खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांचा नेमकेपणा

Khari Kujbuj Political Satire: लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या भाजप फेरप्रवेशावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मोजकेच बोलले; पण नेमके बोलले.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मुख्यमंत्र्यांचा नेमकेपणा

लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या भाजप फेरप्रवेशावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मोजकेच बोलले; पण नेमके बोलले. त्यांनी गर्दीत भाजपच्या मंडळ अध्यक्षांना हेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या आनंदाचे वर्णन केले. मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या मनात घर केले. पार्सेकर यांनी भाजप सोडला तेव्हा त्यांच्यासोबत गेलेले हे कार्यकर्ते आजवर अपक्ष होते. आता भाजपमध्ये ते पार्सेकरांसोबत परत आले. त्यावेळी भाजपचे आताचे नेते आम्हाला विसरलेले नाहीत ही भावना कार्यक्रमाहून परत जाताना कार्यकर्त्यांची झाली होती.

बाबू कवळेकर आहेत कुठे?

लांब पल्ल्याच्या शर्यतीत धावपटू सुरवात संथगतीने करतात व शर्यतीचा शेवटचा टप्पा जवळ आला की गती वाढवितात. विजय मिळविण्यासाठी हा नियम महत्त्वाचा ठरतो. केपे मतदारसंघाचे माजी आमदार बाबू कवळेकर गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते तरी त्यांनी आपले काम थांबविले नव्हते. निवडणुकीचा निकाल जाहीर झालेल्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी समांतर आमदार झाल्यासारखे काम सुरूच ठेवले होते. मात्र, केपे मतदारसंघ ‘एसटी’साठी राखीव होणार व धनगर समाजाला ‘एसटी’ दर्जा नाकारण्याची बातमी आल्यापासून बाबू अचानक सामाजिक कार्यातून गायब झाल्याचे मतदार बोलतात. कोण म्हणतात की, केपे मतदारसंघात त्यांनी आपल्या कामाची गती संथ केली आहे. काहीजण म्हणतात की, बाबू यांची शांतता वादळापूर्वीची आहे. आता पाहूया बाबू यांना पुन्हा आमदार बनण्याची संधी मिळते की नाही ते!

Khari Kujbuj Political Satire
57th IFFI Goa: इफ्फीचा 20 नोव्हेंबरपासून गोव्यात चित्रपटोत्सव; 86 देशांचे 159 आंतरराष्ट्रीय चित्रपट, आयोजनासाठी 30 कोटींचा खर्च

विजयचेही ‘गर्व से कहो’

भाजपवाले स्‍वत: नेहमीच हिंदुत्‍वाचे कैवारी, असे स्‍वत:ला म्‍हणवून घेतात. मात्र, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हेही त्‍याबाबतीत कमी नाहीत, हे त्‍यांनी स्‍वत:च्‍या तोंडाने कबूल केले आहे. फातोर्डा येथे जाे पीपल्‍स पाथ बांधला आहे तिथे विजयने दिवाळी उत्‍सवाच्‍या निमित्ताने एक अभंग आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला लाेकांची एकच गर्दी उडाली. यावेळी विजय म्‍हणाले, हिंदुत्‍वाचा कैवार घेणाऱ्या भाजप आमदारांनी गोव्‍यात रामनवमीची सुट्टी मिळावी यासाठी प्रयत्‍न केले नाहीत; पण ते मी केले. आणि आता दिवाळीच्‍या काळात भारतीय संस्‍कृतीचा प्रचार करणारे कार्यक्रम लाेकांसाठी आयोजित केले तरी त्‍याला भाजपचेच काही पदाधिकारी विरोध करतात. त्‍यांना हिंदूंचे कैवारी म्‍हणायचे का? मी स्‍वत: सांगतो, ‘गर्व से कहो हिंदू है’ असे म्‍हणणाऱ्यांपैकी मीही आहे. विजयचा हा नवा अवतार म्‍हणायचा का?

बांदोडकर सक्रिय...

नुवे मतदारसंघ हा तसा भाजपधार्जिणा नाही. तरीही या मतदारसंघात भाजपचे बस्‍तान मांडण्‍यासाठी मागची काही वर्षे जे कार्यकर्ते काम करतात त्‍यात दिनेश बांदोडकर यांचे नाव प्रामुख्‍याने घ्‍यावे लागेल. बांदोडकर हे नुवे मतदारसंघाचे भाजपचे माजी मंडळाध्‍यक्षही होते. काही दिवसांपूर्वी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावला भेट दिली असता, नुवे मतदारसंघातून त्‍यांचे अभिनंदन करणारे एक पत्र त्‍यांना भेटविण्‍यात आले. यावेळी रेमंड रॉड्रिग्स आणि दिनेश बांदोडकर हे उपस्‍थित होते. या पत्रात मुख्‍यमंत्र्यांच्‍या कामाचे आणि त्‍यांनी नुवे मतदारसंघात केलेल्‍या कामाचे कौतुक केले आहे. सध्‍या दिनेश बांदोडकर हे नुवे मतदारसंघात सक्रिय झाले असून विधानसभा निवडणुकीत नुवेतून भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी त्‍यांचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्‍यामुळे सध्‍या ते प्रत्‍येक कार्यक्रमात दिसू लागले आहेत.

दामूंचा सूचक संदेश

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला ५२ टक्के मतदान होते. विधानसभेवेळी तो आकडा ३३ टक्क्यांपर्यंत घटतो. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले आहे. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी वेगळा प्रकोष्ट सुरू करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखवली आहे. सर्वांनी सोबत येण्याचे आवाहन करत त्यांनी यातून कोणा-कोणाला सूचक संदेश दिला आहे याची चर्चा भाजपच्याच वर्तुळात शुक्रवारी होती. विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपपासून दुरावलेले सारे परत येणार का, असा प्रश्न त्यातून चर्चेला आला आहे.

पोलिसांचा अहवाल

गोवा पोलिसांनी वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांना अचानक आपल्या कामाचा हिशेब देण्याची गरज का भासली, याचीच चर्चा रंगली आहे. जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची जाणीव तर विभागाला झाली नाही ना? गुन्हे घडतात, तक्रारी होतात; पण अपेक्षित कारवाई होत नसल्याची भावना वाढत असेल, तर ती पुसण्याचा हा प्रयत्न असावा. असो, हिशेब मांडणे स्वागतार्हच! मात्र, आकडेवारीच्या कागदावर दिसणारी कामगिरी प्रत्यक्षातही दिसायला हवी. कारण जनतेला अहवालापेक्षा सुरक्षिततेची खात्री अधिक महत्त्वाची वाटते.

कारवाई काहीच नाही?

जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी गुरुवारी डिचोली येथील कार्यालयाला भेट देत सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहिली. कार्यालयीन वेळ झाली तरीदेखील कर्मचारी कार्यालयात नाहीत, ही दररोजची स्थिती आहे; परंतु अशा वेळेवर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याच कारवाईचे आदेश दिले नाहीत, याबाबत नागरिकांमध्ये साधक-बाधक चर्चा सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणच्या कार्यालयात जर सरकारी अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करायला नको काय? अधिकाऱ्यांना केवळ तंबी दिली म्हणजे ‘येरे माझ्या मागल्या’ हीच स्थिती राहील. मात्र, अशाप्रकारे सरकारी अधिकारी वेळेत हजर न राहण्याची स्थिती केवळ एकाच खात्याची नाही, प्रत्येक खात्यात असले सरकारी जावई भरलेले आहेतच. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत सडेतोड कारवाई होत नाही तोपर्यंत ते शहाणे होणार नाहीत, अशी चर्चा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची 'घरवापसी'; मुख्यमंत्री सावंतांचे मांद्रेत कमळ फुलवण्याचे आवाहन

हे जीत आरोलकरांमुळेच!

मांद्रेत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी आमदार दयानंद सोपटे हे राजकीय वैरी. एकेकाळी सोपटे यांनी पार्सेकर यांचा ते मुख्यमंत्रिपदी असताना पराभव केला होता. आता ते एकत्र आले आहेत. एवढेच नव्हे पार्सेकर भाजपमध्ये यावेत, हा प्रस्ताव घेऊन सोपटे त्यांच्याकडे गेले होते. ते दोघे एकत्र येण्यास मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचा प्रभाव कारणीभूत ठरला आहे. ‘मगो’चे असूनही भाजपच्या मुख्यमंत्र्यांशी आरोलकर यांनी ज्या पद्धतीने जुळवून घेतले आहे, ते पाहता मांद्रेत त्यांची घोडदौड रोखण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागल्याचे दिसते.

टोल्याला किती महत्त्व द्यायचे!

मनोज परब यांनी सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसू लागले आहे. ‘आरजी’च्या आमदाराचा गट काँग्रेसबरोबर विधानसभेला युतीमध्ये राहणार आहे. त्यामुळे परब यांना काँग्रेसवर टीका करण्याची जणू संधीच चालून आली आहे, असे वाटत असावे. आज त्यांनी एक पोस्ट समाजमाध्यमातून केली आहे. आपल्या फेसबुक अकाउंटवर गिरीश चोडणकर यांना दोनवेळा तुम्ही आमदार विकलेत आणि पुन्हा तुम्ही आला आहात, असा खोचक टोला परब यांनी लगावला आहे. त्यावर अजून चोडणकरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा पोस्ट केले नाही. कदाचित चोडणकर यांना परब यांचे महत्त्व अत्यंत नगण्य असल्याचे वाटत असावे, त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे, असे दिसते.

जीत यांचेही स्वागत

आमदार जीत आरोलकर भाजपमध्ये आल्यास त्यांचा विरोध मी का करू, असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटले आहे. आल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांचा प्रवेश व्हावा की नाही, हे ठरवणारा मी नव्हे. मी दोनवेळा प्रदेशाध्यक्ष असताना तसे ठरवू शकत होतो, आता नाही, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. पक्षासाठी राज्यभरात काम करण्यास आपण व आपले कार्यकर्ते आता उपलब्ध आहेत, असे सांगून पार्सेकर यांनी आपण प्रदेश पातळीवर नेता असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचवले आहे.

तक्रारीचा फायदा काय?

बंदर कप्तान खात्यातील ‘पॉश’ समितीकडे तक्रार असलेल्या ‘यूडीसी’ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या उचापत्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महिला कर्मचारी वर्ग त्रासला असल्याची चर्चा सचिवालयाच्या भिंतीआड सुरू झाली आहे. खात्याच्या प्रमुखांकडे प्रत्येक कर्मचाऱ्याचा संदेश पाठवणाऱ्या या कर्मचाऱ्याची खात्यात बरीच चलती आहे. प्रमुखांची मर्जी राखत असल्यामुळे या संदेश पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्याची एकप्रकारे खात्यात दहशत निर्माण झाली आहे, अशी महिला कर्मचाऱ्यांत चर्चा सुरू आहे. ‘पॉश’ समितीकडे तक्रार देऊनही तो नामानिराळा असल्याचे दाखवत आहे. ज्या महिला कर्मचाऱ्यांनी या समितीकडे तक्रार केली होती, त्या सध्या मनस्ताप सहन करत आहेत. या सर्व बाबी सचिवालयापर्यंत पोहोचल्या आहेत, तरीही त्यावर काहीच पावले उचलली जात नाहीत, ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.

मॅश्‍‍यूच्‍या मागे पोलिस

कुठलीही गोष्‍ट असो ती कुठपर्यंत ताणून धरायची याचे जर भान नसेल तर माणूस नेहमीच गोत्‍यात येतो. सांगेचे माजी नगरसेवक आणि गोवा फॉरवर्डचे युवा आघाडीचे अध्‍यक्ष मॅश्‍‍यू डिकॉस्‍ता यांनाही आता त्‍याचाच प्रत्‍यय आला असेल. रस्‍त्‍यात मरून पडलेले कुत्रे सांगे नगरपालिकेचे कर्मचारी उचलत नसल्‍यामुळे मॅश्‍‍यूनी हा मेलेला कुत्रा आणून सांगे पालिका मुख्‍याधिकाऱ्यांच्‍या कक्षात ठेवला आणि त्‍यामुळे पोलिस तक्रार होऊन मॅश्‍‍यू यांच्‍याविरोधात गुन्‍हाही नोंद झाला. हा कुत्रा ठेवताना मॅश्‍‍यूनी सांगेकरांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी असे गुन्‍हे करायची वेळ आल्‍यास ते गुन्‍हे करण्‍यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही, असे म्‍हटले होते. मात्र, सत्र न्‍यायालयाने मॅश्‍‍यूना अटकपूर्व जामीन नाकारला आणि आता पोलिस त्‍यांच्‍या मागावर असून तो पोलिसांना सापडत नाही. मॅश्‍‍यूनी हा स्‍टंट सांगेकरांसाठी केला होता की येणारी निवडणूक नजरेसमोर ठेवून, हे कळायला मार्ग नाही; पण सध्‍या तरी ते पोलिसांचा ससेमिरा चुकवत फिरत आहेत, हेच खरे.

कौतुक ‘एफडीए’चे

चिकन विक्री केंद्रांवर ‘एफडीए’ने राज्यभर धडक मोहीम सुरू केल्याने सध्या विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अस्वच्छतेच्या वातावरणात चिकन विकले जात असल्याच्या तक्रारींना अखेर कारवाईचा कोंबडा आरवला म्हणायचे! आता ‘एफडीए’चे अधिकारी दुकानांची तपासणी करून कारवाई करत असल्याने ग्राहकांनाही निदान आपण विकत घेत असलेले चिकन स्वच्छ वातावरणात मिळेल, अशी आशा वाटू लागली आहे. अर्थात, ही मोहीम आधीच सुरू झाली असती तर नागरिकांना इतके दिवस अस्वच्छतेचा सामना करावा लागला नसता, अशी चर्चाही सुरू आहे. असो, उशिरा का होईना ‘एफडीए’ला जाग आली आणि कारवाईचा धडाका सुरू झाला, याचे स्वागतच. मात्र, ही मोहीम केवळ काही दिवसांची पाहुणी ठरू नये. अन्यथा पुन्हा चिकनसोबत अस्वच्छतेचे ‘कॉम्बो पॅक’ ग्राहकांच्या वाट्याला येईल. त्यामुळे ‘एफडीए’ने कारवाईचा हा तडका कायम ठेवावा, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Winter Weather: गोव्यात थंडीची चाहूल! पणजीचे किमान तापमान 20 अंशांवर, पहाटे आणि रात्री गारवा; दुपारी मात्र उन्हाचा तडाखा कायम

आणखी पक्षांतर?

‘आया राम गया राम’ संस्कृतीची कीड गोव्याच्या राजकारणाला लागली आहे. १९९० ते २००२ या काळात तीन विधानसभा कार्यकाळांत तब्बल १३ वेळा मुख्यमंत्री बदलले. या काळात २१ वेळा पक्षांतराच्या घटना घडल्या, तर ८० आमदारांनी पक्षांतर केले. त्यानंतरही ही प्रवृत्ती थांबलेली नाही. २०१७ ते २०२२ या विधानसभा कार्यकाळात ४० पैकी २४ आमदारांनी पक्ष बदलले. म्हणजेच, ६० टक्के आमदारांनी पक्षांतर केले. आता २०२७ च्या विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने स्वगृही परतण्याच्या आणि पक्षांतराच्या घटनांना वेग येण्याची शक्यता आहे. येत्या काळात आणखी काही आमदार आपली आमदारकी आणि विद्यमान पक्ष सोडून अन्य पक्षांत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षांतराच्या या राजकारणामुळे गोवा हे देशातील पक्षांतराचे एक ठळक उदाहरण बनले आहे.

शैक्षणिक नुकसान होणार?

कामाचा ताळमेळ राखण्याचे कौशल्य ज्याला येते त्यालाच यशस्वी व कामयाब नेतृत्व म्हणतात. राज्यात डिसेंबर महिन्यात जनगणनेच्या कामाला सुरवात होणार आहे. या कामाला प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना नेमले आहे. दहावीच्या मुलांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाही जनगणनेच्या कामाला लावले आहे. आता महिना-दीड महिना हे शिक्षक शाळेत असणार नाहीत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या पूर्वपरीक्षा आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नववीची परीक्षा व तिसऱ्या आठवड्यात दहावीची अंतिम परीक्षा होणार आहे. अशा स्थितीत इतर विद्यार्थ्यांचे सोडा दहावीचे शिक्षक जनगणनेला जाणार असल्याने त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कोण करणार? दहावीचे विद्यार्थी आपला अभ्यास कसा शिकणार? या मुलांच्या परीक्षेवर जनगणनेचा जो विपरीत परिणाम होणार आहे, त्याला जबाबदार कोण असणार?

बॅनर्स कोणी फाडले?

दिवाळीच्या उत्सवात मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी स्थानिक नेते, विद्यमान आमदार आणि मंत्र्यांनी लावलेल्या बॅनर्सची सध्या पर्वरी मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, शुभेच्छांपेक्षा बॅनर्स फाडण्याच्या प्रकाराने राजकीय तापमान अधिक तापले आहे. मतदारसंघात एका बड्या मंत्र्याचेच दिवाळी शुभेच्छांचे बॅनर्स अज्ञातांनी फाडून टाकल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे संतापलेल्या समर्थकांनी पोलिसांकडे धाव घेतली खरी. मात्र, अद्याप पोलिसांना या ‘करामती’मागचा खरा सूत्रधार शोधण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पर्वरीच्या गल्लीबोळात चर्चांना उधाण आले आहे. हा निव्वळ खोडसाळपणा आहे की आगामी राजकीय समीकरणांची चाहूल घेत विरोधकांनी डाव टाकला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होतो. गुप्त यंत्रणा कार्यरत असूनही बॅनर्स फाडणारा पोलिसांना सापडत नसल्याने, सध्या अधिकारीदेखील हैराण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.