Digambar Kamat Political Career: सातवेळा मडगावातून विजयी, 2007 ते 2012 काळात मुख्यमंत्रिपदी; दिगंबर कामत यांची चढ-उताराची वाटचाल

Digambar Kamat Political Career: मागची ३० वर्षे गोव्‍यातील राजकीय क्षेत्रात आमदार म्‍हणून कार्यरत असलेले दिगंबर कामत यांची राजकीय कारकिर्द तशी चढ-उताराचीच म्‍हणावी लागेल.
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

Digambar Kamat Political Career

मडगाव: मागची ३० वर्षे गोव्‍यातील राजकीय क्षेत्रात आमदार म्‍हणून कार्यरत असलेले दिगंबर कामत यांची राजकीय कारकिर्द तशी चढ-उताराचीच म्‍हणावी लागेल. या कालावधीत त्‍यांनी सातवेळा मडगावातून निवडणूक जिंकली. मात्र, त्‍यांचा राजकीय प्रवास हा तळ्‍यात-मळ्‍यात याच प्रकारचा होता.

सुरुवातीला काँग्रेस पॅनलचे उमेदवार म्‍हणून त्‍यांनी १९८७ साली मडगावातून निवडणूक लढविली. तत्‍कालीन मंत्री बाबू नायक यांचे समर्थन असलेल्‍या पॅनलमधून ते आके प्रभागातून नगरसेवक म्‍हणून जिंकून आले. मात्र, त्‍यानंतर अवघ्‍या दाेन वर्षांतच त्‍यांनी बाबू नायक यांच्‍या विरोधात मडगावातून निवडणूक लढविली.

मात्र, त्‍यावेळी त्‍यांना पराभव स्‍वीकारावा लागला. त्‍यावेळी कामत यांना तत्‍कालीन मुख्‍यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे समर्थक म्‍हणून ओळखले जायचे. मात्र, अवघ्‍या एक वर्षाच्‍या कालावधीत म्‍हणजे १९९० साली चर्चिल आलेमाव आणि काँग्रेसच्‍या अन्‍य आमदारांनी राणे यांच्‍याविरोधात बंड करून त्‍यांचे सरकार पाडले. त्‍या बंडाला दिगंबर कामत यांचाही त्‍यावेळी पाठिंबा होता.

Digambar Kamat
Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

१९९४ मध्‍ये कामत यांनी काँग्रेस पक्षाचा त्‍याग करून मडगावातून भाजपच्‍या उमेदवारीवर निवडणूक लढविली आणि ते पहिल्‍यांदा आमदार झाले. त्‍यानंतर त्‍यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नंतर फ्रान्‍सिस सार्दिन यांच्‍याबरोबर स्‍थापन केलेल्‍या सरकारात कामत यांना वीज आणि कला व संस्‍कृती खाते देण्‍यात आले. मनोहर पर्रीकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपचे मंत्रिमंडळ स्‍थापन झाल्‍यानंतर कामत हे त्‍या मंत्रिमंडळातले क्रमांक २ चे मंत्री होते.

मात्र, २००५ साली त्‍यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केल्‍याने पर्रीकर सरकार डळमळले. २००७ साली दिगंबर कामत यांनी काँग्रेस पक्षातील एक जबरदस्‍त नेेते म्‍हणून आपले स्‍थान भक्‍कम करताना सोनिया गांधी यांचा विश्‍वास संपादन करीत स्‍वत:च्‍या गळ्‍यात मुख्‍यमंत्रिपदाची माळ घालून घेतली. त्‍या काळात कुठल्‍याही मुख्‍यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नव्‍हता. मात्र, कामत यांनी तो पूर्ण केला.

२०१२ मध्‍ये त्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली काँग्रेसला गोव्‍यात पराभव स्‍वीकारावा लागल्‍यानंतर काँग्रेस पक्षातील त्‍यांचे स्‍थान काही प्रमाणात कमी महत्त्वाचे बनले. २०२२ पर्यंत ते काँग्रेसचे आमदार होते; पण पक्षात आपल्‍याला कुणी मान देत नाहीत, असे जाणवल्‍याने त्‍यांनी शेवटी काँग्रेसचा त्‍याग करून पुन्‍हा भाजपात प्रवेश केला. त्‍यावेळी त्‍यांनी मंत्रिपद मिळणार अशी त्‍यांच्‍या कार्यकर्त्यांना आशाहोती. मात्र, भाजपनेही त्‍यांना तीन वर्षे झुलवत ठेवले.

Digambar Kamat
Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात! काणकोण येथील 'क्रीडा आंगण' सभागृहाचं सचिनच्या हस्ते होणार उद्घाटन

दिगंबर कामत यांची ठळक कारकीर्द

जन्‍म : ८ मार्च १९५४. सुरुवातीला मराठी प्राथमिक शिक्षण, नंतर इंग्रजीतून माध्‍यमिक शिक्षण नंतर चौगुले महाविद्यालयातून बीएससीची पदवी. विद्यार्थी असताना एक चांगले फुटबॉलपटू आणि बॅडमिंटनपटू म्‍हणून त्‍यांनी नाव कमविले होते. एक उत्‍कृष्‍ट क्रीडा आयोजक म्‍हणून त्‍यांना ‘जीवबादादा केरकर’ पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यातही आले होते.

१९८७ साली मडगावचे नगरसेवक म्‍हणून निवडून आले. त्‍यावेळी कामत यांना बाबू नायक गटाचे नगरसेवक म्‍हणून ओळखले जायचे. मात्र, १९८९ साली बाबू नायक यांच्‍याविरोधात काँग्रेसचे उमेदवार म्‍हणून मडगावातून निवडणूक लढविली. मात्र, त्‍या पहिल्‍या निवडणुकीत त्‍यांचा पराभव झाला.

१९९४ साली काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश. मडगावातून भाजपचे उमेदवार म्‍हणून निवडून आले. २००५ पर्यंत ते भाजपात होते. या कालावधीत तीनवेळा ते भाजपचे उमेदवार म्‍हणून मडगावातून जिंकून आले.

२००५ मध्‍ये भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश. काँग्रेसच्‍या उमेदवारीवर मडगावातून पोटनिवडणूक जिंकली.

२००७ मध्‍ये काँग्रेसच्‍या उमेदवारीवर पुन्‍हा मडगावातून विजय. गोव्‍याचे मुख्‍यमंत्री म्‍हणून पदभार स्‍वीकारला. त्‍यानंतर चारवेळा ते काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडणूक जिंकली.

१४ सप्‍टेंबर २०२२ रोजी काँग्रेस पक्षाचा त्‍याग करून पुन्‍हा भाजपात प्रवेश. मंत्रिपद मिळणार अशी अपेक्षा असतानाही तीन वर्षे झुलवत ठेवले.

२० ऑगस्‍ट २०२५ राेजी मंत्रिपद देणार असे मुख्‍यमंत्र्यांकडून संकेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com