खरी कुजबुज: ...आणि रवींच्या बॅनरवर अवतरले ‘कमळ’!

Khari Kujbuj Political Satire: विजय युरोपात असतानाही गोंयकारपण विसरलेले नाहीत असे म्हणायचे तर
Khari Kujbuj Political Satire: विजय युरोपात असतानाही गोंयकारपण विसरलेले नाहीत असे म्हणायचे तर
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

...आणि रवींच्या बॅनरवर अवतरले ‘कमळ’!

‘रवी - रितेश यांच्या बॅनरमधून कमळ गायब’ अशा आशयाचे वृत्त दै. ‘गोमन्तक’मधून प्रसिध्द होताच रातोरात रवी व त्यांच्या पुत्रांच्या शुभेच्छा बॅनरवर ‘कमळ’ अवतरले. हा दै. ‘गोमन्तक’च्या बातमीचा परिणाम अशी चर्चा आज शहरात सुरू होती. दोनच दिवसांपूर्वी फोंड्यात ‘पोस्टर वॉरची नांदी’ ही खरी कुजबुज प्रसिध्द झाल्यावर फोंड्याचे नगरसेवक व फोंडा भाजपचे गटाध्यक्ष विश्‍वनाथ दळवी यांनी लगोलग शहरात आपले फलक लावले होते. ‘खरी कुजबुज’चा हा प्रभाव, असे आम्ही नाही फोंडा शहरातील लोकच म्हणत आहेत. ∙∙∙

विजयचे इटलीतही गोंयकारपण

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे सध्या युरोपच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी इटली देशातील पदुआ येथील सेंट अँथनीज बासिलिका चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. याचा फोटो त्यांनी समाज माध्यमांवर टाकला असून आपण गोव्यातील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणजे विजय युरोपात असतानाही गोंयकारपण विसरलेले नाहीत असे म्हणायचे तर..!

एफडीएची कारवाई दिखाऊ!

अन्न व औषध प्रशासन खात्याकडून (एफडीए) एखादा सण आला की खाद्यपदार्थांच्या दुकानांवरील पदार्थांची तपासणी केली जाते. त्यांची ही कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, हे खाद्यपदार्थ दुकानांवर वर्षाचे बाराही महिने विकले जातात. त्यावेळी त्याची तपासणी अधूनमधून होत नाही. कोणी तरी तक्रार केली की या खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग येते. राज्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मावा तसेच खाद्यपदार्थ राज्याबाहेरून येतात त्यावर या खात्याचे कोणते नियंत्रण आहे. आंतरराज्य प्रवासी बसेसमधून अशा पदार्थांची वाहतूक होते. काही दिवसांपूर्वी या खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हापसा येथील बसस्थानकावर पहाटेला जाऊन कारवाई केली. त्यामुळे या भेसळयुक्त खाद्यपदार्थांची वाहतूक बंद झाली का व त्याचे पुढे काय झाले याकडे दुर्लक्ष होते. ठोस कारवाईच होत नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस कारवाई झाली, तरी दुकानधारकांना मोठेसे सुखदुःख नसते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून होणारी कारवाई काही दिवसांपुरती होऊन ती बंद होते. त्यामुळे त्याची भीती व धाक या दुकानांवर राहत नाही अशी स्थिती आहे. ∙∙∙

मांद्रेतील टॅक्सीवाल्यांचा सूर जीतविरोधी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासोबत झालेल्‍या पेडण्यातील टॅक्सी आंदोलकांच्या बैठकीला म्हणे पेडणे तालुक्यातील एकाच आमदाराला बोलावले. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना बोलावलेच नाही. त्यांना नेमके का बोलावले नाही, याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. मांद्रेतील टॅक्सीचालकही त्या आंदोलनात होते, असे स्वतः आरोलकर यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळेच आपण टॅक्सी आंदोलकांची भेट घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मग मध्येच, असे काय झाले की आरोलकर यांना टॅक्सी आंदोलकांनी वगळले. बहुतेक टॅक्सी आंदोलकांनी जीत यांना धडा शिकवण्याचे योजले असावे. एकेकाळी आरोलकर आमच्यासोबत उभे राहून गोवा माईल्स नको असे म्हणत होते आणि आज सरकारसोबत असून आम्हाला फसवू पाहात असल्याचे काही टॅक्सी व्यावसायिक म्हणत आहेत. त्यामुळे अशा रंग बदलूला, आम्ही धडा शिकवू, असा सूर सध्या मांद्रेतील टॅक्सीवाल्यांनी आळवायला सुरवात केली आहे. ∙∙∙

ओबीसींच्या दोन संघटना...

प्रत्येक घरात बऱ्याचदा वैर हे असतेच. वैर नाही ते सदासुखी. त्याचप्रमाणे प्रत्येक जातीत दोन गट आहेत, गोव्यात तरी! त्याचप्रमाणे ओबीसींमध्येही दोन संघटना आहेत. एक महासंघ आणि दुसरी महासभा. दोन्ही संघटना ओबीसींच्या कल्याणासाठी झटत आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमाला एकसंध होण्यासाठी आवाज दिला जातो. मात्र, एक प्रश्‍न उपस्थित होतो, तो म्हणजे ओबीसी बांधवांत फूट पाडणाऱ्या या दोन्ही संघटना कधी एकत्रित येणार? दोन्ही संघटना एकसंध झाल्या तरच आवाज बुलंद होईल ना..! आता कुणाचे कुठे मानपान अडकले आहे कुणास ठाऊक, पण ओबीसी बांधवांना तरी दोन्ही संघटना एकत्रित आलेल्याच हव्या आहेत. ∙∙∙

आगपाखड नको, अनुकरण तरी करा!

सत्ताधारी भाजपच्या नव्या मुख्यालयाची वास्तू कदंब पठारावर उभी राहणार आहे. नुकतेच त्याचे भूमीपूजनही झाले आहे. काँग्रेसवाले मात्र त्यासाठी पक्षाध्यक्ष का आले नाहीत त्याबाबत तर्क करून आपलेच हसे करून घेत आहेत. खरे म्हणजे वीस - पंचवीस वर्षे सरकार असूनही आपले सुसज्ज कार्यालय का उभे राहू शकले नाही, त्याचा विचार करायला हवा होता, पण तो केला असता तर त्या पक्षावर ही वेळ आली नसती. पणजीतील काँग्रेस कार्यालय खरे म्हणजे त्याकाळी पक्षात असलेल्या ‘छोट्या खाशें’मुळे टिकले होते व त्यात काही सुविधा झाल्या होत्या, तर मडगावचे दक्षिण गोवा कार्यालय त्यावेळी वीजमंत्री असलेल्या आलेक्स सिकेरांमुळे साकारले होते. भाजपने सत्तेवर आल्यानंतर लगेच पणजीत व नंतर मडगावात हायफाय कार्यालय उभे केले व आता त्यांचे मुख्यालय होत आहे. त्यावर आरोप करणाऱ्यांनी आपले केवळ नेतेच गब्बर झाले पक्ष तसाच राहिला याची नोंद घेतली, तर बरेच काही साध्य होईल. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: विजय युरोपात असतानाही गोंयकारपण विसरलेले नाहीत असे म्हणायचे तर
खरी कुजबुज: काब्राल यांची दहीहंडी

‘डायलॉग’ची स्पर्धा !

जनतेशी कनेक्ट होण्यासाठी गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी ‘संडे डायलॉग’ सुरू केला. त्याची दखल जनतेबरोबरच राजकर्त्यांनीही घेतली. आता विजय डायलॉग सुरू करतात, म्हणजे ‘आप’चे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस कसे स्वस्थ बसतील? त्यांनी ‘महिला डायलॉग’ सुरू केला आहे. बाणावलीत घेतलेल्या ‘महिला डायलॉग’ला महिलांकडून चांगले समर्थन लाभल्याने भारावलेल्या व्हेंझी यांनी आता प्रत्येक मतदारसंघात, असे डायलॉग घेण्याचे जाहीर केले आहे. आता काँग्रेस व भाजप कधी ‘डायलॉग’ सुरू करतात हे पाहावे लागेल.∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: विजय युरोपात असतानाही गोंयकारपण विसरलेले नाहीत असे म्हणायचे तर
खरी कुजबुज: दादांना पडू लागलीत आमदारकीची स्‍वप्‍ने

युवा नेत्यांची चलती

मडगावात सध्या युवा नेत्यांची भलतीच चलती असल्याचे दिसून येत असून आगामी विधानसभा निवडणूक हे तर त्यामागील कारण नाही ना? असा सवाल मडगावातील लोक करू लागले आहेत. मडगावात अनेक समस्या आहेत त्या आजकालच्या नाहीत तर गेल्या अनेक दशकांच्या आहेत, पण या युवा नेत्यांना आताच त्यांची जाणीव होणे हीच तर खरी गोम आहे. त्यांतही मुद्याची बाब म्हणजे यातील कोणीच मंडळी या समस्या सोडविण्यासाठी मैदानात उतरलेली दिसत नाही. अनेकांचा रोख या समस्यांसंदर्भात बाबांवर आहे, पण नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे आजवर बहुतेक जण बाबांचीच तळी उचलून धरत होते. बाबांबरोबर असताना यापैकी कोणालाच त्यांना सांगून वा त्यांच्याकरवी मडगावच्या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा शोधण्याची तसदी त्यापैकी कोणीच घेतली नाही. किंबहुना त्यांनी ते केले असते, तर मडगावचे बहुतेक प्रश्न तर सुटले असतेच, पण त्याच बरोबर नवे प्रश्न तरी तयार झाले नसते. अनेकांना तर असे वाटते की आगामी निवडणुकीत बाबा आपल्या चिरंजीवांना पुढे करण्याची शक्यता असून त्यांना शह देण्यासाठीच नवे युवा नेते शड्डू ठोकत असावेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com