

बिटस पिलानीतील आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे; परंतु ज्याने काल आत्महत्या केली, तो अर्जुन साबू हा विद्यार्थी २६ वर्षांचा व पीच.डी.चा उमेदवार होता. तेथे पीच.डी. अभ्यासक्रमात असणे म्हणजे तो जणू शिक्षक - कर्मचारीच असतो. तो संकुलात वास्तव्य करीत नव्हता. त्याच्यावर शिक्षणाचा ‘बोजा’ही तसा नव्हता. त्याच्या निकटचे विद्यार्थी सांगतात, की त्याने आत्महत्या करण्याची व संस्थेवर जबाबदारी येण्यासारखीही परिस्थिती नव्हती. पीच.डी.साठी नोंदणी करण्यापूर्वी त्याने नोकरीही केली होती. या वयात पीएच.डी.साठी प्रवेश घेणे म्हणजे पुरेसा प्रौढ - प्रगल्भ असा तो होता. शिक्षण संस्था किती म्हणून आपल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवू शकते? या आत्महत्येनंतर बुधवारी संस्थेतील मानसोपचार तज्ज्ञांनी त्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनाही फारसा प्रतिसाद लाभला नाही. मानसिक कमकुवतपणा हा तसा गुंतागुंतीचाच विषय आहे. ∙∙∙
सावर्डे मतदारसंघात अतिभव्य अशी तेंडुलकर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करून माजी मंत्री तथा माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी आपण अशा स्पर्धा आयोजनात ‘नंबर १’ कसा हे दाखवून दिले होते. त्यामुळे सध्या त्यांच्या नावाचा सावर्डेत गवगवा सुरू झाला आहे. अशातच विनय भाईंसाठी आणखी एक गोड बातमी म्हणजे, सावर्डे मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी जे कोण इच्छुक आहेत, त्यांचे हल्लीच भाजप प्रदेश समितीकडून सर्वेक्षण झाले हाेते. त्या सर्वेक्षणातही म्हणे विनय तेंंडुलकर यांनाच पहिला क्रमांक मिळाला आहे. इतरांची नावे म्हणे विनय भाईंच्याही खाली आहेत. आता लवकरच केंद्राकडूनही असे सर्वेक्षण केले जाणार असून या सर्वेक्षणाच्या आधारेच सावर्डेत भाजपची उमेदवारी कुणाला द्यावी हे ठरणार आहे, असे सांगितले जाते. ∙∙∙
प्रियोळ मतदारसंघात एसटी समाजाचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे व त्याच हिकमतीवर गोविंद गावडे यांनी निवडून येण्याची करामत साधली. आता एसटी समाजाचे नेते एकत्र येऊ पहात असल्याने प्रियोळमध्ये गावडे यांची उमेदवारी निर्धोक बनू शकते; परंतु मगोपशी युती करावी लागली तर भाजपपुढे गोविंद गावडे की दीपक ढवळीकर, असा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आपल्या भावासाठी युती तोडण्याची तयारी सुदिन ढवळीकर दाखवणार नाहीत; परंतु आणखी काही जागांवर ते पाणी सोडण्यास मात्र जरूर तयार असतील. मात्र, प्रश्न जिंकून येण्याचा आहे. गोविंद गावडे यांचे अस्तित्व डळमळीत बनले आहे. त्यात वास्तव असले, तरी दीपक ढवळीकर यांना तरी जिंकून येण्याची खात्री आहे काय? गेल्या निवडणुकीत ढवळीकर यांच्याबाबतीतील अनेक गोष्टी येथे चघळल्या जात होत्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, एसटी समाजाला राजकीय आरक्षण देता न आल्यास गावडे यांनाही उमेदवारी डावलण्याची हिंमत भाजप दाखवू शकेल काय, हा खरा प्रश्न आहे. ∙∙∙
‘‘मोडलेल्या खुर्साक कोण चेपे काडता?’’ अशी कोकणीत एक म्हण आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत वेळ्ळी मतदारसंघात आम आदमी पक्षाचे क्रुझ सिल्वा यांनी काँग्रेस व तत्कालीन मंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांना पराभूत करून आमदारकी मिळविली होती. फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी वेळ्ळी मतदारसंघात वर्चस्व गाजविले होते. आता येणाऱ्या निवडणुकीत फिलीप म्हणे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. फिलीप यांनी मतदारसंघात म्हणे आपले काम जोरात सुरू केले आहे. मंत्रिपदावर असताना क्रुझ सिल्वा यांनी फिलीप नेरी यांचा पराभव केला होता. आता राजकीय अज्ञातवासात असताना फिलीप नेरी क्रुझ सिल्वांना आव्हान देण्यास यशस्वी होऊ शकतील का? हाच खरा प्रश्न आहे. ∙∙∙
बंगाली भाषेतही शुद्धलेखन, शब्द निश्चित करताना तीन विचारधारी पंडितांचा वाद होतो. एकमताने तो मिटत नाही, असे बंगाली तज्ज्ञ पणजीत सांगत होते. कोकणीतील शब्द व शुद्धलेखन यासंदर्भात १२ विचारधारांचे विविध प्रकार व वाद, मतभेद सुरूच असतात. एकटा तज्ज्ञ म्हणतो, चूक-चं बहुवचन चुकी. इतर म्हणतात - चुको. तुझं चूक माझं(च) बरोबर हा वाद. निवेदक म्हणतो, मनाकाळजासावन तुमकां येवकारतात. किती मनं, किती हृदयं ते कळत नाही. मनासावन, मना-थावन, मनांतल्यान अगणित तऱ्हा. कालव्याला खारीज म्हणा, हा आग्रह. सामान्यांना ते खोरोज किंवा खाजूर वाटतं. कर्नाटकचे, केरळचे कोकणी पाणिनी आले तर बैठकीत खडाजंगी अपेक्षित. एकदा वादात एकट्याने पातळी सोडून शिव्या सुरू केल्या. शिव्या खाणारा विद्वान म्हणतो, ‘अपमान करतोस त्याचं वाईट वाटत नाही. शिव्यांचे चुकीचे उच्चार करतोस ते फार खटकतं.’ भाषाप्रेमाची अतिपराकाष्ठा ती ही. ∙∙∙
‘‘जी ‘नीट’ होत नाही, ती ‘नीट’ परीक्षा’’ असे म्हणण्याची वेळ आता ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर आली आहे. ‘नीट’ या शब्दाचा मराठी व इंग्रजी अर्थ आहे स्वच्छ, व्यवस्थित, योग्य याप्रमाणे. मात्र, वैद्यकीय, नर्सिंग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पातळीवरची ही प्रवेश परीक्षा योग्यपणे घेण्यात सरकारी व एनटीए यंत्रणेला सपशेल अपयश आले आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही नीट परीक्षेचा पेपर लीक झाला. सुमारे २८ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नॅशनल टेस्टिंग ऑथॉरिटी व सरकारी यंत्रणा खेळत आहे, असे खेदाने म्हणावे लागत आहे. नीट परीक्षेच्या वेळी केंद्रावर परीक्षा घेणारे किती काटेकोर व गंभीरपणे परीक्षा घेत असल्याचा ड्रामा करतात. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींच्या हातावरील दोरे कापतात. हेअर बँड चालत नाही. नाकात व कानात सोन्याचे दागिने घालायचे नाही. केवढा हा गंभीरपणा? मात्र एवढा गंभीरपणा परीक्षा योग्य पद्धतीने घेण्यात दाखविला असता तर बिचाऱ्या विद्यार्थ्यांना टेन्शन घेण्याची वेळच आली नसती. ∙∙∙
सावर्डे मतदारसंघात भाजपची उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी युवा नेते संकेत आर्सेकर यांनी सगळीकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे, असे सांगितले जाते. संकेत आर्सेकर यांना ‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ताफ्यातील कार्यकर्ते’ म्हणून यापूर्वी ओळखले जात होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात त्यांनी कामही केले आहे आणि या कार्यालयातील आपल्या पदाचा फायदा घेत त्यांनी सावर्डेतील अनेकांची कामेही करून दिली आहेत. त्यामुळे सावर्डेत संकेतला ‘मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतला माणूस’ म्हणूनच ओळखले जाते. अशा परिस्थितीत दोन दिवसांपूर्वी आसाम येथील कामाख्या देवीचे दर्शन घेताना संकेत आर्सेकर यांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे छायाचित्र झळकले आणि ‘मुख्यमंत्र्यांच्या जवळचा कार्यकर्ता’ यावर जणू शिक्कामोर्तबच झाले, असे त्यांचे समर्थक आता म्हणू लागले आहेत. ∙∙∙
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक बुधवारी अध्यक्ष सिद्धेश गावस देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठक तशी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. काही सदस्यांनी यावेळी ‘आम्हाला ज्यादा अधिकार कधी मिळणार’, असा सवाल उपस्थित केला. या ‘झेडपी’त भाजपचे वर्चस्व आहे. शिवाय हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच जुने सदस्य आहेत, तर बाकी सर्व नवीन चेहरे. यातही अधिकजण भाजपवालेच बरे का. सरकारने आम्हाला ज्यादा अधिकार देऊ, असे शपथविधी सोहळ्यात सांगितले होते. मात्र, अजूनही अधिकार मिळाले नाहीत हो, अशी तक्रार या सदस्यांनी केली. सिद्धार्थबाबाने त्यांना लवकरच आम्हाला हाही अधिकार मिळेल, असे गोड भाषेत सांगितले अन् सर्व सदस्यही खूश झाले. सरकार इतक्या लवकर ज्यादा अधिकार देणार नाही, हे सिद्धेशरावही जाणून आहेत तसेच अन्य झेडपीवालेही. शेवटी हे राजकारण आहे. खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी काही कसरती कराव्याच लागतात ना! ∙∙∙
३ मे रोजी घेण्यात आलेली नीट (यूजी) परीक्षा काल रद्द गेली. गोव्यासह इतर राज्यांतील ५५१ व विदेशातील १४ शहरांत २२ लाख वैद्यकीय पदवीधर डॉक्टर्स या परीक्षेला बसले होते. कैक महिने अभ्यास करूनही शेवटी हे फळ? बिहारात वेगवेगळे गैरप्रकार घडले होते. घोळ झाले होते. आता परीक्षेची तारीख नव्याने येणार. काही उमेदवार कुटुंबासह जर सुट्टीत विदेशात गेले असतील तर त्यांना परत यावं लागेल. परीक्षा दरवर्षी होते. त्यासाठी सुरक्षा, पारदर्शकता, उत्तरदायित्व नको का? पेपर फुटीची ही काही पहिली खेप नाही. पेपर फुटणे, या कारणावरून परत परत ती रद्द करणे, यावरून विद्यार्थ्यांना, पालकांना मन:स्ताप होतो, याची तमा आहे का राष्ट्रीय चाचणी यंत्रणेला? देशातील आयआयटी, यूपीएससी सिव्हिल सेवा या प्रवेश परीक्षा अशा रोगग्रस्त झाल्या आहेत. ‘देश हमारा निर्मल सुंदर गगन का तारा’, हे गाणं डॉक्टरांनी गावं का वाढता ताण सोसायला? ∙∙∙
प्रियोळ मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी यांना वाढदिनाच्या शुभेच्छा देणारे फलक झळकले. प्रियोळातील सातही पंचायत क्षेत्रांत बराच गाजावाजा झाला. यापूर्वीही अभंग रिपोस्ट, विविध स्पर्धांचे उद्घाटन, पारितोषिक वितरणप्रसंगी जल्मींचे फलक झळकले आहेत. पण कालच्या फलकबाजीतून विधानसभेसाठी राजकीय मोर्चेबांधणीची शक्यता अधिक दिसली. जिल्हा पंचायत निवडणुकीत विधानसभेसारखाच प्रचार झाला आणि अपक्ष जल्मी विजयी झाले. कारण गावडे विरोधक एकत्र आले, त्यातच त्यांना मगोपचीही साथ लाभली. आता वाढदिनानिमित्त सुनील जल्मी यांनी शक्तिप्रदर्शन केले. सर्व शाळांतून शालेय साहित्य वाटप, विविध क्लब, पंचायतींतर्फे शुभेच्छा देणारे फलक झळकले, या कामातही मगोप-भाजप समर्थकांचाच अधिक भरणा होता. त्यामुळे ही विधानसभेचीच तयारी असावी, अशी चर्चा जाणकारांत सुरू झाली. ∙∙∙
राज्यात सध्या रस्ते दुरुस्तीची कामे जोरात सुरू झाल्याने गावागावांत नव्या चर्चांना उधाण आले आहे. “सरकार काम करतेय हो!” असे काहीजण कौतुकाने म्हणताना दिसत आहेत, तर दुसरीकडे काहींचा संशय मात्र अजून कायम आहे. “रस्ते अचानक इतक्या वेगाने कसे आठवले?” असा मिश्किल प्रश्न विचारला जातोय. काही जाणकारांच्या मते, पावसापेक्षा निवडणुकीचे ढग जवळ आले की खड्ड्यांनाही भरून येण्याची सवय असते. त्यामुळे “मतदानाची चाहूल लागली की डांबरालाही ऊत येतो,” अशी गावाकडची भन्नाट टिप्पणी सध्या चांगलीच रंगते आहे. दरम्यान, अनेकांना एक गंमतही लक्षात आली आहे. वर्षभर नागरिकांनी खड्डे मोजायचे आणि निवडणुकीच्या आधी प्रशासनाने ते भरायचे! त्यामुळे काहीजण आता रस्ते दुरुस्तीला “लोकशाहीचा हंगामी उत्सव” असे नाव देऊ लागल्याची चर्चा आहे. ∙∙∙
फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर सध्या ‘ॲक्टिव्ह मोडवर’ असल्यासारखे वाटू लागले आहेत. त्यांनी फोंड्यात जनसंपर्क मोहीम सुरू केली असून जुन्या कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केल्याचेही पहायला मिळत आहे. हा त्यांचा खटाटोप काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याकरता आहे, हे उघडच आहे. पण असे असूनही उघडपणे ते आपण व दुसरे इच्छुक उमेदवार केतन भाटीकर दोघेही एकमेकांसोबत असल्याचे सांगताहेत. एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरा त्याच्याकरता वावरेल, असेही सांगायला ते विसरत नाहीत. हा म्हणजे ताकाला जाऊन गाडगे लपविण्याचा प्रकार झाला नाही का? पण राजेशराव घोडे मैदान आता जवळच आहे. कोण कोणासोबत आहे आणि कोण कोणाला धोबीपछाड देणार, हे लवकरच उघड होणार आहे. मात्र, सध्या फोंड्यात राजेशचा ‘ॲक्टिव्ह मोड’ आणि त्यांचा ‘सो कॉल्ड’ ‘दोस्ताना’ लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे, एवढे मात्र नक्की. ∙∙∙
‘सत्तेची पॉवर’ ही नशा असते. ते व्यसन एकदा लागले की सुटणे अशक्य. दारू, सिगारेट किंवा अमली पदार्थांचे व्यसन सोडणे शक्य आहे. मात्र, सत्तेचे व्यसन सुटणे अशक्य, असे म्हणतात ते खरेच. गेली अनेक वर्षे सरकारी खात्यात उच्च पदावर काम केलेले व सेवा निवृत्तीनंतरही आणखी काही वर्षे सत्ता भोगलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांची सत्तेची हाव अजून गेलेली नाही, असे दिसते. अनेक वर्षे सेवावाढ भोगून हल्लीच निवृत्त झालेले उत्तर गोव्या तील एक साहेब आता राजकारणात येण्याच्या प्रयत्नात आहेत. आपण राजकारणात उत्तम काम करू शकतो, असे ते लोकांना पटविण्याच्या प्रयत्नात आहेत. सेवानिवृत्ती पत्करलेले एक पोलिस अधिकारीही सक्रिय राजकारणात नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात आहेत. सरकारी अधिकारी आणि राजकीय नेतृत्व यात मोठा फरक असतो, हे जर कळायला हवे तर राजकारणात येण्यापूर्वी या अधिकाऱ्यांनी एल्विस गोम्स यांच्याकडून थोडेसे ज्ञान घेतल्यास त्यांना ‘ताल्ल्या बोडका सुवाद कळतलो’ असे राजकीय विद्वान सांगतात. ∙∙∙
चिंबल पंचायत उत्पन्नाचा दाखला देत नाही म्हणून पंचायत कार्यालयात जो काही गोंधळ झाला, त्याची थेट मानवाधिकार आयोगाने दखल घेतल्याने आता काही पंचायत सचिवांच्या कपाळावर आठ्या पडू लागल्याची चर्चा आहे. “आवाज उठवला तर आयोग हलतो,” हा नवा फॉर्म्युला लोकांच्या लक्षात आल्याने आता इतर पंचायतींतही नागरिक थेट सचिवांना प्रश्न विचारण्यासाठी जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, आमच्याकडेही समस्या आहेत; पण त्यांची दखल कोण घेणार? असा सवाल अनेक गावांतून ऐकू येतोय. मात्र, समस्या बाहेर यायच्या तर कुणीतरी पुढे येऊन आवाज उठवायलाच हवा, हेही आता लोकांना पटू लागले आहे. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते “फक्त अर्ज देऊन उपयोग नाही, थोडा आवाजही हवा,” असा मिश्किल संदेश फिरवत असल्याचे बोलले जाते. ∙∙∙
मडगावमध्ये काही दिवसांपासून रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू आहे. प्रत्यक्षात जे रस्ते चांगले आहेत, त्यावरसुद्धा हॉटमिक्सिंग करण्यात येते अशी टीका कॉंग्रेसचे सावियो कुतिन्हो करू लागले आहेत. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे व हे मडगावकर नाकारणार नाहीत. हे हॉटमिक्सिंग नियमानुसार केले जात नाही. त्यामुळे रस्ते उंच झाले आहेत व लोकांच्या घराचे प्रवेशद्वार खाली गेले आहे. याचा परिणाम आता लगेच नव्हे, तर पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरेल तेव्हा कळेल. पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. या कामामागचे सूत्रधार व कंत्राटदार मात्र गप्प राहून वेळ मारून नेणार आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालायला हवे अशी मागणी लोक करताना दिसत आहेत. मात्र, हे सगळे पालथ्या घड्यावर पाणी असेच असेल हे मागील अनुभव सांगतो हो की नाही? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.