Goa Politics: खरी कुजबुज; ...लाखोंचा चुराडा

Khari Kujbuj: मडगाव नगरपालिकेच्या घाईगडबडीत तयार केलेल्या २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला अखेर कौन्सिलच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

...लाखोंचा चुराडा!

पणजीतील कदंब बसस्थानकावर मोठ्या थाटामाटात उभारलेली पाणपोई आज ‘नावालाच’ उरली आहे. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्‍घाटन झालेल्या या प्रकल्पाकडे आता मात्र कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे पाणी मिळत नाही, त्यातच परिसर अस्वच्छ आहे. मग एवढा गाजावाजा कशासाठी? असा सवाल प्रवाशी करीत आहेत. उद्‍घाटनावेळी फोटोसेशन आणि भाषणे झाली; पण नंतर देखभालीकडे दुर्लक्ष झाले. कदंब महामंडळाने या पाणपोईकडे दुर्लक्ष केले का? लाखो रुपये खर्च करून उभारलेली सुविधा अशीच वाऱ्यावर सोडणे योग्य आहे का? याबाबत आता नाराजी व्यक्त होत आहे. ∙∙∙

कॉपी पेस्ट अर्थसंकल्प!

मडगाव नगरपालिकेच्या घाईगडबडीत तयार केलेल्या २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला अखेर कौन्सिलच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र अर्थसंकल्प मंजूर करण्यास बोलावलेल्या बैठकीत मात्र नगरपालिकेची अकार्यक्षमता दिसून आली. हा अर्थसंकल्प म्हणजे कॉपी पेस्ट आहे, अशी टिका सुरू झाली आहे. सरकारचा १२ कोटी निधी जमा झालेला असताना ३४ कोटी जमा झाल्याचे दाखवणे, ही अक्षम्य चूक नाही का? असा प्रश्न लोक विचारत आहेत. गत सालच्या अर्थसंकल्पातील ८.५१ कोटी हा आकडा यंदाही दाखवणे, त्याचप्रमाणे अर्थसंकल्प २०२६-२७ सालचा असताना २०२५-२६ असे छापणे हा गलथानपणाचा कळस नाही का? स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा न करताच, तो बैठकीत सादर करणे, हे सुद्धा चुकीचेच आहे, असे स्वतः नगरसेवकच बोलत होते. पहिल्यांदाच नगरपालिकेचा अर्थसंकल्प चार्टर्ड अकाउंटंट मार्फत तयार करण्यात आला होता. आता चुकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात चूक कोणाची चार्टर्ड अकाउंटंटची की नगरपालिकेतील अकाउंट विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

म्हापशात ‘नवी पहाट’!

म्हापशात सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी लोक एकत्र येणे, म्हणजे मंगळावर पाणी सापडण्याइतकीच दुर्मीळ गोष्ट! मात्र अपवाद वगळता, इथल्या नागरिकांना ‘विरोधासाठी एकत्र येणे’ ही संकल्पनाच कदाचित शब्दकोशातून बाद झाल्यासारखी वाटत होती. पण नुकताच, रामनवमीच्या मुहूर्तावर चमत्कार घडला आणि ‘टुगेदर फॉर म्हापसा’ नावाच्या संघटनेचा श्री गणेशा झाला. मुळात सोशल मीडियावर ‘समविचारी’ लोकांनी एकत्र येऊन गप्पा मारणे सोपे; पण प्रत्यक्षात संघटना चालवणे कठीण. आता या नव्या संघटनेचे सदस्य खरोखरच ‘झोकून’ देऊन काम करणार की फोटो काढून गप्प बसणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. काही हितचिंतकांच्या मतानुसार, या संघटनेमुळे शहरात ‘नवी पहाट’ उजाडेल. आता ही पहाट क्रांती घेऊन येते की म्हापशात नेहमीप्रमाणे ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ पाहायला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेही, मतदारसंघात वारे तर बदलाचे वाहत आहेत, पण म्हापसेकरांना त्या वाऱ्याची अचूक दिशा समजते की पुन्हा ये रे माझ्या मागल्या, हे लवकरच स्पष्ट होईल. ∙∙∙

...विद्यार्थ्यांना गुण द्या!

शालेय परीक्षा संपल्या, निकाल लागला, नवीन वर्ष सुरू झाले. मात्र यंदा विद्यार्थ्यांना गुण न देता ग्रेड देण्यात आले आहेत. नवीन शिक्षण धोरणानुसार ते योग्यच आहे. पण विद्यार्थ्यांना व पालकांना कुठल्या विषयात किती गुण मिळाले, हे समजेल कसे? ३० ते ५० गुणपर्यंत ए ग्रेड दिली जाते. म्हणजे नेमके किती गुण मिळाले, ते कळेल कसे? कमी गुण मिळाले, तर आणखी प्रयत्न करायला हवा. क्रमांक वगैरे देऊ नका, पण विद्यार्थ्यांना गुण तरी सांगायला हवे? अशी चर्चा पालक व विद्यार्थी वर्गात सुरू आहे. शेवटी धोरणानुसार काम चालते, हे कोण सांगणार सूज्ञ पालकांना, त्यांनी समजून घ्यायला नको का? ∙∙∙

१ एप्रिलची घोषणा!

१ एप्रिलला कोणीही कसलीही घोषणा केली, तर लोक त्‍याच्‍याकडे एप्रिलफूल असल्‍याच्‍या शंकेनेच पाहतात. मागच्‍या वर्षी म्‍हणजे २०२५ साली मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी १ एप्रिलपासून आपण रोज मडगावात फिरून मडगावच्‍या कामात लक्ष घालणार आणि मडगाव नगरपालिकेकडून लोकांची कुठलीही कामे अडून राहू नयेच, हे पाहणार अशी घोषणा केली होती. त्‍यानंतर वर्षभराचा काळ निघून गेला. कामत यांच्‍या आश्‍वासनानंतरही लोकांचे पालिकेतील हेलपाटे काही संपलेले नाहीत. अशातच यंदाच्‍या १ एप्रिलपर्यंत पुन्‍हा एकदा एक विषय मडगाव पालिका चर्चेत आला, तो म्‍हणजे, तीन महिने शवागारात पडून राहिलेल्‍या मृतदेहांकडे दुर्लक्ष केल्‍याचा. हा केवळ योगायोग म्‍हणावा का? ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; विजयचे एका दगडात अनेक पक्षी

विनय तेंडुलकरांची ‘गणेश जयंती’

विनय तेंडुलकर हे भाजपचे एकनिष्ठ नेते. त्यांची खासियत म्हणजे त्यांचा हसतमुख चेहरा. बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराच्या गणेश जयंतीचे ते यजमान होते. हे यजमानपद आपल्याला लाभदायक ठरले असून तेव्हापासून वेगळी ऊर्जा प्राप्त झाली आहे, त्यामुळे चांगल्या घटना घडतात, असे ते जाहीरपणे सांगतात. त्यांना गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड म्हणजे ‘जीईएल’चे अध्यक्षपद मिळाले. त्याचप्रमाणे दिल्लीतही त्यांचे ‘वजन’ वाढताना दिसत आहे. आता त्यांचे लक्ष आहे, ते परत विधानसभेत प्रवेश करण्यावर. तशी त्यांनी तयारीही सुरू केली आहे आणि आपल्याला येथेही गणपती बाप्पा हात देईल, अशी खात्रीही आहे. आता ही खात्री प्रत्यक्षात उतरते की काय? हे मात्र बघावे लागेल. ‘घोडा मैदान तसे जवळच आहे, नाही का?’ ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; एका वाक्याने सरकार सावध?

कॅसिनो विरोध थंडावला!

दोन महिन्यापूर्वी मांडवीतील कॅसिनोविरोधात जो आवाज घुमत होता, तो आता थंडावला, अशी चर्चा आता पणजीत जोर पकडताना दिसत आहे. खरे तर नव्या कॅसिनोविरोधांत सुरुवातीला जो लोकक्षोभ दिसत होता, तो महापालिका निवडणुकीतही दिसला नाही. त्या मागील नेमके कारण काय? याची चर्चाही झाली नाही. पणजीत जागोजागी ज्या कॅसिनोच्या जाहिराती फडकत आहेत, त्यातून म्हणे महापालिकेला कोणतेच शुल्क मिळत नाही, मग या जाहिरातींवर कारवाई का होत नाही, दाभोळी असो वा मोपा विमानतळ, असो त्यांच्या मार्गावर सर्वत्र कॅसिनोच्याच जाहिराती दिसतात, त्यातून तरी सरकारला किती शुल्क मिळते? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com