असू शकतात. ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेट ताब्यात घेण्यापूर्वी ते शहरात (तेव्हाचे मासेमारीचे गाव) होते की नाही किंवा लंडनच्या धर्तीवर मुंबईचा विकास करण्याच्या आँगियरच्या भव्य योजनेचा भाग म्हणून ते आले होते की नाही याची आम्हाला खात्री नाही. परंतु एडवर्डस यांच्या वरील विधानावरून असे दिसते की भंडारी मुंबईत आधीपासून राहत होते - सोळाव्या शतकात किंवा बहुधा त्याही आधी.

शिवाजी महाराजांनी आपल्या नव्याने स्थापन झालेल्या आरमाराच्या प्रमुखपदी दोन सुभेदारांपैकी एक म्हणून मायानाक भंडारी यांची नियुक्ती केली होती. (संदर्भ : सभासद, १६९४ : कृष्णाजी अनंत सभासदा विरचित शिवछत्रपतीचे चरित्र (सभासद बखर), ६८) शिवाजी महाराजांनी आपले आरमार या प्रदेशातील कोळी वगैरे खालच्या जातीच्या हिंदूंपासून बनवले होते. (संदर्भ यदुनाथ सरकार, १९२० : शिवाजी अँड हिज टाइम्स, २९९) सभासद बखर ’मायनाक म्हणोन भंडारी’ असे शब्द वापरते.

Bhandari
Inscription In Goan Temple: नागेशीतील 1413 चा शिलालेख

या बाबी आँगियारच्या निवडीमागे असलेली भंडारींची सैनिकी प्रशिक्षणाच्या इतिहासाची पुष्टी करतात. ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’चे गॅझेटियर १७व्या शतकाच्या मध्यात उत्तर कोकणातील भंडारी समाजाच्या स्थितीबद्दल आणखी एक उल्लेख करते:

त्यांनी पूर्वीच्या समुद्री चाच्यांच्या सरदारांना लागणाऱ्या बहुतेक लढाऊ माणसांचा पुरवठा केला आणि नावावरून असे दिसते की ते मूलतः खजिन्याचे रक्षक म्हणून वापरले गेले होते. एक दणकट, निरोगी आणि देखण्या पुरुषांचा समूह.

(संदर्भ : द गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी, १८८० : खंड १०, रत्नागिरी अँड सावंतवाडी, १२४) सरकार त्यांच्या जातीचा उल्लेख ’कास्ट ऑफ हजबंडमेन’, असा करतात; स्वत:च्या मालकीच्या किंवा इतरांच्या शेतीत वार्षिक शेतसाऱ्यावर शेती करणारे शेतकरी.

याचा अर्थ त्यांच्याकडे उत्तर कोकणात स्वत:ची जमीन होती किंवा कसण्यासाठी इतरांची जमीन उपलब्ध होती. हे एडवर्डसच्या ’जमीनधारक’ या त्यांच्या वर्णनाशी अगदी सुसंगत आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, ते एक तर सुरुवातीपासूनचे स्थायिक होते ज्यांच्या हातात मुबलक प्रमाणात तत्कालीन जमिनी होत्या.

Bhandari
Traditions of Goa: गोव्यातील ‘कणसांचे फेस्त’

जरी थर्स्टन आणि रिस्ले या दोघांनीही भंडारीबद्दल न्हावी म्हणून तपशीलवार वर्णन केले असले आणि व्यवहारात आम्हांला त्यांचा हंगामी फौज किंवा शिबंदी म्हणून उल्लेख सापडत असला तरी एक तिसरा उल्लेख भंडारींचा एक वेगळाच पैलू दाखवून जातो.

थर्स्टन यांनी बिल्लवा न्हाव्यांना ‘पडेल मडियाली’ किंवा ‘पडेल माडीवाला’ असे संबोधले आहे. पहिला शब्द कोकणी शब्द ‘पाडेली’ आणि दुसरा ‘माडेली’शी जुळतो का? हे ताडी काढण्याकडेही निर्देश करते का?

हे आणखी एक अनुमान असू शकते. सासष्टीतील केळशी गावात ताडी काढण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या समुदायाची वस्ती आहे. गावाचे स्थानिक नाव केळशी आणि थर्स्टनने भंडारीची केळसीशी असलेले साधर्म्य दाखवणे; यांचा काही परस्पर संबंध असू शकतो का?

भंडारी समाजाची एकच एक व्यावसायिक ओळख नाही. त्यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय स्वीकारलेले दिसतात. त्यामुळे, भंडारी अनेक जातींत आढळतात. गेल्या अर्ध्या शतकात राजकीय गरजांमुळे त्यांच्याभोवती निर्माण झालेले वलय.

त्या कारणास्तव स्वातंत्र्यानंतरची कोणतीही माहिती त्यांचे मूळ शोधण्याचे काम भरकटवू शकते. म्हणूनच आपल्याला आपला शोध १५व्या आणि १६व्या शतकातील संदर्भांपुरता मर्यादित ठेवावा लागेल. कदाचित गावकरी प्रणालीची नोंद करणारे काही सुरुवातीचे पोर्तुगीज दस्तऐवज आपल्याला या कामी मदत करू शकतील.

Bhandari
History Of Margao: स्वयंपूर्ण मठग्राम

पण, तेवढे पुरेसे होणार नाही. ‘भंडारी कोण आहेत?’ या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पोर्तुगीज काळाच्याही मागे जावे लागेल. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वडुकर या भौगोलिक उत्पत्तीवर आधारित तीन मूळ वांशिक त्रिकूटात भंडारी समाजाला बसवण्याची गरज आहे. त्यासाठी एकाच भंडारी समाजात असलेले जातींचे वैविध्य अनेकदा अडचणीचे ठरते.

हे काम कठीण आहे, पण निश्चितपणे ते अशक्य नाही. दख्खनच्या पूर्व-इतिहासातील संसाधनांचा मोठा खजिना अद्याप शोधला गेला नाही; त्याच्या फक्त एका टोकाचा अभ्यास केला गेला आहे. इनामगावमध्ये सांकलिया, अन्सारी आणि ढवळीकर यांनी केलेले उत्खनन ही केवळ सुरुवात आहे. या चॅकोलिथिक वसाहतींमध्ये आमचे मूलस्थान असल्याचे संकेत मिळाल्याचे आपण पाहिले आहे.

याचा शोध घेण्याचा आणखी एक आशादायक स्रोत म्हणजे देवता, मंदिरे आणि त्यांच्याभोवती वेढलेल्या परंपरांचा अभ्यास. हा लोकांनी जपलेल्यापरंपरांचा अभ्यास, त्यांचे मूळ शोधण्यासाठी माहितीचा समृद्ध स्रोत आहेत. सॉन्थेमर आणि शुल्मन यांच्या अभ्यासाने अनेक इतिहासकारांना आता त्या मार्गाचा अवलंब करण्यास प्रेरित केले आहे.

(सॉन्थेमर, १९८९ : पॅस्टोरल डेअटीज इन वेस्टर्न इंडिया आणि शुलमन, १९८० : तमिळ टेंपल मिथ्स) दख्खनमधील क्षत्रियांची ओळख उलगडण्यासाठी हा दृष्टिकोन किती उपयुक्त ठरला, हे आपण आधीच पाहिले आहे. तसाच तो भंडारी कोण आहेत, याची उकल करण्यासही उपयुक्त ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com