

कोण कुणाला मतदान करतो?
फोंड्यातील निवडणूक वातावरण बरेच तापले आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न निवडणुकीत उतरलेल्या राजकीय पक्षांकडून केला जात आहे. त्यात कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचा महत्त्वाचा प्रयत्न होताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षातच खरी झुंज होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ‘आप’ही बऱ्यापैकी मते मिळवणार आहेच, पण ती कोणाची हा खरा प्रश्न आहे. एक म्हणजे काँग्रेसवाल्यांना वाटते ‘आप’ त्यांची मते फोडणार आहे, त्यामुळे काँग्रेसवाले सध्या धास्तावलेत, मात्र ऐनवेळेला कोण कुणाला मतदान करतो, त्यावर सगळे काही निर्भर आहे, शेवटी निवडणूक म्हणतात ना!
लिएंडरला गोव्याचा खासदार करा!
मागची कित्येक वर्षे ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये वावरणारा भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएंडर पेस याने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात प्रवेश केला आहे. लिएंडरचे वडील वेस पेस हे गोव्याचे, त्यामुळे गोव्याशी आपला संबंध आहे, असे लिएंडर नेहमीच म्हणत आला आहे. याचा संदर्भ घेत नेहमी राजकीय चिमटे काढणारे राजकीय विश्लेषक असलेले राधाराव ग्रासियस यांनी भाजपने लिएँडर पेस यांना गोव्याचा खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्त करावे, असा उपरोधिक सल्ला दिला आहे. सध्या भाजपात असलेले आलेक्स सिक्वेरा त्यासाठी प्रयत्न करू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. मध्यंतरी ममता दिदीने मागच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी गोव्याचा मुख्यमंत्री करण्याचे गाजर दाखवून लिएँडरला गोव्यात आणले होते. मात्र गोव्यात तृणमूलची डाळ शिजली नाही आणि लिऍंडरचीही. आता भाजपमध्ये जाऊन लिएंडर आपले राजकीय इस्पित साध्य करू पाहत तर नाही ना?
तवडकर यांची हुशारी
आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी आदिवासींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. विधानसभेच्या येत्या निवडणुकीत गावडा, कुणबी व वेळीप या आदिवासी समाजाला आरक्षण मिळाले नाही तर काय परिणाम होतील, याची जाणीव तवडकर यांना आहे. आदिवासींना विधानसभेत राजकीय आरक्षण मिळावे यासाठी सुरू झालेले आंदोलन सध्या सुप्तावस्थेत असले तरी आरक्षण मिळाले नाही, तर त्याचे वणव्यात रूपांतर होईल हे आदिवासी समाजाची नस माहीत असलेल्या तवडकर यांनी जाणले आहे. आदिवासी समाजातील नेते या मुद्यावरून राजकारण करणार हे ठरून गेलेले आहे. त्यामुळे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी तवडकर यांची ही धावाधाव असल्याची चर्चा आहे. ∙∙∙
पार्सेकर काय करतील?
‘इनाफ इज इनाफ’ या चळवळीतील जाहीर सभा ५ रोजी हरमल येथे होणार आहे. हरमल हा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा गाव. पेडणे राखून ठेवला पाहिजे, असे आग्रही मत पार्सेकर नेहमीच मांडत आले आहेत. ते या जाहीर सभेच्या मंचावर उपस्थित राहणार की नाही? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. पोटतिडकीने मुद्दे मांडण्यासाठी पार्सेकर जाहीर सभेला उपस्थित राहतील असे काहीजण सांगत आहेत, तर अलिकडे झालेल्या डोळ्यांच्या शस्त्रक्रीयेचे निमित्त सांगून ते सभेला जाणे टाळतील? असे काहींचे म्हणणे आहे. रविवारी सुटीच्या दिवशी होणाऱ्या या सभेला वेगळा रंग असेल आणि राजकीय छटा असल्याने पार्सेकरांच्या भूमिकेकडे तसे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
आश्वासनांची खैरात!
निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्ष व निवडणुकीत उतरलेले उमेदवार मतदारांवर आश्वासनांची खैरात करतात. आम्ही निवडून आल्यावर हे करणार, ते करणार. पण जेव्हा सत्तेत होते किंवा सत्तेबाहेर होते तेव्हा मात्र त्यांनी काय केले याची वाच्यता ते करीत नाहीत. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीतील प्रचार शिगेला पोचला आहे. प्रत्येक जण फोंड्यांचा विकास करणार, रस्ते सुधारणार, पणजीसारखा विकास करणार अशी आश्वासने देताहेत. मात्र मतदार या सर्वांवर विश्वास ठेवणार का? मतदार अजूनही भाबडे आहेत, अशिक्षित आहेत, असेच या राजकारण्यांना वाटते का? राज्यात व शहरात काय चालले आहे, हे फोंडावासीयांना माहीत नाही, ते डोळे झाकून बसले आहेत, असेच राजकारण्यांना वाटते का? विकास पुष्कळ झाला, आणखी विकास नको, असे म्हणण्याची पाळी आली आहे, असे लोक बोलताना दिसत आहेत. विकासाच्या नावावर मते मागण्याचे दिवस संपले का? फोंडावासीयांनी काय ठरवले आहे, हे ४ मे रोजी कळेलच, नाही का?
मुंबईतील भेट चर्चेत!
विधानसभेच्या फोंडा पोटनिवडणुकीने राजकीय तरंग उठू लागले आहेत. फोंड्यात ही धामधूम सुरू असताना शेकडो किलोमीटर दूरवरील मुंबईत मंगळवारी एक वेगळेच नाट्य आकाराला येत होते. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई, संघटन सचिव दुर्गादास कामत हे एका खासगी कार्यक्रमात एकत्र आले. राजकारणी एकत्र आले आणि त्यातही पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे राजकीय चर्चा झाली नाही, असे म्हणताच येणार नाही. त्यामुळे या चर्चेतून नेमके काय साध्य झाले? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या भेटीचे छायाचित्र मात्र बराच भाव खाऊन गेले होते.
कुंकळ्ळीत काका- पुतण्यात लढाई?
राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर नातीगोती, आपला-परका अशा भावनेत गुंतून चालत नाही. आई आणि मुलगा एकमेकाच्या विरोधात निवडणुकीत उतरलेले आपण पाहिलेले आहे. भाऊ-भाऊ , मामा-भाचा, काका-पुतण्याची राजकीय लढाई आपण अनेक वेळा पाहिलेली आहे. कुंकळ्ळी मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार अशी घोषणा माजी मुख्यमंत्री चर्चील आलेमाव यांनी केल्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. आपली मुलगी वालंका नावेली मतदारसंघातून निवडून लढविणार व आपण कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असे चर्चिल यांनी जाहीर केल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. चर्चिल यांचे पुतणे युरी आलेमाव कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार असताना त्यांच्या विरोधात निवडणुकीत उतरण्याचा निश्चय चर्चिल आलेमाव यांनी करण्याचे कारण काय असावे. खरेच चर्चिल कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत गंभीर आहेत की आलेमाव यांनी ही घोषणा करण्यामागे आणखी काही कारण आहे? युरीला टक्कर देण्याएवढे सक्षम नसतानाही चर्चिल यांनी तशी घोषणा का केली? यात काही डीलची फील आहे का?
मंत्र्यांना जनता साथ देणार?
फोंड्यात येत्या ९ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. फोंड्याचा गड स्वत:च्याच ताब्यात ठेवण्यासाठी आणि रितेश नाईक यांना निवडून आणण्यासाठी भाजपने वेगवेगळ्या प्रकारच्या रणनिती आखलेल्या आहेत. अशा स्थितीत आता काही मंत्र्यांनाही रितेश यांच्या प्रचारात उतरवण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी निश्चित केलेले आहे. त्यानुसार मंगळवारी मंत्री रोहन खंवटे यांनीही फोंड्यात जाऊन रितेश यांचा प्रचार केला. गेल्या काही महिन्यांत अनेक मंत्री विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य होत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या प्रचाराला जनता साथ देईल का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
...राजकीय चाल की नामुष्की!
पन्नास दिवस चालू असलेले मीराबाग येथील बंधारा विरोधी आंदोलन मुख्यमंत्र्यांनी तो बंधारा प्रस्ताव गुंडाळण्याची घोषणा केल्यावर आता लोकांनी मागे घेतले आहे. वरकरणी पाहिले, तर ही सरकारची माघारच आहे. यापूर्वी कदंब पठारावरील युनिटी मॅाल प्रकरणात व नंतर सांत आंद्रे मतदारसंघातील जमीन रूपांतर प्रकरणातही सरकारला प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर मुख्यमंत्री डॅा. सावंत यांनी लोकांची मागणी मान्य करून प्रकल्प मागे घेण्याची घोषणा केली होती. पण खरेच सरकारची ती माघार की लोकांची सहानुभूती मिळविण्याचा तो डाव आहे, अशी शंका आता अनेकजण घेत आहेत. कारण आंदोलन मागे घेण्याची घोषणा करतानाच आंदोलक मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करताना दिसतात, त्यामुळे नेमका हा काय प्रकार? पोटनिवडणुकीच्या तोंडावर जनमत वळविण्याचा प्रकार असे प्रश्नही केले जात आहेत.
साड्यांचे वाटप!
फोंडा पोटनिवडणुकीत खांडेपार भागात काहीजण गाडीतून साड्या वाटप करण्यासाठी आले होते. त्याची कुणकुण काँग्रेसचे जॉन परेरा यांना लागताच त्यांनी तेथे धाव घेतली. पण साडीवाल्यांनी तेथून पोबारा केला. त्यामुळे कोणी सापडू शकले नाहीत. फोंड्यातील पोटनिवडणुकीत साड्या, घड्याळांचे वाटप केले जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र चोरी, छुपे. आता मतदानाचा दिवस जवळ येईपर्यंत मतदारांना आमिषे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहेच, त्यामुळे मतदार राजाने सावध व्हावे.
विरोधकांच्या कुरघोड्या
सध्या गोव्यातून भाजपचे राज्य हटवायचे असेल, तर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन त्यांना टक्कर द्यावी, अशी आम जनतेची भावना असली तरी विरोधकांना तसे व्हायला खरेच पाहिजे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता काँग्रेस पक्षाचेच पहा, विजय सरदेसाई यांना काँग्रेस पक्षात घेऊन गोव्यात हा पक्ष अधिक बळकट करण्यासाठी एका बाजूने काही नेत्यांनी प्रयत्न चालविला असताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यात ‘खो’ घालण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जाते. विजयला पक्षात घेतल्यास आम्ही ‘आरजी’ पक्षात जाऊ, अशी म्हणे धमकी काँग्रेसमधील काही जण देत आहेत. गोव्यातील काँग्रेसचा एकंदर सूर पाहता युरी आणि कंपनीला गोव्यातील काँग्रेस फक्त तीन आमदारांच्याच हातात राहावी, असेच वाटत असावे. त्यामुळे भाजपला टक्कर देण्याऐवजी गोव्यातील विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्यासच अधिक धन्यता तर मानत नाही ना! असे वाटू लागले आहे. त्यामुळे आता समाज माध्यमांवरही काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवणारे पोस्ट येऊ लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.