Island In Greece: ग्रेसफुल- ग्रीस

ग्रीक केवढा फोटोजेनिक आहे, ग्रीस केवढा ग्रेसफुल आहे याची साक्ष ही ग्रीक बेटे देतात.
Mykonos
Island in Greece
Mykonos Island in GreeceDainik Gomantak
Published on
Updated on

दत्ता दामोदर नायक

मिकोनासला ‘लिटल व्हेनीस’ म्हटले जाते. व्हेनीसमधले कालवे, पूल आणि गंडोला नसले तरी, मिकोनास व्हेनिस इतकेच सुंदर आहे. मिकोनासमध्ये न चुकता पाहावीत अशी विशिष्ट प्रेक्षणीय स्थळे नाहीत. कारण मिकोनासमध्ये पाहावे तेच प्रेक्षणीय आहे. केवळ पादचारी जाण्याएवढ्या चिंचोळ्या वाटा असलेला मिकोनासचा बाजार हा मिकोनासच्या सौंदर्याचा गुरुत्वमध्य आहे.

या बाजारातील दुकानांचा दर्शनीय भाग सफेद रंगाने रंगवलेला, त्यांच्या भिंती लाल, नारिंगी, पिवळ्या, जांभळ्या, गुलाबी रंगाच्या बोगनवेलीच्या पानांनी सुशोभित, सालंकृत झालेल्या, निळ्या रंगात रंगवलेल्या सुबक खिडक्या आणि दारे, पहिल्या माळ्यावर जाण्यासाठी घराबाहेरून केलेला जिना, जिन्यावर परत बोगनवेलीची उभी रांगोळी आणि जिन्याच्या सगळ्यात उंच पायरीवर झोपलेले सुस्त मांजर, असे हे जलरंगात रंगवलेले चित्र आहे.

Mykonos
Island in Greece
Traditions of Goa: गोव्यातील ‘कणसांचे फेस्त’

ग्रीक केवढा फोटोजेनिक आहे, ग्रीस केवढा ग्रेसफुल आहे याची साक्ष ही ग्रीक बेटे देतात. ‘ग्रेस’ ही संकल्पना आणि ’ग्रेस’ला योग्य प्रतिशब्द भारतीय भाषांत नाही. विशेषतः ’ग्रेसफुल’ या शब्दात अर्थाच्या अनेक सूक्ष्म छटा लपलेल्या आहेत.

ग्रेसफुल म्हणजे शोभिवंत नव्हे, सुंदर नव्हे, आकर्षक नव्हे. मूळ लॅटिन ग्रॅट्टा या प्लेझेंट या अर्थाच्या शब्दापासून इंग्रजीत ग्रेस व ग्रेसफुल हे शब्द आले. अनेक थर असलेल्या बाकालावाप्रमाणे अर्थाचे अनेक थर असलेला ग्रेसफुल हा इंग्रजीतला फार गोड, मधुर शब्द आहे.

निळ्या, निवळशंख पाण्याच्या तळ्यात पोहणारा शुभ्र हंस ग्रेसफुल तशी शरीराच्या सर्व अवयवात लवचिकता आणून लयबद्ध नाचणारी रशियन बेले डान्सरही ग्रेसफुल.

एप्रिलमध्ये फुलणारा जपानमधला चेरी ब्लॉसमचा गुलाबी साकुरा ग्रेसफुल तशीच आपल्या मुसमुसत्या तारुण्याला दोष न देता अंगावरच्या गच्च चोळीला दोष देणारी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलमधली शकुंतलाही ग्रेसफुल.

Mykonos
Island in Greece
History Of Margao: स्वयंपूर्ण मठग्राम

ग्रेसफुल ग्रीकचे आगळेवेगळे रूप पाहण्यासाठी सांतोरीनी बेटावर जावे. निळा घुमट असलेली शुभ्रधवल घरे म्हणजे सांतोरीनीच्या गर्भकुडीतील लावण्याचे लामणदिवे! डोंगर उतारावर बांधलेली ही घरे एकमेकांना अशी जोडली आहेत की वरच्या घराचे अंगण खालच्या घराचे छप्पर व्हावे.

घराच्या खाजगीपणाच्या (प्रायव्हेट स्पेस) आणि घराबाहेरच्या सार्वजनिक जाग्याच्या (पब्लिक स्पेस) सीमा सांतोरीनीत एकमेकांत मिसळून जातात. अवकाश (स्पेस), प्रमाणबद्धता (प्रोपोर्शन), लयबद्धता (र्हिदम), पुनरावृत्ती (रिपिटीशन), विसंगती (कॉन्ट्रास्ट), उपयोगिता (युटिलिटी) आणि सौंदर्यशास्त्र (ऍस्थेटिक्स) ही सांतोरीनीच्या स्थापत्याची वैशिष्ट्ये आहेत.

बेल टॉवर्स व असंख्य लहानमोठी कपेले, इगर्जी, चर्चेस या सुबक घुमटाकार वास्तूदेखील निळ्या व पांढऱ्या रंगात नटलेल्या आहेत. ग्रीसच्या झेंड्यात शुभ्र व निळा हे दोन्ही शुद्ध रंग आहेत. रंगाच्या इंद्रधनुष्यातून सांतोरीनीने नेमक्या या दोन रंगांची निवड केली आहे.

Mykonos
Island in Greece
भंडारी मिलिशिया

प्रत्येक रंगाला स्वतःचे व्यक्तिमत्त्व असते. शुभ्र रंग हे ताजेपणाचे प्रतीक आहे, साधेपणाचे, निरागसतेचे प्रतीक आहे. हा निष्पाप, निष्कलंक असा रंग आहे. त्याला पावित्र्याची चौकट आहे. परिपूर्णतेची किनार आहे. हा धारोष्ण दुधाचा रंग आहे.

मऊ मुलायम लोण्याचा रंग आहे, समुद्रलाटांच्या तुषारांचा रंग आहे, हिमशिखरांचा रंग आहे. पहाटे फुलणाऱ्या अनंताच्या फुलांचा हा रंग आहे. हा जाईचा, जुईचा, मोगऱ्याचा, बटमोगऱ्याचा, पारिजाताचा, चाफ्याचा रंग आहे. हा मोत्याचा रंग आहे, हा भरघोस पिकलेल्या कणसातील दाण्याचा रंग आहे. सर्व रंगांचे मिश्रण करून घडलेला शुभ्र रंग तृप्त, संतृप्त, समाधानी रंग आहे.

निळ्या रंगात गारवा आहे. हा कूल कलर आहे. ट्रॅन्क्वील, सिरीन कलर आहे. हा शांतीचा, करुणेचा रंग आहे, हा राजीव कमळाचा रंग आहे. निरभ्र आभाळाचा रंग आहे. शांत, प्रशांत समुद्राचा रंग आहे. हा मोराचा रंग आहे. मोरपीस माळणाऱ्या घननीळ कृष्णाचा रंग आहे.

अशा शुभ्र आणि निळ्या रंगाच्या मखरात सांतोरीनी बसली आहे. निळे आकाश, निळा समुद्र आणि निळी घरे असलेली ही निळवंती सांतोरीनी आहे. सांतोरीनीचे हे निळेपण लळा लावते. ‘हे माझ्यास्तव......हे माझ्यास्तव...’ हे शब्द नकळत आपल्या ओठी येतात. तोपर्यंत निळी सांतोरीनी आपल्यात पूर्ण विरघळून गेलेली असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com