

Laxman Sivaramakrishnan BCCI Allegations: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी बीसीसीआय आणि क्रिकेट समालोचनाच्या जगाबाबत एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला. आयपीएल 2026 चा हंगाम सुरु होण्यापूर्वीच शिवरामकृष्णन यांनी समालोचनातून (कमेंट्री) संन्यास घेण्याची घोषणा केली होती, ज्याचे मुख्य कारण त्यांनी रंगभेद हे सांगितले होते. मात्र, आता त्यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर गंभीर आरोप केले.
आपल्या सख्ख्या मोठ्या भावाच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या काही मिनिटांतच आपल्याला ड्युटीवर हजर राहण्यासाठी फोन करण्यात आला होता आणि मानसिक दडपण आणून कमेंट्री करण्यासाठी भाग पाडले गेले होते, असा धक्कादायक दावा त्यांनी केला.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंगाचा उल्लेख करत लिहिले की, 'काही वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या भावाचे अचानक निधन झाले होते. संध्याकाळच्या वेळी आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि हे विधी पूर्ण होऊन अवघे काही मिनिटेच झाली असतील, तोच मला बीसीसीआयच्या (BCCI) ब्रॉडकास्टिंग डायरेक्टरचा फोन आला.
फोनवर मला सांगण्यात आले की, आता अंत्यसंस्कार पूर्ण झाले आहेत, तर तू उद्या सकाळी मोहालीमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या कमेंट्रीसाठी फ्लाईटने निघू शकतोस का?' शिवरामकृष्णन यांनी पुढे अत्यंत जड अंतःकरणाने लिहिले की, त्या परिस्थितीत स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून, शोक विसरुन मी मोहालीसाठी रवाना झालो आणि कर्तव्य बजावले.
या अनुभवाशिवाय त्यांनी आपल्या आयुष्यातील आणखी एका दुःखद घटनेची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, जेव्हा माझ्या आईचे निधन झाले, तेव्हाही मी पुण्यामध्ये बीसीसीआयसाठी कमेंट्रीचे काम करत होतो. आईच्या निधनाचे अतीव दुःख मनात ठेवूनही मला त्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. या सर्व त्यागानंतर आणि समर्पणांनंतरही मला ज्या प्रकारच्या भेदभावाला आणि वागणुकीला सामोरे जावे लागले, ते अत्यंत क्लेशदायक होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या खुलाशानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली असून खेळाडूंच्या मानसिक आरोग्याकडे आणि कौटुंबिक आपत्तीच्या काळात मिळणाऱ्या वागणुकीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी भारतासाठी 9 कसोटी सामने खेळताना 16.25 च्या सरासरीने 130 धावा केल्या आहेत, तसेच गोलंदाजीत शानदार कामगिरी करत 26 बळी आपल्या नावावर केले आहेत. याशिवाय 16 वनडे सामन्यांमध्ये त्यांनी 16 धावा करण्यासोबतच 15 फलंदाजांना बाद करुन भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. प्रदीर्घ काळ मैदानावर आणि समालोचन कक्षात घालवल्यानंतर त्यांनी घेतलेला हा संन्यास आणि केलेले आरोप सध्या क्रीडा वर्तुळात चर्चेचा मोठा विषय ठरत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.