

फोंडा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार रितेश नाईक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रविवारी फोंड्यात पोहोचले. फोंड्यात राहणाऱ्या गुजराती आणि राजस्थानी नागरिकांच्या कोपरा बैठका घेत, त्यांनी रितेश नाईक यांना बहुमताने निवडून आणण्याचेही आवाहन केले. यातून मुख्यमंत्र्यांनी अधिक भर परप्रांतीय मतांवर दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते. पण, २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रवी नाईक यांच्याकडून अवघ्या ७७ मतांनी पराभव पत्करलेल्या केतन भाटीकर यांनी तेव्हापासूनच परप्रांतीय मतांकडे अधिक लक्ष केंद्रीत केलेले होते. त्यामुळे यावेळी ही मते नेमकी कुणाकडे जाणार? हे निकालानंतरच कळेल...∙∙∙
अमेरिका, इस्त्राईल, इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे साईड इफेक्ट जाणवणार नाहीत, अशी शक्यता बाळगून भारतीय गाफील होते. पण पेट्रोल, सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागल्यामुळे पुन्हा सामान्य जनता हवालदिल होऊ लागली आहे. पणजीसह विविध शहरांत सिलिंडरसाठा मुबलक आहे, शिवाय इंधनाचा ८ दिवस पुरेल इतका साठा आपल्याकडे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करूनही लोकांनी सिलिंडरसाठी अन् पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या. एकंदर काय तर ‘कोरोना’ काळात रांगा लावण्याची सवय करून घेतलेल्या जनतेला रांग नवी वाटत नाही, इतकंच! ∙∙∙
‘शोले’ या चित्रपटात वीरूची भूमिका धर्मेंद्रने आणि त्याचा जिगरी दोस्त जयची भूमिका अमिताभने रंगविली होती. पन्नास वर्षे झाली तरी वीरू जयच्या जोडीचा लोकांवर असलेला प्रभाव कायम आहे. त्यामुळे कोणाची ‘गहिरी दोस्ती’ दिसली की, लोक त्याना वीरू जय ची उपमा देतात. मध्यंतरी फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी व आता नगराध्यक्ष झालेले वीरेंद्र ढवळीकर यांना वीरू-जय म्हणून संबोधले जायचे. आता या फोंडा पोटनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसी तही वीरु-जयचा प्रवेश झाला आहे. आणि हे वीरू- जय दुसरे तिसरे कोणी नसून काँग्रेसचे या निवडणुकीचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर व गेल्या निवडणुकीत उमेदवार असलेले राजेश वेरेकर हे आहेत. काल-परवापर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारी ही जोडी आज इतकी एकरूप झाली आहे, की सगळीकडे त्यांचीच चर्चा ऐकू येत आहे. म्हणूनच ही जोडी फोंड्यात ‘हिट’ ठरत आहे. ∙∙∙
आरोग्य मंत्री विश्वजीत राणे सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहेत. राजकीय मैदानात आणि खेळाच्या मैदानातही त्यांनी आपला फॉर्म टिकवून ठेवला आहे. काम्पाल मैदानावर एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास विश्वजीत राणेंना आमंत्रित करण्यात आले होते. ते केवळ उद्घाटनापुरतेच राहिले नाही, तर प्रत्यक्ष क्रिकेटच्या पीचवर हातात बॅट घेऊन उतरले. जोरदार फटका मारत त्यांनी उपस्थित क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले एवढेच नव्हे तर ‘जो खेलेगा, वो खिलेगा’ असा संदेश देत त्यांनी सोशल मीडियाचे मैदानही गाजवले.विश्वजीतच्या या बॅटिंगची दिवसभर चर्चा होती. ∙∙∙
युनिटी मॉल, प्रशासकीय स्तंभाविरोधात चिंबल ग्रामस्थांचे झालेले आंदोलन, त्यानंतर ग्रामसभा घेण्यात झालेली दिरंगाई, अंदाजपत्रकातील खर्चाची केलेल्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश, त्याशिवाय मागील १५ तारखेला तीन तास लोकांच्या रोषाला दिलेले तोंड आणि रविवारी आयोजित ग्रामसभेत आक्रमक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत आपली बाजू मांडण्यात सरपंच संदेश शिरोडकरांनी जो संयम दाखवला तो खरोखरच दखलपात्र आहे. चिंबल ग्रामस्थांचे सव्वा महिन्यांवर चाललेले आंदोलन आणि त्यातून सतत सरपंच शिरोडकरांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरावरही ग्रामस्थांनी मोर्चा काढला, पण शिरोडकरांनी आपला सयंम ढळू दिला नाही. उलट पुन्हा ते लोकांसमोर आले, तेही ग्रामसभेच्या माध्यमातून. १५ मार्चला जी ग्रामसभा झाली, त्यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पण आता ग्रामसभा खुल्या जागेत घेतल्याने लोकांना राग असला तरी बोलण्यातून त्यांना आक्रमकता दाखवण्याशिवाय पर्याय नव्हता. ∙∙∙
पणजीच्या धर्तीवर फोंड्याला ‘स्मार्ट सिटी’ करायचे आहे त्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करून पक्षाचे उमेदवार रितेश नाईक यांना बहुमतांनी निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंड्यातील गुजराती व राजस्थानी समाजाच्या बैठकीत केले. पणजीवासीयांना पणजी शहराला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या काळात सोसावा लागलेला त्रास, धुळीचे साम्राज्य अन् तरीही शहर ‘स्मार्ट’ झाले का, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती पणजीवासीय पाहताहेत, अनुभवताहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानुसार सरकारला फोंडाही स्मार्ट बनवायचेय. बहुदा फोंडावासीयांनी पणजीवासीयांचा त्रास पाहिला नसावा, म्हणूनच त्यांना हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन भावेल नाही का? ∙∙∙
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर हे फोंडा पोटनिवडणुकीतील पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्याबरोबर दुचाकीवर मागे बसून प्रचार करताना दिसून आले. त्या प्रसंगाचे छायाचित्र व्हायरल झाले. प्रचाराचे काही दिवस उरले आहेत, त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. रविवारी अनेक मतदार घरी सापडतील, या उद्देशाने प्रत्येक उमेदवारांची धावपळ सुरू असणार आहे. त्यात भाटीकर यांनी प्रचारासाठी दुचाकीचा वापर केलेला असावा, असे छायाचित्रातून दिसते. जेणेकरून चालत फिरण्यापेक्षा दुचाकीवरून अधिक क्षेत्रात प्रचार होऊ शकतो, हा उद्देश त्यांचा असावा. छायाचित्रावरून भाटीकरांबरोबर दुचाकीवरून पाटकरही फिरलेले दिसतात. भाटीकर हे उच्च सुशिक्षित... त्यांना वाहन चालवण्याचे नियम निश्चित माहीत असणार आहेत. दुचाकीवरून फिरताना हेल्मेट गरजेचे आहे, पण त्यांनी ते का वापरले नाही (कदाचित उमेदवार वाहन चालवतोय, हे दिसावे असा उद्देश असेलही) याचे उत्तर त्यांनाच माहीत असेल. परंतु वाहतूक खात्याने हेल्मेट न वापरल्याबद्दल चलन पाठवू नये, म्हणजे मिळवली. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.