

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यानंतर आयपीएल २०२६ च्या प्लेऑफची रेस आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. ईडन गार्डन्सवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा पराभव करत आपले प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवले आहे. कोलकाताच्या या विजयामुळे गुणतालिकेतील (Points Table) गणिते पूर्णपणे बदलली असून प्लेऑफ शर्यतीत असलेल्या इतर अनेक संघांची धडधड वाढली आहे. १६ मे रोजी झालेल्या या सामन्यात केकेआरने गुजरातवर २९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या दिमाखदार विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने चालू हंगामातील आपला पाचवा विजय नोंदवला आहे. केकेआरचे आता १२ सामन्यांत ११ गुण झाले असून त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकत सातवे स्थान पटकावले आहे. सध्या कोलकाताचा नेट रन रेट -०.०३८ असा आहे. केकेआरसाठी प्लेऑफचा पुढील रस्ता जरी कठीण असला, तरी या विजयाने त्यांनी स्पर्धेतील आपले अस्तित्व राखले आहे.
गुणतालिकेचा विचार केला तर सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) १६ गुणांसह आणि +१.०५३ च्या उत्कृष्ट नेट रन रेटसह गुणतालिकेत राजा बनून बसली आहे. आरसीबीने आतापर्यंत १२ पैकी ८ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, कोलकाताविरुद्ध पराभव पत्करावा लागूनही गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर कायम आहे. गुजरातचेही १६ गुण आहेत, मात्र त्यांनी १३ सामने खेळले आहेत. केकेआरने गुजरातच्या सलग पाच विजयांची मालिका खंडित केली असली, तरी +०.४०० नेट रन रेटसह गुजरात अजूनही मजबूत स्थितीत आहे.
गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद (SRH) असून त्यांच्या खात्यात १२ सामन्यांत १४ गुण आहेत. पंजाब किंग्स १३ गुणांसह चौथ्या स्थानावर तर राजस्थान रॉयल्स १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. राजस्थानकडे अजून तीन सामने शिल्लक असल्याने त्यांच्यासाठी प्लेऑफची दारे खुली आहेत. तसेच ५ वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) १२ गुणांसह सहाव्या स्थानावर असून त्यांचा नेट रन रेट +०.०२७ आहे.
दोन बड्या संघांचे पॅकअप: मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांचे प्लेऑफचे स्वप्न अधिकृतपणे भंगले आहे. ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स ८ गुणांसह नवव्या, तर लखनऊ सुपर जायंट्स खराब नेट रन रेटमुळे शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. दिल्ली कॅपिटल्स १० गुणांसह आठव्या स्थानावर असून त्यांचा नेट रन रेट -०.९९३ असा चिंताजनक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.