

पेडणे: सरकारी कार्यालय म्हटले की नागरिकांच्या डोळ्यांसमोर लांबच लांब रांगा, वारंवार होणाऱ्या फेऱ्या, प्रलंबित फाईली आणि अंतहीन प्रतीक्षा असे चित्र उभे राहते. मात्र, पेडणे येथील साहाय्यक वाहतूक संचालक कार्यालयाने या पारंपरिक समजुतीला अक्षरशः छेद दिला आहे. ‘झिरो पेंडिंग वर्क’साठी हे कार्यालय आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
वाहन चालविण्याचा परवाना असो, वाहन नोंदणी प्रमाणपत्र असो किंवा अन्य कोणतीही सेवा; बहुतांश कामे अवघ्या तासाभरात पूर्ण होत असल्याने नागरिकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसत आहे. गर्दी कमी असल्यास वाहन चालविण्याचा परवानाही त्याच दिवशी मिळत असल्याचे सांगितले जाते. या सकारात्मक परिवर्तनामागे साहाय्यक वाहतूक संचालक कमलाकांत कारापूरकर यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि परिणामकारक प्रशासन असल्याची चर्चा आहे.
त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा कार्यालयात वाहन नोंदणी प्रमाणपत्रे आणि वाहन चालविण्याचे परवाने मिळून तब्बल २५० दस्तावेज धूळ खात पडून होते. टपाल विभागाला संबंधितांचे पत्ते शोधण्यात अडचणी येत असल्याने हे महत्त्वाचे दस्तावेज परत कार्यालयात जमा झाले होते. अनेक नागरिकांना आपल्या कागदपत्रांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे लक्षात येताच कारापूरकर यांनी नेहमीच्या प्रशासकीय चौकटीबाहेर जाऊन पुढाकार घेतला.
याचबरोबर वाहन नोंदणी प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाचे मूळ कारण शोधण्यावरही त्यांनी भर दिला. वाहनांची नोंदणी झाल्यानंतर उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी (एचएसआरपी) वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे वाहन वितरण रखडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार करून वाहन नोंदणीनंतर २४ तासांच्या आत उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले. या निर्णयामुळे वाहन खरेदीदारांची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणात कमी झाली.
वाहन विक्री करणाऱ्या शोरूमकडून आवश्यक कागदपत्रे वेळेत आरटीओ कार्यालयात सादर न झाल्याने अनेकदा वाहन नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात अडथळे निर्माण होत होते. या समस्येवरही कारापूरकर यांनी कठोर भूमिका घेतली. सर्व कागदपत्रे नियोजित वेळेत कार्यालयात जमा करणे शोरूमसाठी सक्तीचे करण्यात आले. नियमांचे पालन न करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेत शिस्त निर्माण झाली आणि कामकाजाला गती मिळाली.
पेडणे आरटीओ कार्यालयात एकही काम प्रलंबित राहत नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागरिक कार्यालयात येतो, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करतो आणि आपले काम करूनच परत जातो, अशी कार्यपद्धती येथे रूढ झाली आहे. लालफितीच्या जंजाळात अडकलेल्या सरकारी यंत्रणेची प्रतिमा बदलण्याची क्षमता प्रामाणिक प्रशासनात असते, याची प्रचीती पेडणे आरटीओ कार्यालय देत आहे. कार्यक्षमता, उत्तरदायित्व, शिस्त आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोन यांचा सुरेख संगम घडवत कमलाकांत कारापूरकर यांनी पेडणे आरटीओ कार्यालयाला आदर्श प्रशासकीय केंद्राचे रूप दिले आहे.
कार्यालयातील प्रलंबित कागदपत्रे नागरिकांच्या हाती पोहोचलीच पाहिजेत, या भूमिकेतून साहाय्यक वाहतूक संचालक कमलाकांत कारापूरकर यांनी शासकीय वाहनाचा वापर करून गावोगावी दस्तावेज पोहोचविण्याची मोहीम राबवली. प्रशासनातील संवेदनशीलतेचे आणि लोकाभिमुखतेचे हे दुर्मिळ उदाहरण ठरले. त्यामुळे अनेक नागरिकांना महिनोनमहिने अडकलेली कागदपत्रे थेट त्यांच्या दारात जाऊन मिळाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.