गोविंद गावडेंकडून प्रियोळात इतिहासाची ‘पुनरावृत्ती’ होणार?

आपचीही मुसंडी : प्रियोळात ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : प्रियोळ मतदारसंघातले वातावरण सध्या तप्त झाले असून कोण कोणावर कुरघोडी करणार, यावर चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी तर यावर पैजाही लावल्या आहेत. मतदारसंघातून दोनदा निवडून येणे हा प्रियोळचा ‘इतिहास’ आहे. मागचे तीनही आमदार हे सलगपणे दोनदा निवडून आले आहेत. या इतिहासाची पुनरावृत्ती गावडेंकडून होते,का हाच या भागातील लोकांसाठी औत्सुक्याचा अन् पैजेचा विषय आहे. (Govind Gaude Priol News Updates)

Govind Gaude
आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या विजयावर केला शिक्कामोर्तब

प्रियोळ हा मतदारसंघ 1989 मध्ये अस्तित्वात आला. मगोपचे डॉ. काशिनाथ जल्मी हे या मतदारसंघाचे पहिले आमदार. 1994 साली त्यांच्या पुढे जबर आव्हान ठाकले होते. त्यावेळी प्रियोळ मतदारसंघात ‘नायलॉन 66’ विरोधी वातावरण जोरात होते. त्यामुळे डॉ. जल्मींच्या विरोधात हवा निर्माण झाली होती. ‘नायलॉन 66’ विरोधकांतर्फे वेरे वाघुर्मेचे तत्कालिन सरपंच मोहन वेरेकर यांना मैदानात उतरविण्यात आले होते. पण वातावरण विरोधी असूनही डॉ. जल्मी शिवसेना व भाजपच्या सहाय्याने 1300 मतांनी विजयी झाले होते. 2002 साली सतरकर हेच पुन्हा निवडून आले होते. 2007 साली सतरकरांवर मगोपच्या दीपक ढवळीकर यांनी मात केली होती. 2012 साली त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या गोविंद गावडे यांच्यावर 2000 च्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केला होता. मात्र 2017 साली अपक्ष गोविंद गावडेंनी भाजपच्या पाठिंब्याने मगोपचे दीपक ढवळीकर यांच्यावर 4800 मतांनी विजय मिळवून 2012 सालच्या पराभवाची परतफेड केली होती.

आता चेहरे तेच असले तरी समीकरणे बदलली आहेत. गोविंद गावडे हे भाजपचे (BJP) उमेदवार आहेत, तर दीपक ढवळीकर हे त्याच मगोपच्या उमेदवाराच्या भूमिकेत आहेत. मध्यंतरी या मतदारसंघातील भाजपची उमेदवारी उद्योजक संदीप निगळ्ये यांना मिळणार, अशी हवा निर्माण झाली होती. निगळ्ये पण आपल्यालाच ही उमेदवारी मिळणार, असा दावा करीत होते. पण भाजप श्रेष्ठींनी उमेदवारीकरिता कला संस्कृती मंत्री गोविंद गावडेंना पसंती दिली, अन्‌ उमेदवारी कोणाला, या वादावर पडदा पडला. पडदा पडला असला तरी आग शमलेली नाही. यामुळे भाजपमध्ये दोन गट पडले असून एक गट निगळ्येंच्या बाजूने तर एक गट गोविंद गावडेंच्या बाजूने दिसतो आहे. काहींनी तर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. या उमेदवारीच्या वादामुळे प्रियोळचे वातावरण बरेच गरम झाले होते. एकामेकांचे ‘पोस्टर्स’ फाडण्यापर्यंत मजल गेली होती. गणेश चतुर्थी व दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या निगळ्येंच्या फलकावर भाजप नेत्यांचे फोटो होते. तर गोविंद गावडेंच्या फलकावर त्यांचा स्वतःचाच फोटो दिसत होता. पण आता भूमिकांत अदलाबदल झाली असून त्याचा परिणाम काय होईल, हे बघावे लागेल. मगोपतर्फे दीपक ढवळीकर हे रिंगणात उतरले आहेत.

Govind Gaude
भाजपकडून खाण अवलंबितांना खोटी आश्‍वासने: पालेकर

गोविंद गावडे आणि दीपक ढवळीकर यांनी प्रचाराला नेट लावला असून ते प्रियोळ (Priol Constituency) पिंजून काढताना दिसत आहेत. त्याचबरोबर मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनीही प्रियोळात प्रचार करण्याबाबत कोणतीही कसर बाकी ठेवलेली दिसत नाही. भाजपचे प्रचारक अजूनतरी प्रियोळात दिसत नाहीत. अपक्ष संदीप निगळ्ये यांनी प्रचार सुरु केला असला तरी त्यांची भूमिका आता बदलल्यामुळे आपली नवी भूमिका मतदारांना पटवून देण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागतो आहे. कॉंग्रेसतर्फे दिनेश जल्मी आलेले दिसत नसले तरी येत्या काही दिवसात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचाराचा ‘धुरळा’ उडणार आहे,असे समजते.

Govind Gaude
हळदोण्यात 'ग्लेन विरूध्द किरण' निवडणूक सामना रंगणार

जल्मी यांना उमेदवारी दिली असली तरी कॉंग्रेसचा या मतदारसंघात प्रभाव नसल्यामुळे ते फार मोठी उडी घेऊ शकतील,असे वाटत नाही. रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे (Revolutionary Goans) विश्वेश नाईक या युवकाला उमेदवारी दिली असून ते आपल्या युवा कार्यकर्त्यांबरोबर प्रचार करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे दिग्विजय वेलिंगकर हे रिंगणात उभे असले तरी त्यांची उमेदवारी कॉंग्रेसलाच अधिक मारक ठरू शकते,असा होरा व्यक्त होत आहे. पण यात वैशिष्ट्य म्हणजे ते तिघेजण एकाच पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. पण गोविंद गावडे मात्र 2017 साली अपक्ष म्हणून निवडून आले असून आता ते भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. तरीपण 2017 , सालीही त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता. तसेच ते गेली पाचवर्षे सरकारात कला व संस्कृती मंत्री म्हणून कार्यरत होते, हेही तेवढेच खरे आहे. या मतदारसंघाचा कानोसा घेतल्यास इथे प्रामुख्याने मगोप भाजपचाच प्रभाव आढळतो.

2020 मध्ये झालेल्या जि.पं. निवडणुकीत बेतकी खांडोळा या प्रियोळातील पाच ग्रामपंचायतीचा समावेश असलेली जिल्हा पंचायत भाजपने तर प्रियोळ व कुर्टी या प्रत्येकी एक ग्रामपंचायत असलेल्या जि.पंचायती मगोपने जिंकल्या होत्या. यातून मगोप व भाजपचे सम समान असलेले प्राबल्य अधोरेखित होते. त्यामुळे जो कोण आपली वैयक्तिक मते या मतांना जोडू शकेल, तोच यशाचा किनारा गाठू शकेल,हे निश्चित आहे. आता गोविंद गावडे या मतदारसंघाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतात, की या इतिहासाला छेद देतात, याचे उत्तर निकालातूनच मिळेल.

Govind Gaude
लोबो दांम्पत्याची कळंगुट-शिवोलीत कसोटी

तिरंगी लढतीचे संकेत

2019 साली झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या सुभाष शिरोडकरांनी मगोपच्या दीपक ढवळीकरांवर सत्तर मतांनी निसटता विजय मिळवला होता. या पराभवाची परतफेड करण्याकरिता दीपक ढवळीकर शिरोड्यातून उतरतील की काय, असे वाटत होते. पण त्यांनी प्रियोळातच पुनरागमन करून याच मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे आता परत एकदा मगोपचे दीपक ढवळीकर व गोविंद गावडे यांच्यात लढत होणार असून तिसरा कोन म्हणून अपक्ष संदीप निगळ्ये असण्याची शक्यता दिसत आहे.

Govind Gaude
हे सरकार भ्रष्टाचाराचं आणि दादागिरीचं; पालेकरांची भाजपवर खरमरीत टीका

स्थानिकालाच संधीचा नारा

प्रियोळात सध्या ‘व्होकल फॉर लोकल’ अर्थात स्थानिक आमदारच हवा, या नाऱ्याचा सूर आळवला जात आहे. प्रियोळ हा फोंडा तालुक्यातला एकमेव असा मतदासंघ आहे. जिथे स्थानिक आमदारच हवा, असा प्रचार सुरु आहे. सध्या आपचे नोनू नाईक यांनी झोकून दिले आहे. नोनूनी सध्या माशेल सारख्या भागात धडाकेबाज प्रचार सुरु केला असून स्थानिक आमदार नसल्यामुळे गेल्या पंधरा वर्षात प्रियोळचा म्हणावा तसा विकास झाला नाही, असा दावा ते करताहेत. आता त्यांचा दावा मतदार किती उचलून धरतात, हे बघावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com