

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन हंगाम, गणेशोत्सव आणि वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला आणखी तीन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे अधिकृत थांबे मंजूर करण्यात आले आहेत. कोकण रेल्वे महामंडळाने याबाबतची अधिसूचना जारी केली असून 26 जुलै 2026 पासून टप्प्याटप्प्याने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
सावंतवाडी रोड स्थानकावर अधिक रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मार्च 2026 मध्ये यासंदर्भात पाठविण्यात आलेल्या पत्राची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक निर्णय घेतला. त्यानुसार राजधानी एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-मंगळुरू सुपरफास्ट एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना सावंतवाडी रोड येथे अधिकृत थांबा देण्यास मंजुरी देण्यात आली.
पावसाळ्यात कोकणातील निसर्ग अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. तसेच गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून हजारो कोकणवासी आपल्या गावी परततात. अशा वेळी सावंतवाडी रोड स्थानकावर अधिक गाड्यांचे थांबे उपलब्ध झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच प्रवाशांना पर्यायी रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहेत.
गाडी क्र. 12133 (सीएसएमटी – मंगळुरू)
सावंतवाडी रोड आगमन – सकाळी 7.02
प्रस्थान – सकाळी 7.04
अंमलबजावणी: 26 जुलै 2026
गाडी क्र. 12134 (मंगळुरू – सीएसएमटी)
सावंतवाडी रोड आगमन – रात्री 11.30
प्रस्थान – रात्री 11.32
अंमलबजावणी: 27 जुलै 2026
गाडी क्र. 12432 (निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम)
आगमन – सकाळी 6.18
प्रस्थान – सकाळी 6.20
अंमलबजावणी: 26 जुलै 2026
गाडी क्र. 12431 (तिरुवनंतपुरम – निजामुद्दीन)
आगमन – सकाळी 9.44
प्रस्थान – सकाळी 9.46
अंमलबजावणी: 28 जुलै 2026
गाडी क्र. 12201 (एलटीटी – तिरुवनंतपुरम)
आगमन – पहाटे 2.02
प्रस्थान – पहाटे 2.04
अंमलबजावणी: 27 जुलै 2026
गाडी क्र. 12202 (तिरुवनंतपुरम – एलटीटी)
आगमन – पहाटे 3.28
प्रस्थान – पहाटे 3.30
अंमलबजावणी: 30 जुलै 2026
सावंतवाडी रोड स्थानकावर या महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे सुरू झाल्यामुळे केवळ प्रवाशांचाच फायदा होणार नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कोकणातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनाशी संबंधित उद्योगांनाही याचा सकारात्मक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.