पणजी: हळदोणे हा बार्देश तालुक्यातला एक महत्त्वाचा मतदारसंघ. यात हळदोणे, मयडे, पोंबुर्फा, बस्तोडा, उसकई व एकोशी या सहा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. काहींसा विखुरलेला असा हा मतदारसंघ. म्हापशाची हद्द संपली, की हळदोणे मतदारसंघाची हद्द सुरु होते. हळदोणेत भाजपचे ग्लेन टिकलो यांच्यासमोर तृणमूलच्या किरण कांदोळकर यांनी आव्हान उभे केले आहे.आम आदमी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले महेश साटेलकर अन् कॉंग्रेसच्या ॲड.कार्लूस परेरा यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.
माजी उपमुख्यमंत्री तथा सभापती दयानंद नार्वेकर यांचा हळदोण्यावर चांगला वरचष्मा असायचा. 2002, 2007 साली ते या मतदारसंघातून सलग निवडून आले होते. पण 2012 साली भाजपच्या ग्लेन टिकलोंकडून त्यांचा पराभव झाला. 2017 साली टिकेलोंनी कॉंग्रेसच्या अमरनाथ पणजीकर यांचा 4412 मतांनी पराभव करून दुसऱ्यावेळी विधानसभेत प्रवेश केला. आता ग्लेन टिकलो पुन्हा भाजपच्या उमेदवारीवर रिंगणात उतरत आहेत. पण यावेळी त्यांचा जवळचा प्रतिस्पर्धी कॉंग्रेस नसून तृणमूल कॉंग्रेसचे (TMC) किरण कांदोळकर हे आहेत. किरण कांदोळकर हे 2012 साली थिवी मतदारसंघातून निवडून आले होते. पण 2017 साली त्यांचा कॉंग्रेसच्या नीळकंठ हळर्णकरांकडून 900 मतांनी पराभव झाला होता.
आता त्यांनी हळदोणे मतदारसंघ स्वीकारला असून आपली पत्नी कविता यांना थिवीतून रिंगणात उतरविले आहे. वास्तविक कांदोळकर हे गोवा फॉरवर्डतर्फे (Goa Forward) निवडणूक लढविणार होते, ते फॉरवर्डचे कार्याध्यक्षही होते. पण अचानक त्यांनी तृणमूलला जवळ करून तृणमूलची उमेदवारी पटकावली. गेली वर्ष- दीड वर्षे ते हळदोण्यात कार्य करीत असून त्यांनी विद्यमान आमदार ग्लेन टिकलो यांच्यासमोर जबरदस्त आव्हान उभे केले आहे. यावेळी कॉंग्रेसने (Congress) ॲड. कार्लुस परेरा यांना उमेदवारी दिली असून परेरा एक वकील म्हणून चांगलेच परिचित आहेत. त्याचबरोबर ते कॅथलिक असल्यामुळे टिकलोंच्या मतांना खिंडार पाडू शकतात. याचा फायदा कांदोळकरांना होऊ शकतो.
मागच्या वेळी आपच्या उर्सुला डिसौजा यांनी 3272 मते मिळवून तिसरा क्रमांक मिळविला होता. यावेळी साटलेकर त्यात किती भर घालतात हे बघावे लागेल. मात्र सध्या कांदोळकर व टिकेलो यांच्यात ‘तू तू मैं मैं’ सुरु झाले असून एकामेकांवर कुरघोडी करण्याची अहमहमिका लागली आहे. दोघेही अनुभवी असल्यामुळे राजकीय हातखंड्यात ‘वाकबगार’ आहेत. दोघेही सध्या आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. आता मतदार कोणाला जवळ करतात, आणि कोणाला दूर ठेवतात, याचे उत्तर आगामी दिवसात मिळणार हे निश्चित.
नार्वेकरांचा पत्ता कट ; साटेलकरांची वर्णी
आपतर्फे महेश साटलेकर यांना उमेदवारी दिली असून ते या लढतीचा चौथा ‘कोन’ बनले आहेत. साटलेकर हे पूर्वाश्रमीचे मगो कार्यकर्ते. 2017 साली त्यांनी मगोतर्फे निवडणूक लढविली होती. आणि त्यांना चौथा क्रमांक प्राप्त झाला होता.यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचे घाटत होते. पण मगोपने तृणमूलशी युती केल्यामुळे हा मतदारसंघ तृणमूलला देण्यात आला. आणि त्यामुळे साटलेकरांची गाडी चुकली. नंतर त्यांनी आपमध्ये प्रवेश करून त्या पक्षाची उमेदवारी मिळवली. सुरुवातीला ही उमेदवारी माजी सभापती दयानंद नार्वेकर यांना मिळणार,अशी चर्चा सुरु होती. नार्वेकरांनी हळदोण्यात आपले कार्यालयही सुरु केले होते. पण नंतर नार्वेकरांचा पत्ता कट करण्यात येऊन त्यांच्या जागी साटलेकरांची वर्णी लावण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.