Goa Politics: खरी कुजबुज; ‘माझे घर’चे गाजर

Khari Kujbuj Political Satire: सत्ताधाऱ्यांबाबतच्‍या निराशेतून जनता बाहेर पडते, आपला मतदानाचा अधिकार बजावते आणि विरोधकांना भरभरून मते देते, असा एक समज असतो.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

‘माझे घर’चे गाजर

जिल्‍हा पंचायत निवडणूक तोंडावर आलेली असतानाच सरकारने ‘माझे घर’ ही योजना आणून लोकांची बेकायदेशीर घरे कायदेशीर करणार अशी लालूच मतदारांना दाखविली होती. आता हे ‘माझे घर’ भाजपला पावणार की नाही, हे आता सोमवारीच स्‍पष्‍ट होणार असले तरी नावेली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या रुमडामळ पंचायत क्षेत्रात काल जिल्‍हा पंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. मागच्‍या पंचायत निवडणुकीवेळी या भागातील मतदारांनी ठरवून भाजप विरोधी मतदान केल्‍याने भाजपला रुमडामळ-दवर्ली पंचायत हातची गमवावी लागली होती. मात्र आता दबक्‍या आवाजात का होईना, पण या भागातील मतदार ‘हमारा वोट बीजेपीकोच’ असे म्‍हणताना दिसत होते. ‘माझे घर’चे हे गाजर खरेच भाजपला फायद्याचे ठरेल का? ∙∙∙

विरोधकांचा आनंद टिकणार?

निवडणुकांत मतदानाची टक्‍केवारी वाढते तेव्‍हा सत्ताधाऱ्यांना ‘टेन्‍शन’ आणि विरोधकांना ‘आशा’ असते. सत्ताधाऱ्यांबाबतच्‍या निराशेतून जनता बाहेर पडते, आपला मतदानाचा अधिकार बजावते आणि विरोधकांना भरभरून मते देते, असा एक समज असतो. जिल्‍हा पंचायत निवडणुकीत मतांची टक्‍केवारी मोठ्या प्रमाणात वाढल्‍याने काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप तसेच रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍सच्‍या (आरजीपी) गोटांत काहीसा आनंद पसरला आहे. आता त्‍यांचा आनंद सोमवारी टिकणार की मतदान वाढीचे गणित बदलून भाजपच सत्ता मिळवणार? याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. ∙∙∙

युरीसाठी संजय तारक ठरणार की मारक?

राजकारणातील काही निर्णय हे बुमरॅँग ठरू शकतात. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी काँग्रेस पक्षात गद्दारांना स्थान नसल्याचा दावा केला होता. काँग्रेस पक्षाचे खासदार कॅप्टन विरयातो यांनी ही पेराशूट वरून आलेल्यांना काँग्रेसमध्ये स्थान असता कामा नये असे ठासून सांगितले होते.मात्र विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत दहा दिवस असताना भाजपाचे संजय वेळीप यांना पक्षात प्रवेश देऊन गिरदोली मतदार संघात झेडपी ची उमेदवारीं ही दिली. आता सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत संजय जिंकला तरी युरी हरणार आणि संजय हरला, तर ते मात्र युरी साठी मारक ठरणार हे निश्चित. ∙∙∙

‘ओब्रीगाद’वर मेहरनजर का?

खोल येथे काब द राम समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्‍या जैव संवेदनशील अशा टेकडीचा विध्‍वंस करुन केप गोवा हे रिसॉर्ट उबारल्‍याचा दावा करून प्रशासनाने या रिसॉर्टला सील ठोकले. याच केप गोवाच्‍या बाजूला ओब्रीगाद नावाचे रिसॉर्ट आहे आणि या रिसॉर्टनेही अशाच प्रकारे निसर्गाची हानी करत आणि टेकडीची कत्तल करत आपले रिसॉर्ट उभारले आहे. मात्र अजूनही या रिसॉर्टवर कुणी कारवाई केलेली नाही. उलट केप गोवानंतर या भागातील इतर रिसॉर्टवर जी कारवाई होणे अपेक्षित होती, तिही थंडावली आहे, असे म्‍हणतात, या ओब्रीगादच्‍यामागे एक दिल्‍लीचा बडा भाजप नेता खंबीरपणे उभा आहे. यामागे न्‍यू इयर धंद्याचे गणित असल्‍याचे सांगितले जाते. आता हे रिसॉर्ट सील केल्‍यास न्‍यू इयरचा धंदा बुडणार हे नक्‍की. सध्‍या जी कारवाई थंडावली आहे ते पाहिल्‍यास, या आरोपात तथ्‍य आहे, असे कुणाला वाटल्‍यास त्‍यास त्‍याची चूक करावी का? ∙∙∙

कारवाईचा रोख कळंगुटकडेच...

‘बर्च बाय रोमिओ लेन’ला आग लागल्यानंतर सुरू झालेल्या घडामोडींनी अनेकांची झोप उडवली आहे. आगीच्या घटनेनंतर या क्लबचे मालक थेट देशाबाहेर पसार झाले. मात्र नंतर ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढून त्यांना थायलंडमधून ताब्यात घेऊन गोव्यात आणले. आता या प्रकरणातील पुढचा धक्का म्हणजे संबंधित जमिनीचा मालकही देशाबाहेर वास्तव्यास आहे. त्यामुळे त्यालाही इंटरपोलमार्फत नोटीस बजावून गोव्यात आणण्याची प्रक्रिया गोवा पोलिसांनी सुरू केली आहे. सरकार या संपूर्ण प्रकरणात कमालीची गंभीरता दाखवत असून, कारवाईही वेगाने सुरू आहे. मात्र याचवेळी एक वेगळी चर्चाही रंगू लागली आहे. कारवाईचा रोख केवळ कळंगुट परिसराकडेच का वळतोय, असा प्रश्न सामान्य लोक विचारू लागले आहेत. बेकायदेशीर आस्थापने फक्त याच भागात आहेत का, की इतर ठिकाणी डोळेझाक केली जाते, अशी शंका आता उघडपणे व्यक्त होत आहे. ∙∙∙

चर्चा पोलिस ठाण्याची...

गुन्हेगारी नियंत्रण आणि तपासणीसह इतर विविध निकषांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल, केंद्रीय गृह मंत्रालयाने अलीकडेच, डिचोली पोलिस ठाण्याला २०२५ सालासाठी भारतातील पाचवे सर्वोत्तम पोलिस ठाणे म्हणून मान्यता दिली. असे असले तरी, गोवा पोलिस स्थापना दिन २०२५ निमित्त सर्वोत्तम एकूण तीन पोलिस ठाण्यांची नावे जाहीर करण्यात आली. पण यात डिचोली पोलिस स्थानकाला साधे तिसरे पारितोषिक पण नाही. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला. दुसरीकडे, दोनापावला येथे एका प्रतिष्ठित घराण्याच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला अन् पोलिसांना अद्याप मुख्य दरोडेखोर सापडलेले नाहीत. तरीही पणजी पोलिस स्थानकाला गोवा पोलिस स्थापना दिन २०२५ निमित्त तिसरे सर्वोत्तम पोलिस ठाणे म्हणून पारितोषिकचा मान मिळाला! त्यामुळे बऱ्याच पोलिस स्थानकांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. काहींना यात पक्षपातीपणा वाटत आहे..! ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: मतदान वाढले, सत्ता कुणाची? भाजपला फायदा की विरोधकांना संधी? राजकीय वर्तुळात जोरदार खलबते

पोलिस स्थानकाला तिसरे स्थान!

एखाद्या राजधानीतील पोलिस स्थानक म्हटल्यावर सुसज्ज इमारत डोळ्यासमोर उभी राहते. जशी चित्रपटांमध्ये पोलिस स्थानकाची इमारत दाखविली जाते, तशी इमारत, असावी असे वाटणे साहजिकच आहे. पणजी पोलिस स्थानक हे राजधानी आणि तेही पर्यटन राज्याचे, त्यामुळे ते कसे असावे, अशी केवळ कल्पनाच. कारण पोर्तुगीजकालीन इमारतीत असलेल्या या पोलिस स्थानकाला तिसरे स्थान मिळावे, हाच मोठा विनोद मानावा लागेल. पोलिस खात्यातर्फे गोवा पोलिस स्थापना दिनाच्यानिमित्ताने तीन पोलिस स्थानकांना गौरविण्यात येते. त्यात यावर्षी कळंगुटला प्रथम, मायणा-कुडतरीच्या पोलिस स्थानकास तिसरे आणि पणजीला तिसरे स्थान मिळाले. या बक्षीसावरूनच स्थानकांच्या परिमाणाची आणि करण्यात येणाऱ्या गुणांकनाची कल्पना येते. विशेषबाब म्हणजे पोलिस खातेही तीन पुरस्कारांना बक्षिसाची रक्कम प्रथम क्रमांकास ३०, द्वितीय २० आणि तृतीय स्थानासाठी १० हजारांचे रोख बक्षीस देते, किमान बक्षिसाची रक्कम तरी साजेशी आणि लाखात तरी असावी तरच त्या स्थानकाचा बहुमान केल्यासारखे वाटेल, असे पोलिसच चर्चा करतात म्हणून बरे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

गोवा शिक्षक पात्रता चाचणीत गोंधळ?

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी देशात सुरू झाली आहे. देशातील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.गोव्यात हल्लीच ही चाचणी परीक्षा गोवा शालान्त मंडळाने घेतली होती.या परीक्षेचा निकालही लागला आहे.चाचणीत नव्वद गुण घेणे बंधन कारक होते. मात्र अनेक नवीन व अनुभवी शिक्षक या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. आता शिक्षक या परीक्षेलाच दोष द्यायला लागले आहेत.या परीक्षेच्या कोकणी विषयात चुकीची उत्तरे व चुकीचे प्रश्न विचारले होते असा दावा शिक्षकांनी केला आहे.या गोंधळामुळे सर्वांनाच सरसकट दहा अतिरिक्त गुण दिले होते असा दावा शिक्षक करतात.आता या गोंधळाला शालान्त मंडळ जबाबदार की प्रश्न पत्रिका काढणारे शिक्षक? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com