
पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोमांसाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. याचे मुख्य कारण शेजारील राज्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील गोमांस व्यापाऱ्यांनी सुरु केलेला संप असल्याचे सांगितले जाते. हा संप गेल्या एका महिन्यापासून सुरु आहे. या संपामुळे गोव्याला होणारा गोमांसाचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून याचा थेट परिणाम केवळ व्यावसायिकांवरच नव्हे, तर खाद्य सुरक्षा आणि पर्यटन उद्योगावरही होत आहे.
महाराष्ट्रातील (Maharashtra) गोमांस व्यापारी गेल्या एका महिन्याहून अधिक काळापासून संपावर आहेत. जनावरांची वाहतूक करताना कथित गोरक्षकांकडून होणाऱ्या छळाचा आणि हल्ल्यांचा निषेध म्हणून त्यांनी हा संप पुकारला आहे.
यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जनावरांची वाहतूक आणि मांसाचा व्यापार थांबला आहे. गोव्यातील गोमांसाचा मोठा पुरवठा याच राज्यांवर अवलंबून असल्यामुळे या संपामुळे गोव्याची संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
गोव्यातील गोमांस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनसब आर बेपारी यांनी सांगितले की, "सध्या गोव्यातील गोमांसाची दैनंदिन गरज सुमारे 25 टन आहे, ज्यामध्ये हॉटेल्स आणि कोल्ड स्टोरेजसाठीच्या पुरवठ्याचा समावेश आहे. पण सध्या आम्हाला दररोज फक्त 10 टन मांसाचा पुरवठा होत आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, "आम्ही हैदराबाद आणि इतर राज्यांतून जास्त दराने गोमांस विकत घेत आहोत, जेणेकरुन स्थानिक मागणी पूर्ण करता येईल. यात आम्हाला खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे, पण आम्ही अद्याप तरी ग्राहकांवर दरवाढ लादलेली नाही. हा संप कधी संपेल हे आम्हाला माहीत नाही."
या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी गोव्यातील गोमांस व्यापारी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एक निवेदन दिले. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केली. तसेच, मांसाचा तुटवडा भरुन काढण्यासाठी पुरवठ्याचे पर्यायी मार्ग शोधण्याची मागणीही त्यांनी केली.
निवेदनानुसार, काही लोक बेकायदेशीररित्या सीमेवर अडथळे निर्माण करुन मांसाच्या पुरवठा साखळीला ब्रेक लावत आहेत. मात्र कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था यावर प्रभावीपणे कारवाई करत नाहीत. म्हणून, व्यापाऱ्यांनी सीमेवर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या विशेष टीमची आणि मदतीसाठी हेल्पलाइन नंबरची मागणी केली आहे, जेणेकरुन कोणताही अडथळा येणार नाही.
यासंदर्भात एका सरकारी अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, "महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. कर्नाटकातील राणेबेन्नूरसारख्या काही भागांमध्येच बाजारपेठा सुरु आहेत. सोलापूर, फलटण आणि महाराष्ट्रातील इतर भागातील खासगी कत्तलखाने (Abbatoirs) पूर्णपणे बंद आहेत."
त्यांनी पुढे सांगितले की, "गोव्यातील (Goa) काही व्यापारी औरंगाबादमधून प्रक्रिया केलेले मांस मागवत आहेत, पण तो साठाही गेल्या आठवड्यात संपला आहे. व्यापारी त्या राज्यांतील स्थानिक राजकारण्यांशी बोलणी करत आहेत. मात्र ही परिस्थिती संप संपेपर्यंत अशीच राहील.” गोव्याच्या गोमांस संकुलाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश घनश्याम केणी यांनीही लवकरच हा संप संपेल आणि पुरवठा सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. या समस्येमुळे गोव्याच्या आर्थिक व्यवस्थेवर आणि स्थानिक नागरिकांच्या खाद्यसुरक्षेवर गंभीर परिणाम होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.