
Chaitanya Patil Protest: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या मनात एकच भीती घर करुन बसली आहे, ती म्हणजे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (NH-66) खडतर प्रवासाची.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी एक मोठी डोकेदुखी बनलेला हा महामार्ग आता केवळ खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे ‘जीवनवाहिनी’ ऐवजी ‘मृत्युवाहिनी’ बनत चालल्याची भावना लोकांमध्ये वाढत आहे. याच दुर्दशेला कंटाळून रायगड जिल्ह्यातील पेणमधील एक तरुण अभियंता चैतन्य पाटील याने एक अनोखा 'सत्याग्रह' सुरु केला आहे. महामार्गाची दुरवस्था थेट प्रशासनासमोर आणण्यासाठी तो पायी चालत प्रवास करत आहे, आणि आतापर्यंत त्याने 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले आहे.
चैतन्य पाटील हा एक सामान्य नागरिक असला तरी, त्याच्या आंदोलनाची पद्धत अत्यंत वैज्ञानिक आणि अभिनव आहे. केवळ घोषणाबाजी किंवा निदर्शने करण्याऐवजी तो जीपीएस (GPS) तंत्रज्ञानाचा वापर करून महामार्गाची प्रत्येक इंच माहिती गोळा करत आहे. तो त्याच्या फोनमध्ये खड्ड्यांची संख्या, त्यांचे आकार, रस्त्याची सद्यस्थिती आणि वाहतूक कोंडीची ठिकाणे यांसारखी सर्व आकडेवारी नोंदवत आहे. त्याचा उद्देश स्पष्ट आहे, ही सगळी आकडेवारी तो थेट संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे, जेणेकरुन त्यांना रस्त्याची नेमकी अवस्था काय आहे, याची कल्पना येईल. "हा महामार्ग आपल्याला चांगल्या दर्जाचा आणि अपघातविरहित करायचा आहे, यासाठी हा सगळा खटाटोप सुरु आहे," असे चैतन्यने सांगितले.
चैतन्यने आपल्या पायी प्रवासादरम्यान केवळ रस्त्याची माहितीच गोळा केली नाही, तर त्याने सरकारला काही थेट आणि रोखठोक प्रश्नही विचारले आहेत. "या महामार्गासाठी एवढ्या हजार कोटींचा निधी, तेवढ्या हजार कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते, मग हा निधी जातो कुठे?" असा प्रश्न त्याने विचारला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही त्याने परखड भाष्य केले. "नितीन गडकरी साहेब चांगले काम करतात, ते सांगतात आम्ही एका दिवसात एवढा किलोमीटर रस्ता बनवला. मग, मुंबई-गोवा महामार्ग आहे तरी किती किलोमीटर आणि तुम्ही कधी करणार?" असे थेट विचारुन चैतन्यने प्रशासनाला आरसा दाखवला.
या रस्त्याची अवस्था पाहून, "आपण देशातील सर्वात श्रीमंत राज्यातील नागरिक आहोत का?" असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. चैतन्य पाटीलचा हा सत्याग्रह केवळ एका रस्त्याबद्दल नाही, तर तो जनतेच्या वेदनेचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा एक जाहीर निषेध आहे.
दरम्यान, या महामार्गाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 21 कोटी रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले आहे. तसेच, महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनीही हा महामार्ग लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. पण ही केवळ आश्वासने आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाची विभागणी 12 टप्प्यांमध्ये करण्यात आले आहेत, ज्यापैकी 2 टप्पे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) तर 10 टप्पे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) आहेत.
अनेक विभागांमध्ये कामाची विभागणी झाल्यामुळे जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते. त्यामुळे कामाचा वेग अत्यंत मंद आहे, आणि म्हणूनच आजवर हा महामार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही. प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे कोकणच्या विकासाला खीळ बसली आहे, अशी टीका सर्वच स्तरांतून होत आहे.
चैतन्य पाटीलच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक प्रवासी आणि कोकणवासीय त्याच्या या भूमिकेचे कौतुक करत आहेत. तो फक्त आपल्यासाठी नाही, तर सर्वसामान्यांसाठी ही लढाई लढत आहे, ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे.
चैतन्यचा हा 'सत्याग्रह' हा प्रशासनासाठी एक थेट आव्हान आहे. या निमित्ताने तरी सरकार जागे होईल का, आणि गणेशोत्सवापूर्वी तातडीने रस्त्याची डागडुजी केली जाईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा प्रवास हा लाखो भाविकांसाठी आनंदाचा नाही तर त्रासाचा ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.