खरी कुजबुज: काब्राल यांची दहीहंडी

Khari Kujbuj Political Satire: ज्ञानमंदिर असलेल्या उसगावातील प्राथमिक शाळेची अशी अवस्था का?
Khari Kujbuj Political Satire: ज्ञानमंदिर असलेल्या उसगावातील प्राथमिक शाळेची अशी अवस्था का?
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

काब्राल यांची दहीहंडी

कुडचडे शहरात आत्तापर्यंत भाजपच्या युवा शाखेशी संबंधित असलेले युवा नेते रोहन गावस देसाई हे जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करत असत आणि त्याला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असे. मागच्या वर्षी या कार्यक्रमाला कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल उपस्थित होते. मात्र, यावेळी रोहन यांचा कार्यक्रम होणारच, पण काब्राल यांनी स्वतःचा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचे समजते. असे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे रोहनची कुडचडेत लोकप्रियता वाढू लागली आहे. काब्राल यांनी त्याचा धसका तर घेतला नाही ना?∙∙∙

राणेजी ज्ञानमंदिराकडे लक्ष द्या!

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मतदारसंघातील उसगाव येथील एका प्राथमिक शाळेला गळती लागली आहे. शिक्षण खात्याने या शाळेच्या छप्परावर पॉलिथिन टाकल्याची पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. ही पोस्ट वाचून नेटीझन विश्वजीत राणे यांना ट्रोल करीत आहेत. साहेब मंदिर उभारण्यात, देव देवतांना सोने अर्पण करण्यात आपण कोट्यवधी रुपये खर्च करता. तसेच गणेश मंडळांना लाखो रुपये खर्च करता. आपल्याकडे हे सर्व करण्यास वेळ व धन आहे, मग ज्ञानमंदिर असलेल्या उसगावातील प्राथमिक शाळेची अशी अवस्था का? असा प्रश्न विश्वजीत यांना त्यांचे मतदार विचारीत आहेत. बाबा या शाळेसाठी आपली कवाडे खुली होणार का? ∙∙∙

नेटीझनचे खोटे कर्म!

काही लोकांना जखमेवर मीठ चोळण्याची सवय असते. आपल्या देशात व राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात मोठी वाढ झालेली आहे. आजच्या आधुनिक युगात या देशाची कन्या सुरक्षित नाही हे आपले दुर्दैव्य. मात्र, महिला अत्याचारावरून राजकारण होते. नारी सबलीकरण करण्याचे सोडून काही नेटीझन समाज माध्यमांवर मस्करी करण्यात मग्न आहेत. ज्या महिलांना संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत घरी परतण्यास जर वाहन उपलब्ध झाले नाही, तर गोवा पोलिसांना संपर्क साधल्यास वाहन चुकलेल्या महिलेस पोलिस वाहनातून त्यांच्या घरी मोफत पोचविण्याची व्यवस्था पोलिस करणार अशी पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, ही पोस्ट खोटी असून पोलिसांकडे अशाप्रकारची कोणतीच व्यवस्था नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा या खोट्या नेटीझनना कोण लगाम घालणार? ∙∙∙

बाप्पा नेमका कोणाला पावणार?

सावंत मंत्रिमंडळाची पुनर्रचना आता गणेशचतुर्थीनंतर होणार असे सांगितले जात आहे. त्यावेळी कोणाला वगळले जाईल व कोणाचा समावेश केला जाईल याबाबत वेगवेगळे तर्क लढविण्याचे काम स्वतः राजकीय पंडित म्हणविणारे करत आहेत, पण प्रत्यक्ष काय होणार ते दिल्लीश्वरच जाणोत. कारण भाजपाची ती खासियत आहे. त्यामुळे स्वतः दोतोर मुख्यमंत्रीसुध्दा अंदाज व्यक्त करत नसावेत. यापूर्वी त्यांनी एकदा एकाला वगळून दुसऱ्या एकाला आपल्या मंत्रिमंडळात घेतले, पण त्याचा कोणताच फायदा लोकसभा निवडणुकीत झाला नाही. उलट ज्याला वगळले त्याची आपल्या मतदारसंघावर पकड असल्याचे आढळले. त्यामुळे पुन्हा तसेच काही घडू नये याची काळजी त्यांना घ्यावी लागेल असे भाजपा वर्तुळात बोलले जात आहे. दुसरीकडे चार मंत्र्यांना वगळून अन्य चारजणांचा समावेश केला जाईल असे वृत्त आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकलेली असून त्यांनी आपले हातपाय हलविण्यास व आपल्या गॅाडफादरांना आळवण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे ऐन गणेशचतुर्थीच्या काळात राज्यात राजकीय हालचाली तेज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ∙∙∙

काँग्रेसला आप भारी?

आम आदमी पार्टी, काँग्रेस हे लोकसभा निवडणुकीवेळी इंडी आघाडीत होते. मात्र, त्यानंतर बाणावलीत झालेल्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसला खाक्या दाखवत आपला उमेदवार उभा केला व निवडूनही आणला. तेव्हापासून काँग्रेस व आम आदमी पार्टीमध्ये थोडी दरी उत्पन्न झाल्याचे दिसत आहे. आम आदमी पार्टीने २०२७ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे. पश्र्चिम बंगालात महिला डॉक्टरवर जो अत्याचार व खून झाला, त्यावर इंडी आघाडीतील काँग्रेस किंवा इतर मित्र पक्ष काहीच बोलत नाही. कारण टीएमसीच्या ममता दीदींचे राज्य आहे. मात्र, गोव्यात आम आदमी पार्टी इंडी आघाडीत असूनही त्या विरोधात आवाज उठवत आहे. त्यांचा हेतू कदाचित वेगळा असावा. परवाच बाणावलीत महिला सुरक्षा संवाद आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी आयोजित केला व त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. आता आम आदमी पार्टी संपूर्ण गोव्यामध्ये हा संवाद साधणार आहे. म्हणजे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला महिलांची मतांद्वारे सहानुभूती मिळाली तर मिळाली! मग काँग्रेस काय करणार हाच प्रश्न सध्या काँग्रेसवाल्यांना पडला आहे. ∙∙∙

दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी कोण?

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत भाजपचेच वर्चस्व असल्याने याच पक्षाचा उमेदवार अध्यक्ष होईल याबद्दल कोणाचेही दुमत नसावे. अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे महिलाच अध्यक्ष होणार हे नक्की. पण अध्यक्षपदासाठी भाजप उमेदवारांमध्ये चुरस असल्याचे कळते. संजना वेळीप आणि अनिता थोरात यांच्यामध्ये एका बाजूने सध्या रस्सीखेच सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूने भाजप पक्षश्रेष्ठींनी आपण जो उमेदवार ठरवणार तोच अध्यक्षपदी आरूढ होणार अशी भूमिका घेतली आहे. सध्या आदिवासी राजकीय आरक्षण मुद्यावरून भाजप सध्या काही प्रमाणात बॅकफूटवर आहे. याची प्रचिती पक्षाने लोकसभा निवडणुकीत अनुभवली आहे. संजना वेळीप यांची अध्यक्षपदी निवड करून वेळीप समाजाचा पक्षावरील रोष कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल असे सध्या बोलले जात आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: ज्ञानमंदिर असलेल्या उसगावातील प्राथमिक शाळेची अशी अवस्था का?
खरी कुजबुज: आयआयटीसाठी चढाओढ!

कोणाच्या किती टॅक्सी?

राज्यात सध्या मोपा विमानतळावरील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचा विषय गाजत आहे. आपल्या काही मागण्यांसाठी टॅक्सी व्यावसायिकांनी संप पुकारला आहे, परंतु या सर्व गोंधळात काही दिवसांपूर्वी किनारी भागातील एका आमदाराच्या अमुक एवढ्या टॅक्सी असल्याचा विषय चर्चिला गेला होता. आता तर विना नावे तीन पानांची माहिती देणारे पत्रक व्हायरल झाले आहे. यामध्ये मोपा विमानतळावर असणाऱ्या टॅक्सी काउंटरकडे किती टॅक्सी नोंदीत आहेत याची पूर्ण माहिती दिली आहे. त्यात म्हणे डिचोली आमदाराच्या भावाच्या, पेडणे आमदारांकडे कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तसेच काही सरपंचांच्या घरातील सदस्यांच्या नावे म्हणे टॅक्सी व्यवसाय चालत आहे. विमानतळावर उपलब्ध असलेल्या काउंटरच्या यादीतील ‘जयमीस’ ब्रॅण्ड कोणाचा आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न या पत्रकाद्वारे झाल्याचे स्पष्ट होते. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: ज्ञानमंदिर असलेल्या उसगावातील प्राथमिक शाळेची अशी अवस्था का?
खरी कुजबुज: नावेली स्‍टेडियमचे कवित्‍व

कोकणी नव्हे ‘कोंकानी’ला हवी अधिकृत मान्यता

एवढे दिवस काहीजण राजभाषा कायद्यात बदल करून रोमी कोकणीला देवनागरी कोकणी बरोबर मान्यता हवी असे म्हणत होते. त्यासाठी त्यांची आंदोलने चालू आहेत. मात्र, आज राय ग्रामसभेत कोकणी नव्हे तर ‘कोंकानी रोमी लिपी’ला अधिकृत मान्यता हवी असल्याचे स्पष्ट झाले. जेव्हा रोमी कोकणीला अधिकृत मान्यता देण्याचा ठराव मंजूर झाला, तेव्हा सरपंचाने ठराव मांडणाऱ्या इसमाला सांगितले की आपल्या ठरावात कोकणी नव्हे तर ‘कोंकानी’ लिहा. आम्ही जसे बोलतो तसे लिहिले पाहिजे. सभागृहाबाहेर मात्र ‘कोंकानी’ ही नवी भाषा आहे का असा प्रश्न सर्वांच्याच चेहऱ्यावर पडलेला दिसला.∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com