

धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा ग्रामपंचायत क्षेत्रातील आगलोट येथील रगाडो नदीच्या उजव्या काठावरच्या मुर्गेच्या जंगलात २ मे रोजी वाघाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडला. अत्यंत कुजलेल्या स्थितीतला, एक महिन्या अगोदरचा हा मृतदेह या खाणग्रस्त गावात सापडल्याने एकच खळबळ उडाली. महावीर अभयारण्यापासून ५०० मीटर आणि सरकारी मालकीच्या वनक्षेत्रापासून २५० मीटर अंतरावर मुर्गेतले हे सर्वे क्रमांक ५२मधील केशव भट गाळकर यांच्या खाजगी जंगलात या मृत वाघाच्या देहाचे तुकडे तीन ठिकाणी विखुरलेले आढळले.
या मृतदेहातून वाघाचे यकृत आणि पोटाचा नमुना उपलब्ध नसल्याने, विषविज्ञान चाचणी करता आली नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला असे सांगणे कठीण आहे. ३ मे रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अधिकृत प्रतिनिधीच्या आणि सरकारी पशुवैद्यकांच्या उपस्थितीत मोले येथील वन खात्याच्या निसर्ग परिचय केंद्रात या वाघाच्या पार्थिवाची शवचिकित्सा करण्यात आली.
त्यानुसार सदर मृत वाघाचे कलेवर एक महिन्यापूर्वीचे असून, ते अत्यंत कुजलेल्या स्थितीतले आणि कोल्हे,रान कुत्र्यांसारख्या प्राण्यांनी लचके तोडल्याने त्याच्या मृत्यूचे निश्चित निदान करणे या स्तरावरती कठीण झालेले आहे. वाघाच्या कवटीचा भाग, त्याची हाडे, पंजांची नखं, दात, कातडी आणि कातडीवरचे केस आदी अवशेष वन खात्याने शोध मोहीम घेतल्यावर गोळा करणे शक्य झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार हे सारे अवशेष पुढील चिकित्सेसाठी सीलबंद करून ठेवलेले आहेत. न्यायवैद्यक चिकित्सेसाठी हे अवशेष डेहराडून येथील वन संशोधन संस्थेला पाठवले जाणार आहेत. त्यामुळे, तेथील अहवालाच्या प्राप्तीनंतर वाघाच्या मृत्यूची कारणमीमांसा करणे शक्य होईल.
गोव्यात पूर्वापार पट्टेरी वाघाचे अस्तित्व गोमंतकीय लोकमानसाने मानलेले असल्याने, त्यांना लोकदैवतांच्या रूपात पुजण्याची परंपरा पेडणे ते काणकोणपर्यंत पाहायला मिळते. वाघाच्या नावाने सुरक्षित ठेवलेल्या जंगलाचे अस्तित्व सांग्यातल्या काले गावात व्याघ्रेगाळ, काणकोण श्रीस्थळ येथील वाघाच्या नावाने राखून ठेवलेल्या नैसर्गिक गुंफेतून म्हणजे ‘वागऱ्या हन्न’द्वारे अनुभवायला मिळते. धारबांदोडा तालुक्यात गोव्यातले सर्वाधिक जंगल क्षेत्र महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून संरक्षित असले तरी गोवा मुक्तीपासून इथे लोह, मँगनीज खनिजांच्या उत्खनन, वाहतूक आणि निर्यातीचा व्यवसाय आणि चिरे, खडी आणि रेती उत्खनन फोफावल्याने वन्यजिवांचा नैसर्गिक अधिवास संकटग्रस्त झाला.
दूधसागर धबधबा आणि खोऱ्यात पदभ्रमण, गिर्यारोहण आणि जीप सफारीद्वारे पर्यावरणीय पर्यटनाच्या उपक्रमांत त्याचप्रमाणे काजू, अननस आणि अन्य बागायती पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रांत विलक्षण वाढ झाल्याने वन्यजीव आणि स्थानिक लोक यांच्यातला संघर्षही टोकाला गेलेला गावोगावी दृष्टीस पडत आहे. बोळकर्णे द आगलोट या लोह खनिज खाणीत आरंभलेल्या आततायी उत्खननामुळे आगलोट आणि सत्तरीतल्या मलपण येथील सधन जंगल क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात र्हास करण्यात आला.
कायदेशीररीत्या या खाणीवरती कालांतराने बंदी घालण्यात आली. तरीदेखील इथे प्रचलित पर्यावरण आणि वन संरक्षण कायदे कानून यांची पायमल्ली करून जे खनिज उत्खनन चालले होते, त्याचे पडसाद न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगाच्या अहवालात उमटलेले दिसतात. त्यानंतर गेली दोन दशके बेकायदेशीररीत्या रगाडो नदीपात्रात रेतीचा जो उपसा चालला होता, त्याची दखल स्वेच्छा याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेऊनदेखील आज रगाडो नदीचे पात्र आणि नैसर्गिक प्रवाह संकटग्रस्त आहे.
त्यात भर म्हणून की, काय सरकारी मालकीच्या वनक्षेत्रातील सर्वे क्रमांक ११४/१ मध्ये बिनदिक्कतपणे चिऱ्यांची खाण कार्यान्वित आहे. त्यात भर म्हणून की काय तृणहारी जंगली श्वापदांची शिकार वन खात्याच्या अस्तित्वाला वाकुल्या दाखवत मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे कॅमेरा ट्रॅपद्वारे इथे पट्टेरी वाघीण आणि बछड्यांचे वास्तव्य असल्याचे सिद्ध झालेले असताना, त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वन्यजीव विभागाने गेल्या दोन वर्षांपासून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, असेच म्हणावे लागते.
शिकार प्रतिबंधनात्मक कृतिदल , वन्यजीव निरीक्षण मनोरे आणि दैनंदिन गस्त घालण्याच्या आपल्या जबाबदारीकडे वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांना परावृत्त करण्यासाठी वरिष्ठांनी षड्यंत्र राबवलेले आहे आणि त्यामुळे वन्यजिवांचा नैसर्गिक अधिवास गेल्या दोन वर्षांपासून संकटांच्या खाईत लोटलेला आहे. त्यामुळे आगलोट येथील मुर्गेच्या खाजगी जंगलात पट्टेरी वाघाचा मृत्यू होऊन एक महिना उलटलेला असताना कुळे वनक्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना ही घटना दृष्टीस पडली नाही.
यापूर्वी २००९साली वाघाचा मृत्यू तृणहारी प्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात सापडून केरी सत्तरी येथील वाडयेर येथे उद्भवलेला असताना, त्याची खबर वन खात्याला महिनाभर लागली नव्हती. या संदर्भात तत्कालीन वन विभागाचे प्रमुख डॉ. शशिकुमार आणि उपवनपाल देवेंद्र दलाई यांना माहिती दिल्यावर व्याघ्र हत्येची चौकशी सुरू झाली. २०१९-२०२०साली एक वाघीण, एक निम्न प्रौढ वाघ आणि दोन बछडे यांची जहाल विष घालून हत्या केलेली असताना, त्यासंदर्भात रीतसर माहिती उप वनपाल कुलदीप शर्मा यांना दिल्यावरच चौकशीची सूत्रे हलली. २ मे २०२६ रोजी वाघाच्या मृत्यूची बातमी उपवनपाल जीस वार्केय यांना दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे. गोव्यातील वाघांच्या मृत्यूसंदर्भातल्या तिन्ही दुर्घटनांतून गोव्याच्या वन खात्याचा बेजबाबदारपणा अधोरेखित झाला आहे.
शवचिकित्सा अहवाल सादर करण्याअगोदर उपवनपाल जीस वार्केय यांनी मुर्गे येथील जंगलात सापळे, बंदुकीच्या गोळ्या आणि तत्सम पुरावे न आढळल्याने वाघाचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे जाहीर केले आहे. शिकारीद्वारे आणि विषप्रयोगाद्वारे वाघाचा मृत्यू झाल्याचे कोणतेच ठोस पुरावे आढळले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रदीर्घ काळ वाघाचे वास्तव्य या जंगलात असताना, त्या संदर्भात कोणतीच माहिती वन खात्याला नसणे आणि त्याचा मृत्यू मुर्गेच्या नवे ते बोळकर्णे मुख्य रस्त्यालगतच्या जंगलात होऊनही त्याची कोणतीच कल्पना नसणे, यातूनच खात्याच्या एकंदर भोंगळ कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. २००९ ते २०२६ या सतरा वर्षांच्या कालावधीत सहा वाघांचा मृत्यू होऊन, त्याची साधी कल्पना गोवा सरकारच्या वन खात्याला नसणे, ही गंभीर चिंतेची बाब आहे.
भारतीय वन सेवेत प्रवेश करताना प्रत्येक अधिकारी आपण वन्यजीव, जंगल आणि पर्यावरणीय परिसंस्थेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेत असतो, परंतु कर्तव्याला तिलांजली देऊन काहीजण सत्ताधाऱ्यांचे हित रक्षण करून, आपले पद राखत पैसा, खोटी प्रतिष्ठा कमवण्यात धन्यता मानतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.