
Mumbai Local Train Video: मुंबईतील हार्बर लाइनवरील ठाणे-वाशी लोकलमध्ये 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता एका प्रवाशाने केलेल्या कथित गैरकृत्यामुळे एक मोठा वादंग निर्माण झाला. लोकलमध्ये एका प्रवाशाने अश्लील वर्तन केल्याचा आरोप करत महिला प्रवाशाने त्याला जाब विचारला आणि त्याचा व्हिडिओ बनवला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. एवढच नाही तर तिने त्याला बेदम चोप देखील दिला. त्यानंतर त्या प्रवाशाने धावत्या ट्रेनमधून फ्लॅटफॉर्मवर उडी घेतली.
दरम्यान, या घटनेनंतर मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या काही बाबींमुळे या घटनेच्या सत्यतेवरच सवाल उपस्थित झाला आहे.
व्हिडिओमध्ये एक पुरुष प्रवासी एका सीटवर बसलेला दिसतो. त्याच्या मांडीवर एक बॅग ठेवलेली असून त्याने एक हात बॅगेच्या खाली लपवलेला आहे. महिला प्रवाशाने त्याला या स्थितीत पाहिल्यानंतर तिने त्याला 'मॅस्टरबेट' (हस्तमैथुन) करत असल्याचा आरोप करत जाब विचारला. महिलेने त्याला बॅग बाजूला घेण्यास सांगितले आणि जेव्हा त्याने बॅग बाजूला केली, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) येताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. लोकांनी त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अनेकांनी त्या व्यक्तीचा चेहरा व्हायरल करत, त्याला 'गुन्हेगार' ठरवले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका बाजूला संताप व्यक्त होत असतानाच, दुसरीकडे काही लोक व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण करुन वेगळीच चर्चा करत आहेत. हे लोक त्या व्यक्तीच्या बाजूने सहानुभूती दर्शवत नाहीत, तर केवळ घटनेतील काही संशयास्पद बाबींवर प्रकाश टाकत आहेत. या चर्चेनुसार,
हाताची हालचाल: व्हिडिओमध्ये बॅगेच्या आत असलेला हात फारसा हलताना दिसत नाही. सामान्यतः अशा कृत्यांमध्ये हाताची सतत हालचाल होत असते, जी या व्हिडिओमध्ये दिसत नाही.
कपड्यांची स्थिती: जेव्हा बॅग अचानक बाजूला घेतली जाते, तेव्हा त्या व्यक्तीच्या पॅन्टची चेन उघडी नव्हती किंवा कपडे अव्यवस्थित नव्हते. अचानक पकडल्यास कपड्यांमध्ये अव्यवस्था दिसणे अपेक्षित असते.
वर्तणूक: त्या व्यक्तीची देहबोली (Body Language) संशयित व्यक्तींसारखी नव्हती. तो महिलांकडे बघत नव्हता किंवा त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत नव्हता. जेव्हा त्याला जाब विचारला जातो, तेव्हा तो गोंधळलेला आणि भांबावलेला दिसतो. तो 'मॅस्टरबेटिंग' हा शब्दही समजू शकला नाही, ज्यामुळे त्याला इंग्रजीचा अभाव असावा आणि नेमके काय घडत आहे, हे त्याला कळले नसावे, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिकारशक्तीचा अभाव: आरोपी सहसा अशा वेळी जोरदार प्रतिकार करतात किंवा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. पण या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती शांतपणे बसलेला दिसतो आणि कसलाही प्रतिकार करत नाही.
या सर्व बाबींमुळे सोशल मीडियावर काही लोक 'घडलेली घटना गैरकृत्याचीच होती का?' असा प्रश्न विचारत आहेत.
दुसरीकडे, या घटनेने आपल्या समाजात आणि विशेषतः सोशल मीडियावर ‘सार्वजनिक न्यायालयाची’ (Court Of Public Opinion) संकल्पना किती प्रभावी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. अनेक लोकांनी घटनेची सत्यता पडताळणी न करताच त्या व्यक्तीचा चेहरा आणि वैयक्तिक माहिती व्हायरल केली.
कायद्यानुसार, जोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो निर्दोष मानला जातो. पण या घटनेत व्हायरल व्हिडिओच्या आधारे अनेकांनी त्याला आधीच दोषी ठरवून टाकले. यामुळे त्या व्यक्तीच्या सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
त्याचवेळी, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. मुंबई लोकलमध्ये महिलांना छेडछाड किंवा गैरकृत्यांच्या घटनांचा अनेकदा सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांचा संताप आणि भीती साहजिकच आहे. ही घटना, ती खरी असो वा नसो, महिलांच्या मनात असलेली भीती आणि असुरक्षितता दर्शवते.
सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. पोलिसांनी व्हिडिओतील सत्यता तपासणे, संबंधित व्यक्तीची चौकशी करणे आणि त्यानंतरच योग्य कारवाई करणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. सोशल मीडियाच्या जगात कोणत्याही घटनेवर त्वरित प्रतिक्रिया देण्यापूर्वी, आपण सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. न्याय हा न्यायालयाकडून मिळायला हवा, सोशल मीडियाच्या व्हायरल व्हिडिओतून नाही. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हे प्रशासनाचे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
या घटनेचे सत्य अजून समोर आलेले नाही, परंतु या व्हिडिओने महिलांच्या (Womens) सुरक्षेची खरी समस्या आणि ऑनलाइन न्याय प्रणालीची मर्यादा दोन्ही मुद्दे ठळकपणे समोर आणले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.