
फोंडा: गोव्याच्या राजकारणातील भिष्माचार्य ठरलेले धुरंदर नेते रवी सीताराम नाईक यांच्या आकस्मिक निधनाने सबंध गोव्याला धक्का बसला असून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या खडपाबांध-फोंडा येथील निवासस्थानी सकाळपासून प्रचंड गर्दी उसळली होती. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेताना अनेकांना अश्रू आवरले नाहीत तर काहीजणांनी हंबरडाच फोडला.
मंगळवारी (१३ ऑक्टोबर) रात्री रवी नाईक यांची प्राणज्योत मालवली. गेले दोन दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी कार्यक्रमालाही जाणे टाळले होते. बुधवारी आरोग्याच्या पूर्ण तपासणीसाठी ते बंगळुरूला रवाना होणार होते. रात्री जेवण घेतल्यावर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना फोंड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
रवी नाईक यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरताच खडपाबांध फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी रात्रीच लोकांनी धाव घेतली, सकाळी ते दुपारपर्यंत सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राजकारणी, समाजकारणी, कला, औद्योगिक तसेच इतर क्षेत्रातील लोकांनी रवी नाईक यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तोबा गर्दी केली होती. रवी नाईक यांच्या पत्नी पुष्पा तसेच पुत्र रितेश व रॉय यांच्यासह इतर कुटुंबीयांचे सर्वांनी सांत्वन केले.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू तसेच आमदार, मंत्री, माजी आमदार यांच्यासह तपोभूमी कुंडईचे पीठाधीश ब्रह्मेशानंद स्वामीजींनी अंत्यदर्शन घेतले, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, आम आदमी पक्षाच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनीही अंत्यदर्शन घेतले.
ओक्साबोक्शी रडले लोक!
रवी नाईक हे राजकारणातील एक अजब असे रसायन होते. विरोधकांनाही आपलेसे करण्याची त्यांची हातोटी होती. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाताना त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले. एका वयस्क बाईने तर ढसाढसा रडताना दसऱ्याच्या दिवशी त्यांनी माझ्या खोपटीवजा घरी येऊन पुरण पोळी खाल्ली होती त्याची आठवण काढली. खुद्द माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या डोळ्यांतून रवींचे अंत्यदर्शन घेताना घळाघळा अश्रू ओघळले.
बहुजनांचा आधारस्तंभअसलेल्या रवी नाईक यांच्या निधनाने गोव्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. रवी नाईक यांच्याशी आमची दोस्ती होती, त्यांच्याशी मतभेद असायचे; पण आम्हा दोघांमध्ये मनभेद कधीच नव्हते. सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचीही फार मोठी हानी झाली आहे.
सुदिन ढवळीकर, वीजमंत्री
नगरसेवक ते मुख्यमंत्री !
१) रवी नाईक यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी मोठी झेप घेत आपल्या कार्यकर्तृत्वाची झलक दाखवली होती. खासदार, सभापती असा पदभार सांभाळताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी कार्यप्रणाली सुलभ करताना नवीन खात्यांची निर्मिती त्यांनी केली.
२) सत्तेचे विकेंद्रीकरण करताना सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यावर त्यांनी भर दिलान त्यातूनच कला संस्कृती खाते, ओबीसी आयुक्तालयाचा जन्म झाला, ज्यामुळे प्रशासन सुलभ ठरले. फोंड्याचा सर्वांगीण विकास करताना राज्याच्या विकासावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले म्हणूनच विविध क्षेत्रात सोयीसुविधा उपलब्ध झाल्या
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.