

गोव्यात दूरदर्शन केंद्र आले नव्हते, तेव्हा मुंबई केंद्राचे कृष्ण-धवल कार्यक्रम पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आत्यंतिक सुंदर कार्यक्रम असत. कलाकार कसलेले मुरलेले. स्मिता पाटील, भक्ती पाटील, स्मिता तळवलकर, प्रा. भावे व अन्य वृत्तनिवेदकांनी आपली छाप कोरली. आल्तिनोवर लहान क्षमतेचं केंद्र सुरू झालं. सुरवातीला साधारणसं प्रसारण असायचं. कोंकणीतून बातमीपत्र सुरू झालं. भाषा, कंटेन्ट, निवेदन सर्व मानदंडांसहीत त्याचा दर्जा खालावत गेलाय. वार्तांकन सर्वसमावेशक असत नाही. गोव्याच्या बातम्या कमी. वाहनं, फोटोग्राफर, ड्रायव्हर यांचा अभाव या सबबी चालू. एक एक कर्मचारी निवृत्त होतोय. नवीन भरती प्रक्रिया नाही. कंत्राटी, नैमित्तिक (कॅज्युअल) निवेदक यांच्या भरवशांवर दर्जा टिकू शकतो का? एकंदर स्थिती रोडावलेली आजारी. आता निर्मिती, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही ‘कॅज्युअल’ असणार नाही ना, अशी शंका लोकांना वाटत आहे. ∙∙∙
पालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षणासंदर्भात सध्या सत्तेवर असलेले भाजप सरकार काहीच स्पष्ट करत नसल्याने भाजप या निवडणुकीतही रडीचा डाव खेळू पहात आहे, असा आरोप काल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपने फोंडा पोट निवडणुकीच्यावेळीही असाच रडीचा डाव खेळला होता. असे रडीचे डाव खेळल्याशिवाय भाजपला निवडणुका जिंकता येत नाहीतस असा आरोपही त्यांनी केला. हिंदीत एक म्हण आहे, ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’. सध्या अशी लाठी भाजपच्या हाती आहे. राजकारणात आजपर्यंत हाच मंत्र चालत आला आहे, हे एवढी वर्षे राजकारणात मुरलेल्या विजय सरदेसाई यांना माहीत नाही का? ∙∙∙
गोवा विद्यापीठात सध्या खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे प्राध्यापक होण्याची व त्यांच्यावर अजिबात कारवाई केली जात नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातील एका प्राध्यापकाला काढून टाकण्यात आले होते. त्याविरुद्ध बोलण्याची हिंमत न खात्यास झाली, ना मंत्र्यांना झाली. आता एक महिला प्राध्यापक खोटे निवासी प्रमाणपत्र जोडून, नोकरी मिळवून शिकवत आहे. अन्य एक उच्चपदस्थ बीएचे खोटे प्रमाणपत्र मिळवून रुबाब झाडत आहे. यांच्यावर कारवाई होत नाही, लुंगीला नमस्कार करणे त्यांना बहुधा जमत असावे. तसे न करणारे बहुजन कामगार, ज्यांच्या सर्व पिढ्या गोव्यातच जन्मल्या व खपल्या त्यांचे वंशज काढून टाकले जातात. गोवेकर फक्त लोकप्रतिनिधी निवडून देण्यापुरतेच उरले आहेत. ‘या टोपीखाली दडलेय काय?’ याच धर्तीवर आता ‘या लुंगीखाली दडलेय काय?’, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ∙∙∙
वेळ्ळी मतदारसंघ हा प्रामुख्याने काँग्रेसधार्जिणा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत केवळ दोन अपवाद वगळता बाकीच्या निवडणुकामध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचाच मतदार निवडून आला आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत वेळ्ळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर मोठ्या प्रमाणावर रिंगणात उतरल्याने ‘आप’चे क्रूझ सिल्वा यांचे नशीब उजळले आणि ते आमदार झाले. मात्र यावेळी तशी स्थिती राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणूक ताेंडावर आल्यावर क्रूझ काँग्रेस पक्षात सामील होणार, अशी अटकळ व्यक्त केली जातेय. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे वेळ्ळीचे उमेदवार असलेले सावियो डिसिल्वा यांना दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यामागे हेच कारण तर नाही ना, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्ते विचारू लागले आहेत. ∙∙∙
पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर हे राजकारणात तसे नवे. जाहीर वक्तव्य करताना त्याची तपासणी आधी मनात करायला हवी, हे कोणीतरी त्यांना सांगायला हवे. माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर तोंडसुख घेताना त्यांनी बाबू यांनी गैरव्यवहार केले, हॉटेल्स उभारली असा आरोप केला आहे. बाबू हे भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे आर्लेकर यांनी भाजप सरकारमध्ये गैरव्यवहार चालत होता, असे आता कबूल केल्यासारखेच आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आता या प्रकरणी समज देण्यासाठी बोलावणे धाडणार का, याकडे पेडण्यातील निष्ठावंतांचे डोळे लागले आहेत. ∙∙∙
म्हापसा बाजारपेठेत अलिकडेच चोरट्यांनी पाच दुकानांना लक्ष्य केले होते, आणि त्यानंतर आता कुठे प्रशासनाला जाग आली. सोमवारी सायंकाळी उशिरा स्थानिक आमदारांनी लवाजम्यासह बाजारपेठेत फेरफटका मारला. त्यांच्यासोबत पालिका प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची फौज पाहून जणू काही मोठी शोध मोहीमच सुरू आहे, असा भास होत होता! पाहणी दरम्यान, रस्त्याच्या मधोमध आपले ‘साम्राज्य’ थाटून बसलेले फेरीवाले साहेबांना दिसले. हे चित्र म्हापसेकरांसाठी किंवा तिथे ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नाही. तरीही, साहेबांनी मोठा आव आणत फर्मान सोडले की, अडथळे निर्माण करणाऱ्यांची अजिबात गय करू नका! आता प्रश्न असा पडतो की, जेव्हा हे फेरीवाले रस्त्यावर ठाण मांडून बसतात, तेव्हा हे पालिका कर्मचारी काय हिमालयात तपश्चर्या करायला गेलेले असतात? की ‘वरदहस्ताच्या’उबदार सावलीत त्यांना हे अडथळे दिसतच नाहीत? हा सगळा प्रकार म्हणजे, ‘मांजर डोळे मिटून दूध पितेय’, असा आहे. स्वतःला वाटते की कोणाला काही दिसत नाही, पण म्हापसेकरांना सर्व काही स्पष्ट दिसतेय. मुळात हा शिस्तीचा ‘डोस’ जर खरोखर कडू असता, तर वर्षभरापासून सुरू असलेला हा बेशिस्तपणा कधीच बदलला असता! ∙∙∙
राजकारण्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात, असे म्हणतात ते खरे. मुख्यमंत्री व सरकारवर प्रखर टीका करणारे विरोधी पक्ष नेते यांचे राजकीय संबंध तिखट असले तरी युरी व विरोधी आमदार एल्टन यांच्यावर मुख्यमंत्री फिदा असल्याचे युरी व एल्टन समर्थक सांगतात. युरी आलेमाव यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधींच्या विकास कामांना चालना दिली आहे. युरी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या कुंकळ्ळी मतदारसंघात इस्पितळ, फुटसाल मैदान, पंचायत घरे, भूमिगत वीज वाहिन्या, ट्रॉमा सेंटर अशा अनेक विकासकामांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने युरी समर्थक खुश आहेत. शिवाय एल्टन यांच्या केपेत व युरीच्या कुंकळ्ळीत सर्व रस्ते हॉटमिक्स केले आहेत. मुख्यमंत्री युरीवर फिदा झाल्याने भाजपात मात्र अनेकांना खुजली होऊ लागलीय, असे म्हणतात. काही का असेना मुख्यमंत्री युरीवर खुश आहेत, हे परम सत्य आहे. ∙∙∙
नवीनच प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अर्चित नाईक यांनी आझाद मैदानाजवळ मोठे आंदोलन करून बॅरिकेड्स ओलांडले होते. थेट सत्तेला धडक देणारा युवा काँग्रेसचा तो आक्रमक चेहरा.. अशी त्यांची ओळख बनली. आज मात्र जणू ‘सायलेंट मोड’वर गेला की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. तेव्हा आंदोलनाचा जोश असा होता की, दिल्ली स्टाईलची झलकच लोकांनी गोव्यात पाहिली. त्या वेळी अनेकांना वाटलं ‘बस्स! आता तर हा युवा काँग्रेस सत्तेविरोधातील प्रत्येक लढाईत पुढेच असणार!’ पण सध्याची परिस्थिती पाहता, तोच जोश कुठे हरवला, असा प्रश्न कार्यकर्त्यांपासून सर्वांना पडतोय. काहीजण मिश्किलपणे विचारताहेत, ‘त्या दिवशीचा जोश हा ‘लॉन्चिंग ऑफर’मधला होता का?’ ∙∙∙
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दामू नाईक यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. आता विधानसभा निवडणूक अवघ्या अकरा महिन्यांवर येऊन ठेपल्याने दामूंनी ही निवडणूक जिंकून भाजपला सलग चौथ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी स्थानिकांसोबतच परप्रांतीय मतदारांसोबचाही संपर्क वाढवला आहे. मंगळवारी त्यांनी मुरगावात जाऊन शीख समुदायाच्या ‘खालसा सजना दिवस’ कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याआधी फोंडा पोटनिवडणूक प्रचारातही परप्रांतीय मतदारांनाच लक्ष्य केलेले होते. त्यामुळे दामूंचे हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार? याकडे जनतेचे लक्ष लागून असेल. ∙∙∙
नवी लाट चालू राहिल्यावर समाजाला नित्य नूतन चकाकी येत राहते. ‘काराओके’ हे त्यातीलच एक फॅड. शोध जपानमध्ये १९७१ साली लागला. नंतर हे पिसे सगळीकडे फोफावत गेले. ‘काराओके’चा अर्थ रिक्त वाद्यवृंद. हे लोण गोव्यातही पोचले. रोप वाढत गेलं. अत्याधुनिक माईक आलेले आहेत. त्यालाच स्पीकर असतो, पेन ड्राईव्ह लावता येतो. वाद्यसंगीताची धून वाजते, गायक-गायिका गात जातात. या धामधुमीत कित्येक बेसूर राव, बेसूर ताई उपजल्या आहेत. कुणालाही लेखकराव व्हावंसं वाटतं, तशीच गायक बनायची ही असोशी. कुठल्या तरी कार्यक्रमाला वा रिसेप्शनला लोक जातात. अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा... किंवा इतर नकारात्मक गंभीर ‘काराओके’ गाणी माथी मारली जातात. आनंदाच्या क्षणी अर्थशून्य जीवनाचे हे बेसूर डोहाळे का? कुणीही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. आबाल वृध्द सगळेच ‘काराओके’ गाऊ लागले आहेत. फक्त श्रोत्यांचीच वानवा आहे. ∙∙∙
जेव्हा सत्तेचा माज चढतो तेंव्हा सत्ताधारी आपली कातडी वाचविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे आपल्याला माहीत असणारच. निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी गोव्यात शिस्त व व्यवस्था आणण्यासाठी सरकारला वठणीवर आणण्यासाठी ‘इनफ इज इनफ मिशन’ सुरू केले असून आम जनतेकडून या ‘मिशन’ला जनतेचा चांगला पाठिंबा लाभत आहे. ‘इनफ इज इनफ मिशन’ सुरू करण्यासाठी न्या. रिबेलो यांच्यासोबत एक बुजूर्ग सेनानी होते. ते आता या आंदोलनात दिसत नाहीत. याचे कारण असे सांगण्यात येते, की या ज्येष्ठ सेनानींच्या आस्थापनावर सरकारी खात्याने म्हणे धाडी घातल्या. पुन्हा ‘इनफ इज इनफ मिशन’ केल्यास धंदा बंद करू, असा इशारा म्हणे एका राजकीय नेत्याने दिल्याने हा बुजूर्ग कार्यकर्ता नको ती भानगड म्हणून अलिप्त राहत आहे. किती जणांची तोंडे बंद करणार आहात आपण, असे जनता त्या राजकारण्यांना विचारतेय. ∙∙∙
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडण्यात संपर्क कार्यालय सुरु केले आणि पेडण्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मडगावला पाठवले अन्यथा पेडण्यातील जनता अपक्ष म्हणून आपल्याला विधानसभेतच पाठवणार होती, असे सांगून बाबू यांनी अप्रत्यक्षपणे आताही आपण अपक्ष लढू शकतो, असे संकेत दिले आहेत. निवडून येण्याचा निकष हा उमेदवारीसाठी भाजप लावत असल्याने ‘व्होकल फॉर लोकल’चे राजन कोरगावकर यांच्या पाठोपाठ बाबू यांचाच विचार भाजप करेल, अशी पेडण्यात चर्चा आहे. ∙∙∙
साहेबांचा आपल्या खात्यावर वचक राहिला नसेल तर गोंधळ होणे स्वाभाविक. शिक्षण खात्यावर त्या खात्याच्या साहेबांचा वाचक आहे का? असा प्रश्न आता शिक्षण क्षेत्रात असलेल्या विद्वानांना पडला असणार. कुडचडे येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याच्या बातम्या एका स्थानिक वर्तमानपत्रात सातत्याने प्रकाशित होत आहेत. या बातमीत तथ्य आहे का? या बातम्या चुकीच्या माहितीवर आधारित आहेत का? या बातमीची दखल शिक्षण खाते का घेत नाही. जर या बातमीत तथ्य असेल तर? शिक्षण खात्याने अशा बातम्यांवर मौन बाळगणे योग्य आहे का? झिंगडेसाहेब या गोंधळाचा सोक्षमोक्ष लावा ना एकदाचा! ∙∙∙
काँग्रेसचे एक खंदे समर्थक असलेल्या रतन आचार्य यांनी अधिकृत ‘एक्स’ वरुन मंगळवारी सध्या विधानसभा निवडणुका होत असलेल्या व वर्षभरात निवडणूक होणाऱ्या राज्यांच्या निकालांचे भाकीत वर्तवलेय. त्यात केरळ, आसाम, पुदुच्चेरी, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपुर, हिमाचल या राज्यांत काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, असे ठामपणे म्हटले आहे. आचार्यांनी केरळात के. सी. वेणूगोपाल, तर गोव्यात गिरीश चोडणकर मुख्यमंत्री होणार असेही स्पष्ट नमूद केले आहे. ही पोस्ट आज गोव्यात काँग्रेसवाल्यांनी (चोडणकर समर्थक) सर्वत्र व्हायरल केली. काँग्रेसचे सरकार येणार म्हणून व्हायरल करणाऱ्यांत गिरीश मुख्यमंत्री होणार म्हणून आनंदीत झालेले, युरी-पाटकरांचे मनसुबे धुळीला मिळाले म्हणून ‘हॅपी’ झालेले अनेकजण ती पोस्ट सर्वत्र पसरवत होते. त्यामुळेच त्या पोस्टला सुमारे सोळा हजार व्ह्यूज मिळाले..! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.