Goa Football Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Football : गोव्यातील फुटबॉलला अवकळा

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

Goa Football : फुटबॉल स्पर्धेत गोवा राष्ट्रीय विजेता ठरला, त्याला खूप काळ लोटला आहे. त्यानंतर एकदाही तो योग जुळून आला नाही. दु:ख विजेते ठरलो नाही याचे नाही; फुटबॉल या खेळाबद्दल कमालीची अनास्था, हे खरे दु:ख आहे. उमेदच नाहीशी झाली तर, खेळाडू तयार होणार नाहीत, खेळही होणार नाही; हारजीत दूरच राहिली. जे खेळतात, त्यांचाच पराभव होतो; हरण्याआधी हरणारे खेळतच नाहीत, म्हणून ते जिंकूही शकत नाहीत!

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी दि. 26 मार्च 2012 रोजी राज्य विधानसभेत गोमंतकीय क्रीडाविषयक ऐतिहासिक घोषणा करताना फुटबॉल हा राज्य खेळ असल्याचे जाहीर केले व त्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले. त्याच वर्षी पर्रीकर यांनी गोवा फुटबॉल विकास मंडळाची (जीएफडीसी) मुहूर्तमेढ रोवली. प्रामाणिक उद्देश एवढाच होता, की या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील फुटबॉलची अधिकाधिक भरभराट व्हावी.

‘भारताच्या राष्ट्रीय संघात अर्ध्याहून अधिक गोमंतकीय फुटबॉलपटू असावेत’, हे पर्रीकर यांचे स्वप्न होते. पर्रीकर यांचा गोमंतकीय फुटबॉल गुणवत्तेवर दृढ विश्वास होता, जो अनाठायी नव्हता. कारण, साधारणतः पंधरा वर्षांपूर्वी भारतीय फुटबॉल संघाची बचाव आणि मध्यफळी महेश गवळी, समीर नाईक, क्लायमॅक्स लॉरेन्स, क्लिफर्ड मिरांडा या गोमंतकीयांवर विसंबून होती. ही चौकडी भारतीय संघातून एकत्रितपणे दीर्घकाळ खेळली, त्यामुळेच राष्ट्रीय संघातून एकावेळी अधिकाधिक गोमंतकीय खेळाडू खेळू शकतात हे पर्रीकर यांचे मत होते.

2013-14 पर्यंत आय-लीग फुटबॉल धेंपो स्पोर्टस क्लब, चर्चिल ब्रदर्स, साळगावकर एफसी, स्पोर्टिंग क्लब द गोवा असे चार एकत्रितपणे खेळले, तेव्हा राष्ट्रीय फुटबॉलमध्ये गोमंतकीय संघांचे निर्विवाद वर्चस्व होते. गोव्यातील क्लबतर्फे खेळण्यासाठी देशातील इतर भागांतील उदयोन्मुख, तसेच जम बसलेले फुटबॉलपटू मोठ्या संख्येने राज्यात दाखल होत होते. गोव्याचे पहिले दोन्ही अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर व ब्रुनो कुतिन्हो हे फुटबॉलपटूच.

या दोघांव्यतिरिक्त असामान्य प्रतिभा असलेले फुटबॉलपटू या राज्यात जन्मले आणि येथेच खेळून त्यांनी मोठा नावलौकिक प्राप्त केला. साधारणतः दशकभरापूर्वी गोव्याला भारतीय फुटबॉलची पंढरी मानली जात असे. 1998-99 ते 2012-13 या कालावधीत धेंपो, साळगावकर व चर्चिल ब्रदर्स या संघांनी मिळून एकत्रितपणे नऊ वेळा देशातील चँपियन क्लबचा किताब जिंकला. त्यापैकी पाच वेळा धेंपो क्लबने विजेतेपदाची पताका फडकावली. गोव्यातील फुटबॉल गौरवशाली, देदीप्यमान आहे. मात्र, आज याच राज्यातील फुटबॉल मैदानावर अवकळा आली आहे.

फुटबॉलला राज्य खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर, आता दशकभरानंतर गोव्यातील फुटबॉलची पीछेहाट, गळती पाहायला मिळत आहे. विख्यात फुटबॉल क्लब साळगावकर एफसी संघ व्यवस्थापनाकडून सीनियर संघाचे दरवाजे बंद करण्यात आले असून फक्त कुलूप लावणे बाकी आहे. लवकरच अधिकृत निर्णय होईल. साळगावकर एफसीचा सीनियर संघ राज्य फुटबॉल मैदानात न दिसणे हे येथील उदयोन्मुख फुटबॉलपटूंच्या दृष्टीने मारक आणि धक्कादायक आहे.

2015-16 मधील मोसम खेळल्यानंतर धेंपो क्लब, स्पोर्टिंग क्लब आणि साळगावकर एफसीने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) धोरणास विरोध आणि निषेध नोंदवत आय-लीग स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर धेंपो क्लबने युवा फुटबॉल विकासावर लक्ष केंद्रित केले. क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी एला-जुने गोवे येथे दर्जेदार फुटबॉल अकादमी कार्यरत केली. स्पोर्टिंग क्लबचा जोश संघाचे मालक पीटर वाझ यांच्या अकाली निधनानंतर कमी झालेला आहे.

चर्चिल ब्रदर्स संघ आय-लीग स्पर्धेत खेळतो, पण व्यावसायिकतेची स्पर्धा करताना त्यांची दमछाक होत आहे, त्यामुळेच आर्थिक अनुदानासाठी त्यांना राज्य सरकारकडे हात पसरावा लागतो आणि या कारणास्तव अधूनमधून चर्चिल आलेमांव यांचे भाजपप्रेम उफाळून येते. साळगावकर एफसीचे अध्यक्ष शिवानंद साळगावकर यांनी वडिलांचे स्वप्न जोपासत वाटचाल केली, पण आता गाडा हाकणे कठीण बनलेय हे त्यांच्या सीनियर संघाविषयीच्या निर्णयावरून जाणवते.

2014 साली इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर भारतीय फुटबॉलचा चेहरामोहराच बदलला. कमालीची व्यावसायिकता भारतीय फुटबॉलमध्ये अवतरली. देशातील फुटबॉलमध्ये आर्थिक अंदाजपत्रकाचा आलेख चढता ठरला आणि त्यात कितीतरी परंपरागत क्लबची वाताहत झाली. कोलकात्यातील दोन दिग्गज संघ मोहन बागान व ईस्ट बंगाल यांना आयएसएल स्पर्धेत प्रवेश मिळाला, पण त्यासाठी त्यांना क्लब पुरस्कर्त्याकडे गहाण ठेवावा लागला. यावरून बंगाली फुटबॉलप्रेमींत नाराजी उमटली. त्या पार्श्वभूमीवर यंदापासून संघाचे प्रमुख मालकी हक्क असलेल्या संजीव गोयंका यांनी मोहन बागानपुढील एटीके ही आद्याक्षरे लुप्त करावी लागली.

एफसी गोवा संघाची मालकी 2016 पर्यंत श्रीनिवास धेंपे व दत्तराज साळगावकर यांच्यापाशी संयुक्तपणे होती, मात्र नंतर वादग्रस्त पार्श्वभूमीवर त्यांना मालकी हक्क सोडावा लागला आणि एफसी गोवाची सूत्रे भारतीय कॅसिनो उद्योगजगतातील अग्रणी नाव असलेल्या डेल्टा कॉर्पच्या जयदेव मोदी यांच्याकडे गेली. एकंदरीत, आयएसएल स्पर्धा सुरू झाल्यापासून फ्रँचायजी फुटबॉलला बहर आला, तर पारंपरिक फुटबॉल क्लब गटांगळ्या खाऊ लागले. आय-लीग स्पर्धेबाबत एआयएफएफ गंभीर असल्याचे दाखवते, परंतु प्रत्यक्षात तसे जाणवत नाही. क्लब चालविणे जिकिरीचे बनत असून आर्थिक अंदाजपत्रक वाढत चालले आहे, अशा परिस्थितीत क्लब मालकांसमोर गहन प्रश्न उभा ठाकतो. गोव्यातील संघ मागे हटत असल्याने आता राज्यातील फुटबॉलपटूंना संधी आणि चांगले फुटबॉल खेळण्यासाठी इतर राज्यात जावे लागत आहे.

गोमंतकीय फुटबॉलकडे पुन्हा वळता, येथील राज्य खेळातील दयनीय स्थिती चिंतित करते. 2017 साली भारतात प्रथमच विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा झाली. 17 वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय संघात तेव्हा एकही गोमंतकीय नव्हता. 2022 साली 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धा देशात झाली, सामने गोव्यात झाले, परंतु राज्यातील एकही मुलगी राष्ट्रीय संघात दिसली नाही. सध्या बंगळुरू येथे सॅफ करंडक स्पर्धा सुरू आहे. भारताने पहिल्याच लढतीत पाकिस्तानला धूळ चारली. या सामन्यात गोमंतकीय, पण आता गोव्याबाहेरील क्लबतर्फे खेळणारा लिस्टन कुलासो चार मिनिटांसाठी मैदानात दिसला.

लिस्टनचा अपवाद वगळता भारतीय फुटबॉलमध्ये गोमंतकीय गुणवत्ता अभावानेच दिसते. गतवर्षी चर्चिल आलेमांव यांची गोवा फुटबॉल संघटनेच्या (जीएफए) प्रशासनातील सद्दी संपुष्टात आली. चर्चिल स्वतःला सच्चे फुटबॉलप्रेमी मानत असले, तरी त्यांच्याच कालखंडात गोमंतकीय फुटबॉलची मोठ्या प्रमाणात घसरण झाली. संघटनेची तिजोरी रिकामी झाली. आता नव्या कार्यकारिणीने धडपड करायला सुरुवात केलीय. यंदा प्रतिष्ठेच्या संतोष करंडक राष्ट्रीय स्पर्धेच्या मुख्य फेरीत पाचही सामने गमावण्याची पाळी गोव्यावर आली.

गोव्याने संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा पाच वेळा जिंकलेली आहे, तर आठ वेळा उपविजेतेपद मिळविले. मात्र शेवटच्या वेळेस गोवा राष्ट्रीय विजेता ठरला या घटनेस खूप वर्षे उलटली आहेत. 2008-09 मध्ये राष्ट्रीय विजेतेपदानंतर गोव्याने 2016-17 मध्ये घरच्या मैदानावर संतोष करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, पण बंगालचा संघ वरचढ ठरला. दोन वर्षांपूर्वी संतोष करंडक स्पर्धेत गोव्याचा संघ पश्चिम विभागीय फेरीतच गारद झाला. ही मोठी नामुष्की ठरली. राज्यात गोवा सरकार संचालित जीएफडीसी कार्यरत आहे, त्यांची राज्यभरात सुमारे चाळीस केंद्रे आहेत, पण कार्य मर्यादित स्वरूपात आहे.

पर्रीकर यांनी स्थापन केलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प दयनीय अवस्थेत आहे. राज्याचे महान फुटबॉलपटू, पद्मश्री पुरस्कारप्राप्त ब्रह्मानंद शंखवाळकर जीएफडीसी अध्यक्ष आहेत, त्यांना फुटबॉलच्या विकासासाठी खूप काही करायचे आहे, परंतु अध्यक्ष या नात्याने त्यांच्याही अधिकारक्षेत्रावर मर्यादा आहेत. गोव्यात फुटबॉल मैदानेही भरपूर आहेत, प्रशिक्षकही आहेत, पण दर्जा उंचावत नाही हे खेदजनक आहे. प्रत्येक वेळी राज्य सरकारवरच भरवसा ठेवायचा का, हा प्रश्नही उद्भवतोच. राज्य फुटबॉलमधील उदासीनता दूर करण्यासाठी आता संघटित प्रयत्न आणि योग्य तोडगा आवश्यक

आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT