

फोंडा: गोव्यातील दूध व्यवसाय वाढीसाठी सुधारित कामधेनू योजना गुरूवारपासून सुरू करण्यात येत असून दूध व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांना वीस गाई खरेदी करण्यासाठी अनुदान जाहीर करण्यात येत आहे. त्यात पहिल्या दहा गाई खरेदीसाठी ९० टक्के तर उर्वरित दहा गाई खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान सरकारकडून दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज गुरुवारी गोवा डेअरीच्या दूध व्यावसायिकांना वाढीव दूध दर फरकाचे वितरण करताना मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, गोवा डेअरी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर, पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नीतिन नाईक, सहकार निबंधक आशुतोष आपटे आदी मान्यवर उपस्थित होता.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की राज्यात सध्या ६० हजार लिटरपर्यंत दुधाची निर्मिती होते, ती वाढवून दीड लाखापर्यंत नेली तरी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीवरून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. सरकार डेअरी व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करते त्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा हीच आमची इच्छा आहे.
डेअरी व्यवसायातल्यांना एक दिवसाची सुटी घेता येत नाही, म्हणून प्रामाणिकपणे या व्यवसायात काम करणाऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध आहे. माणसांप्रमाणे गुरांनाही २४ तास आरोग्य सेवा मिळावी यासाठी मोबाईल आरोग्य सुविधा देण्यास सरकार प्रयत्नशील असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. डेअरी, मत्स्यव्यवसायासाठी सुटसुटीत योजना सरकार राबवत आहे, त्याचा लाभ घ्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वागत डॉ. नीतिन नाईक यांनी केले. सूत्रसंचालन नीतिन कोलवेकर यांनी तर डॉ. रामा परब यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमंतकीय उद्योग व्यवसाय शाबूत रहावेत त्यांची वाढ व्हावी यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. दूध उत्पादक आणि मत्स्य व्यावसायिकांना लाखो रुपयांचे अनुदान सरकार देते त्याचा योग्य वापर करा आणि व्यवसाय वाढवा. २०३७ पर्यंत विकसित गोव्याचे स्वप्न सर्वजण साकारूया.
दूध उत्पादकांना व्यवसाय वृद्धीसाठी सरकारकडून भरीव अनुदान देण्यात येते त्याचा योग्य लाभ घ्या असे सांगताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याच्या विकासासाठी कार्यरत आहेत. माझे घर योजना ही अशीच एक चांगली योजना असून तिचा लाभ घ्या.
सुभाष शिरोडकर,सहकारमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.